भंगलेले शिल्प-३ marathi sad story
भंगलेले शिल्प-३ marathi sad story

भंगलेले शिल्प-३ marathi sad story

मोहिनीला अभीर,त्याची कला,त्याचे ते तल्लीन होणे,कलेत रमून जाणे यांनी भुरळ घातली होती. ती अभीरच्या प्रेमात पडली होती. निदान तेव्हा तरी तसेच वाटत होते.
अभीरने मान वर करुन बघितले तिच्याकडे. तिचे लावण्य बघून अवाक् झाला तो. कलाकारच तो. सौंदर्य  त्याला भुरळ घालायचेच.
मोहिनी आता जास्त वेळ इथेच राहायची. अभीर शिल्पे बनवायचा,ही त्याच्याकडे बघत राहायची.अभीरच्या लक्षात यायचे ते. तो पण वेडावला होताच तिच्या सौंदर्याने. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. अभीरचे आता शिल्प कोरण्यात मन रमायचे नाही.  सतत त्याचा मोहिनीचा जप चालायचा.
ती शहरातील माॕडर्न मुलगी, उच्चशिक्षित.
अभीर इथे वाढलेला.बारावीपर्यंत शिकलेला.त्यांचा काही मेळ नव्हता.पण प्रेम अशी बंधने मानेल तर ते प्रेमच नाही.
मोहिनीला चारपाच दिवसात निघायचे होते.मैत्रिणी  पुढे  निघून गेल्या होत्या. अभीरला मोहिनी जायच्या आधी तिचे शिल्प कोरायचे होते. तो एक मोठा  दगड घेऊन आला. वेळ कमी होता म्हणून मोहिनी इथेच राहायला आली. दिवसभर ती इथे बसून राहायची आणि  अभीर  तिचे  शिल्प कोरायचा.
त्या दोघांचे वेगळे विश्व तयार झाले होते.तिथे तिसऱ्या माणसाला प्रवेश नव्हता. मोहिनी सोबत असली कि अभीर  मलाही टाळायचा.
चेहरा सोडून शिल्प पूर्ण झाले होते.
चेहऱ्यावर  अभीरला आभिप्रेत असलेले भाव उमटत नव्हते. त्याच्या अतरंगात असलेली मोहिनी कोरायला  वेळ लागत होता. मोहिनी जाण्याचा दिवस उजाडाला.शिल्पाचा अर्धाच चेहरा तयार झाला होता.
मोहिनी परत आल्यानंतर बाकीचा चेहरा पूर्ण करु असे अभीरने ठरविले होते. मोहिनी वापस येणार होती.
तिने अभीरला  वचनच दिले होते तसे.
मृगांक हे सगळे ऐकून हादरला होता. त्याने बांधलेले अंदाज खरे ठरत होते.
काका पुढे काय झाले? शिल्पकार अभीरचे काय झाले? मोहिनी परत आली?
 
सांगतो.ऐक.
 
काका सांगू लागले.
मोहिनी  वाऱ्याच्या झुळकेसारखी आली नि निघून गेली. पण त्या पंधरा  दिवसात अभीरचे आयुष्य वादळ आल्यासारखे ढवळून गेले होते. मोहिनी गेली सोबत अभीरची कला, त्याचे जीवन घेऊन गेली.
ती गेल्यावर त्याने शिल्पाला हात लावला नाही.तिची वाट बघत बसायचा. त्या अर्धवट शिल्पाकडे रोखून बघायचा. ती येणारच त्याला खात्री होती.
त्याची ही आशा,विश्वास त्याने कधीही ढळू दिला नाही. मला त्याची अगतिकता,डोळ्यातील व्याकुळता सहन व्हायची नाही.मोहिनीला शोधायला हवे अभीरसाठी असे वाटायचे.पण कसे? फक्त ती मुंबईवरुन आली एवढेच माहिती होती.तिचा पत्ता,फोन नंबर अभीरजवळ काहीच नव्हते. तिचे आडनावही माहित नव्हते. पण अभीरच्या समाधानासाठी मी अभीरला घेऊन मुंबईला गेलो. खूप शोधले मोहिनीला. नाही सापडली मोहिनी.
हताश होऊन वापस आलो आम्ही. अभीर त्याच्याच तंद्रीत राहायचा. आई घरी वाट बघायची.पण हा इथेच राहायचा शिल्प न्याहळत. त्याला वास्तवात आणायचे प्रयत्न केले.पण उपयोग झाला नाही. तो त्याच्या भ्रमातून बाहेर येत नव्हता.दिवस जसजसे जात होते तसेतसे त्याचे हे वेड वाढत होते.त्याच्या घरी कुणालाही माहित नव्हते. मी एकटाच त्याच्या प्रेमाचा साक्षीदार होतो.
ती गेल्यावर दहा वर्ष त्याने त्याची वाट बघितली. मोहिनी परत आली नाही यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. शेवटी शेवटी तो भ्रमिष्ट झाला.
मोहिनीने माझ्या मित्राचा जीव घेतला.
सांगता सांगता काकांचे डोळे वाहायला लागले. मृगांक अस्वस्थ झाला.त्याच्या जीवाची घालमेल होत होती, जीव  कासावीस झाला त्याचा. ह्दय विदीर्ण झाले होते.आईचा संताप येत होता.
माझी आई अशी कशी वागली?
डोक्यात विचारांनी थैमान मांडले त्याच्या.
थोडावेळ थांबून तो काकांना म्हणाला
काका माझ्या आईचे नाव मोहिनी आहे’.
काका चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे बघायला लागले.
तू तू मोहिनीचा मुलगा काका किंचाळले.
‘हो काका’.
 
अभीरसारखा दिसतोस हुबेहुब. तू अभीर-मोहिनीचा मुलगा आहेस. तू माझ्या अभीरचा मुलगा आहेस मृगांक.
काकांनी त्याला मिठी मारली आणि रडू लागले.मृगांकच्या भावनांचा बांधही कोसळला.
थोडा वेळ गेला. काका मृगांकला घेऊन अभीरच्या आईकडे गेले. आईला मोहिनीविषयी काहीही माहित नव्हते. काकांनी थोडक्यात आईला सगळे सांगितले. मृगांक मी ओळखले होते रे.
आजी प्रेमाने मृगांकच्या चेहऱ्यावरुन हात फिरवत म्हणाल्या.
तुझ्यात अभीरचा भास झालाच होता.तसेच दिसणे,तोच स्पर्श. माझा अभीर मला परत मिळाला.’ 
आजीचे डोळे भरुन आले.रात्र झाली होती.आज मृगांक आईला फोन करण्याच्या मनःस्थितीत नव्हता.आईचाच फोन आला त्याला.
अरे मृगांक आला का परत? 
नाही आई मी भरतपूरला आहो.
मृगांकने सांगितले.
काय?कशाला?
मोहिनी किंचाळली. खूप जुन्या जखमेची खिपली निघून जखम परत रक्तबंबाळ झाली होती.
मृगांकने शांतपणे सांगितले
‘सहजच’.
मोहिनी भरतपूरचे नाव ऐकून सैरभैर झाली.भरतपूरमध्ये घालवलेल्या पंधरा दिवसांची सावली तिच्या पूर्ण आयुष्यावर पडली होती.
दोन तीन दिवस आजीजवळ थांबून मृगांक परत  जायला निघाला.दोन तीन दिवसात शिल्पकार अभीरने कुठे कुठे बनवलेले शिल्प तो बघून आला.शिल्पकार अभीर किती महान कलाकार होते हे शिल्प बघून लक्षात येत होते.अजूनही त्यांच्या हातून अप्रतिम कलाकृती घडल्या असत्या जर……
मृगांकचे डोळे भरुन आले.त्याच्यात कलेची आवड अभीरमुळेच आली होती.
‘मी आता इथेच राहायला येणार ‘
असे आजीला सांगून तो तो निघाला.
मृगांकने होस्टेलमध्ये न जाता सरळ मुंबईला जायचे ठरवले.
मृगांक घरी परतला. त्याच्या वागण्यात बराच बदल जाणवला मोहिनीला…….
 भाग- 4 वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी शब्दपर्ण पेज जरुर follow  करा.
प्रिती

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!