मृगांक घरी परतला. त्याच्या वागण्यात बराच बदल जाणवला मोहिनीला.
तो मोकळेपणाने वागत नव्हता घरात.
काय झाले मृगांक?
तिने विचारले.मृगांक काहीच बोलला नाही.तो खूप अस्वस्थ झाला होता आल्यापासून. इथून लवकर पळून जावे असे वाटत होते.पण जाण्यापूर्वी आईशी बोलणे गरजेचे होते.त्याला आईला जाब विचारायचा होता.
रात्री जेवण झाल्यावर मृगांकने आईला विचारले.
तू शिल्पकार अभीरला ओळखतेस?
प्रश्न ऐकून मोहिनीला पायाखालची जमीन सरकते कि काय असे वाटले.आजपर्यंत त्या पंधरा दिवसाच्या सावलीपासून जपलेले घर स्वतःभोवती गोल फिरतयं असे वाटले तिला.
तू ओळखतेस का शिल्पकार अभीरला?
मृगांकने परत प्रश्न विचारला. तो आपल्याला आई म्हणायचे टाळतोय हे मोहिनीच्या लक्षात आले. मृगांकला काहीतरी गुपीत नक्कीच कळले असणार.तिने कयास बांधला.
का?
तिने प्रतिप्रश्न केला.
अग,तू ओळखतेस का?
हो.ओळखते मी.
वीस एकवीस वर्षापूर्वी ओळख झाली होती माझी.
पण तू का विचारतोस? कुणाला भेटला तू भरतपूरला?
प्रतापकाकांना भेटलो.
मोहिनीच्या चेहऱ्यावर घाम निथळायला लागला.
अजून काय सांगितले त्यांनी?
मोहिनीने विचारले.
सगळेच.
मोहिनी थरारली.
सगळेच म्हणजे?
म्हणजे सगळेच.तुझे अर्धवट शिल्प आहे तिथे शिल्पकार अभीरने कोरलेले. तुझ्यामुळे कधीच पूर्ण झाले नाही.
मृगांक तू अभीरला भेटला का रे?
नाही. त्यांनी कोरलेली शिल्पे बघितली.आईला भेटलो त्यांच्या.
का? तू त्यांच्या घरी कसा गेला? कशासाठी?
मी त्यांचा मुलगा आहो म्हणून गेलो.
मृगांक एका दमात बोलून गेला. मोहिनी सुन्न होऊन भिंतीचा आधार घेत खुर्चीवर बसली.
आता काही वाचले नव्हतेच. घर जवळजवळ कोलमडायला आले.
तू अशी का वागली? एका कलाकाराचे संपूर्ण आयुष्य तू उध्वस्त केले. तू त्यांच्यातील कलाकार संपवला आणि नंतर त्यांनाही….
बोलता बोलता तो रडायला लागला.
म्हणजे अभीर ?
मोहिनीने विचारले.
‘नाहीत आता ते.तुझ्यामुळे संपलेत ते’.
मृगांकने दुःखाने सांगितले.
मोहिनीला काय बोलावे कळेना. मृगांकला आता सगळे सांगण्याशिवाय पर्याय नव्हता.
मृगांकचे रडणे सुरुच होते. आईच्या वागण्याचा धक्का बसला होता त्याला. आईचे त्याला काहीही ऐकायचे नव्हते. मोहिनी म्हणाली,
‘अरे ऐकून तरी घे’.
आता तुझे ऐकून काय फायदा? तू शिल्पकार अभीरला फसविले,बाबांना फसविले.मला अंधारात ठेवले. तू कसे समर्थन करणार तुझ्या वागण्याचे?
बाळा शांत हो. फक्त एकदाच ऐक माझे.
मोहिनी म्हणाली.
हे खरे आहे कि तू अभीरचा मुलगा आहेस.मी सगळ्यांपासून हे लपविले हेही खरे आहे.पण याशिवाय पर्यायही नव्हता माझ्याजवळ. तुझ्या जन्माने आनंदित झालेल्या तुझ्या बाबांसारख्या देवमाणसाला तू त्यांचा मुलगा नाहीस हे मी कसे सांगणार होती?
अग पण जन्मभर ते मी त्यांचा मुलगा आहो याच भ्रमात राहिले.
मोहिनी म्हणाली,
‘ मी चुकीचे वागलेही असेल पण मीही पोळत राहिले आतल्याआत. ते अज्ञानात सुखी होते.’
पण तू असे का केले?
मृगांकने मध्येच विचारले.
सांगते.
आम्ही मैत्रिणी शेवटच्या वर्षाची परिक्षा संपली म्हणून राजस्थान बघायला गेलो.आम्ही जयपूरला थांबलो होतो.त्या हाॕटेलमध्ये एका स्त्रीचे मुलगा कडेवर घेतलेले शिल्प होते.मला शिल्पकलेची आवड होतीच.मी चौकशी केली.त्यांनी भरतपूरचे शिल्पकार अभीरचे नाव सांगितले. भरतपूर जयपूरपासून जवळच होते. मी भरतपूरला जायचे ठरविले. मैत्रिणींना तयार केले सोबत यायला. आम्ही भरतपूरला पोहचलो. तिथे एक हाॕटेल शोधले आणि अभीरच्या शोधात निघालो. एका जंगलात तो भेटला.दगडाला आकार देण्यात मग्न होता. त्याने कोरलेली शिल्पे बघतांना अद्भूत विश्वात प्रवेशल्यासारखे वाटत होते. अचंबित करणारी अनुभूती होती ती. आमच्याकडे लक्षच नव्हते त्याचे.
मी मुग्ध झाली होती त्याच्या कलेवर आणि त्याच्यावरही.त्याच्या ओढीने मी रोज त्याला भेटायला जात राहिले.
मी गुंतत गेले त्याच्यात अन् तोही माझ्यात.
माझ्या मैत्रिणी राजस्थान बघायला निघून गेल्या.
मी एकटीच मागे राहिले अभीरसाठी.
त्याला माझे शिल्प काढायचे होते.वेळ कमी होता.
मी तो जंगलात राहायचा तिथे राहायला गेली. रांत्रंदिवस आम्ही सोबत राहत होता.रोज शिल्प कोरत होता.पण त्याच्या मनासारखे जमत नव्हते.त्याच्या मनात असलेली मी उतरत नव्हती. चेहरा अर्धवट राहिला.मला परतणे गरजेचे होते. मी परत नक्की येणार असे वचन देऊन मी परतले.
आणि मी अभीरसाठी परत जाणारही होते.
अभीरला मी सर्वस्व दिले ते मी परत जाणार होती म्हणूनच.
मग का नाही गेली तू परत?
मृगांकने विचारले.
सांगते.मी मला तिथेच हरवून परत आली.
घरी काही वेगळेच सुरु होते.
दहा दिवसात माझेआयुष्य पार बदलले होते. तिकडे भरतपूरला आणि इकडे मुंबईला पण. मी मुंबईवरुन राजस्थानसाठी निघाली तेव्हा माझ्या लग्नाची बोलणी घरात सुरु होती तुझ्या बाबांसोबत निरजसोबत.निरज माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा.लहानपणापासून आमची मैत्री होती. त्याला मी आवडायची पण माझ्यासाठी तो फक्त मित्रच होता.
पण घरी सगळ्यांनी माझा होकार गृहीत धरला होता. आईने राजस्थानला मी निघण्यापूर्वी मला सांगितले.निघण्याच्या घाईत मी ते मनावर घेतले नाही.आईबाबांनी त्याला मुकसंमती समजली.
मी भरतपूरवरुन परतले तेव्हा लग्नपत्रिका बनून तयार होत्या.हाॕल बुक झाला होता.मुख्य म्हणजे निरजसोबत माझे लग्न ठरले हे सगळ्यांना समजले होते.माझ्यासाठी हे सर्वच धक्कादायक होते.
मी आईला सांगण्याचा प्रयत्न केला.पण आई समजून घ्यायला तयार नव्हती. लग्न वीस दिवसांवर आले होते. माझ्या पाठी दोन बहिणी होत्या.
मी अभीरसोबतचे लग्न तोडले असते तर बाबांचे नाव बदनाम झाले असते.बहिणींची लग्ने राहिली असती.
मृगांक माझ्या हातात काहीच नव्हते. वीसबावीस वर्षापूर्वी समाजात एवढा मोकळेपणा नव्हता.रुढी,परंपरांनी कित्येक भावनांचा गळा घोटला जात होता.आज तुला जे सहज साध्य आहे असे वाटते ते तेव्हा केवळ अशक्य होते.
मृगांक शांतपणे ऐकत होता. मोहिनी पुढे सांगू लागली,
लग्नानंतर काही दिवसात तुझी चाहूल लागली मला.
तू अभीरचा आहेस हे लक्षात आले माझ्या.निरजला नाही समजले हे तेव्हाही आणि नंतरही. निरजला खूप आनंद झाला. खूप काळजी घ्यायला लागला माझी. त्याने माझ्यावर अमाप प्रेम केले. कदाचित् अभीरएवढेच. त्याला मी सांगितले असते तर हादरुन गेला असता तो. तू सांग मी काय करायला हवे होते?
लग्नापूर्वी बाबा आणि बहिणींमूळे सांगू शकली नाही आणि तुझी चाहूल लागली तेव्हा उशीर झाला होता. मी नाही वागू शकले माझ्या मनासारखे.
‘पण त्यांनी तुझी शेवटपर्यत वाट बघितली’.
मृगांक म्हणाला.
हो रे बघितलीच असणार अभीरने वाट. पण सगळे बंध तोडून मी नाही जाऊ शकले.
मृगांक तू झाल्यापासून एकही दिवस मी त्याला विसरु शकले नाही.तू अभीरचा तर होतासच पण दिसायलाही तसाच. तुझा चेहरा दिसला कि अभीर आठवायचा.आताही आठवतो. आतल्याआत मनाचा कोंडमारा व्हायचा.शिवाय नीरजशी प्रतारणा केल्याची सलही टोचत होती. नीरज म्हणजे सळसळते चैतन्य होते. लहानपणापासून त्याने माझ्यावर प्रेम केले.
तू झाला नसता तर मी नीरजच्या सहवासात अभीरला विसरलेही असते एवढे प्रेम तो माझ्यावर करायचा. पण तू आणि तुझा चेहरा यामूळे मी अभीरला विसरु शकली नाही. नीरज शेवटपर्यंत तुला त्याचाच मुलगा समजत राहिला.सत्य त्याला कधी समजले नाही.समजले असते तर तो पचवू शकला नसता.
जे अभीरचे झाले तेच निरजचे झाले असते मृगांक.
मी अजाणतेपणाने अभीरला,नीरजला फसवले. मान्य आहे मला.पण त्याची शिक्षाही भोगते आहे मी दररोज,क्षणाक्षणाला.
मृगांकला आईच्या वेदना समजल्या.तिने काय भोगले याची जाणीव झाली. अभीरच्या उध्वस्ततेला ती जबाबदार असली तरी ती तेव्हा काहीच करु शकत नव्हती.
दुसऱ्या दिवशी पहाटे मृगांक उठला मोहिनीला म्हणाला,
आई चलतेस का भरतपूरला? मी परतायचे आजीला वचन दिले होते.मला जावे लागेल.
मोहिनी नाही म्हणाली.तिला ह्या घरातून आता कुठेही जायचे नव्हते.इथेच नीरजच्या आठवणींसोबत ती राहणार होती.
समाप्त
प्रिती







Pingback: भंगलेले शिल्प भाग-३ – शब्दपर्ण
चारही भाग अप्रतिम
5 stars
खुप सुंदर लिहिले आहेस