भूत बीत

गेल्या आठवड्यात मुलांच्या परीक्षा संपल्या आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही तात्पुरती एक छोटुशी सहल काढण्याची ठरवली…

फार लांब न जाता एका दिवसात जाऊन येणे शक्य होईल असे जवळचेच ठिकाण निवडले.

प्रवास जरी एका दिवसाचा असला  तरी जाण्यासाठी योग्य ती तयारी करावीच लागणार होती शिवाय दिवस भराचा वेळ हाती असावा म्हणुन ‌ निघण्यासाठी  सकाळची ‌साडेचारची   वेळ योग्य  वाटली. . आता सकाळी सकाळीच  घरातून निघायचे म्हणजे ‌रात्री उशिरापर्यंत‌  जागरण आलेच, म्हणून  मी  जागी राहून  रात्रीच सामानाची  आवराआवर करु लागले… प्रवास  एक दिवसाचाच.. तरीही  वेळेवर कोणाला गरज पडली तर‌ सोबत असावे म्हणून प्रवासात लागणारी ..

 छोटी मोठी औषधी म्हणजे मळमळीची गोळी, विक्स, झेंडूबाम वगैरे असे चिल्लर सामान   पर्समध्ये टाकली…

 जेवणासाठी चा डब्बा ही घरूनच करून न्यायचा असे ठरवले.

  त्यामुळे सकाळी लवकर उठून  भाजी पोळी करायची होती .. वेळेवर  गैरसोय  नको म्हणून दुपारपासूनच  घरातील सर्व  कामे पटापट आवरून घेऊन … डब्यासाठी लागणारी  भाजी निवडत बसले होते.सर्व आवरा आवरता ..

 रात्र कधी झाली कळले नाही. घरातील सगळेजण गाढ झोपले होते. सगळीकडे शांतता पसरली होती.आणि मी

एकटीच   जागे होते. रात्रीच्या बारा वाजताच टोल पडला तरी माझे हात अजून चालूच होते. तसं मी धिट वगैरे काही नाही बर का, अगदी मुलखाची भित्री,  अंधाऱाला घाबरून अगदी एका ठिकाणी बसणारी मी पण आज रात्रीचे  बारा वाजले तरी  जागी होते, आणि मला भीतीपण  वाटत नव्हती, कारण मला सकाळी निघायचं होतं  त्या नादात मी पूर्णपणे विसरले होते. पण आता मला झोप अनावर होऊ लागली होती. म्हणून मी माझा भाजी निवडण्याचा वेग वाढवला.

तेवढ्यात दरवाज्याबाहेरुन काहीतरी धडपडल्याचा आवाज आला‌  आणि  मी दरवाजाकडे पाहिले..

  तर मला दाराच्या फटीतून काळी सावली आत येत असल्याचा भास झाला. अमावस्या असल्यामुळे बाहेर आधीच काळाकुट्ट अंधार आणि त्यात ती काळी सावली मला तर कल्पनेनेच घाम फुटला  होता. मी  बाहेर नेमके काय असावे म्हणून ऐकण्यासाठी कान टवकारले

तर दोन मांजरीचे  आपसात एकमेकावर गुरावणे माझ्या  कानावर पडले.माझ्या  कल्पनेनेच मला हसू आले आणि मी माझ्या मनाची समजूत घालत म्हणाले

छे, भूत वगैरे काही नसते, मी भीत्री आहे म्हणून मला असा भास झाला असेल म्हणून मी दुर्लक्ष करून भाजी तोडू लागले पण  डोक्यात एकच  विचार सुरू मला खरेच भास झाला असेल की मांजरीच्या  रुपात भूतच आले असेल? आता मात्र माझी भीतीने बोबडी वळू लागली.

माझी  नजर आता परत परत दरवाजाकडे जाऊ लागली…

दाराच्या फटीतुन  आत येणाऱ्या उजेडाचे मला  चित्रविचित्र भास होऊ  लागले होते  वरुन  भरीस भर म्हणून दूरवर कुत्रेही रडू लागले, सोबतीला टिटव्यापण  टीव टिवत  होत्या मी हातातील काम तसेच अर्धवट  सोडून भीतीने अंथरुणावर गेली आणि पायापासून डोक्यापर्यंत स्वतःला पांघरुणात  गच्च गुंडाळून घेत झोपून गेले…

 झोप काही लागत नव्हती  भीतीपोटी  डोक्यात नसले नसले  ते पाहिलेले सर्व भुतांचे सिनेमे , सिरीयली पिंगा घालत होते. मैत्रिणींनी सांगितलेले भुताचे किस्से आठवू लागले होते. सर्व भुते अक्राळ विक्राळ रुपे धारण करून  डोळ्यासमोर नाचू लागली होती..

मी  मध्येच डोळे  उघडून अंधाराकडे पाहत होती आणि  मध्येच पुन्हा डोळे गच्च मिटून डोक्यावर पांघरून ओढून घेत होती  . किती वेळ माझं असेच चालू होतं आता  मला हळूहळू डुलकी  येवू लागली होती तर थोड्यावेळाने  परत कोणाची तरी पावले  संथ गतीने माझ्याकडे चालत येत आहेत असे वाटू लागली होते.. मी त्या पावलांच्या आवाजाचा कानोसा घेऊ लागले ती पावले माझ्याकडेच येत होती.

 

  मी घाबरुन  माझ्या तोंडातून  किंचाळी  निघू नये म्हणून एका हाताने माझे तोंड गच्च दाबून धरले होते .. आता ते दूरवर चालत येणारी पावले हळूहळू अगदी माझ्यापर्यंत येऊन पोहोचली होती.   मला  काही सुचत नव्हतं गळ्यातील श्वास  गळ्यातच अडकला होता.मी भीतीने थरथर  कापत

 डोळे गच्च  मिटून  घेत सर्व  देवांना  आळवत सुटले होते  पुढे  काही क्षणातच  एक हात माझ्या  खांद्यावर येवून  पडला  तो थंडगार  हातांचा स्पर्श जाणवताच  माझ्या अंगावर एकदम  शहारा आला . आता त्या हाताने हळूहळू माझ्या खांद्याची पकड अजून च घट्ट  करून  मला  अक्षरशः हलवायला  सुरुवात केली

   मी भीतीने हलू  लागले घाबरून भूत आले  भूत  आले मला वाचवा मला वाचवा असे ‌ओरडू लागले..

थोडावेळ सर्व स्तब्ध झाल्यावर.. मी  आजूबाजूचा चाहळ घेत हळूच  ‌एक डोळा उघडून पाहिला तर….

 

   समोर नवरा  उभा होता आणि माझ्या बाजूला मोठ्या आवाजात  घड्याळाचा अलार्म वाजत होता.

तो बंद करण्यासाठीच  माझ्या नवऱ्याने हात समोर केला होता आणि त्या हातालाच घाबरून  धरुन मी भूत भूत करून‌ ओरडू लागले होते.

 माझे ओरडणे ऐकून नवरा तर नवरा पण त्यांच्या  बाजूलाच  उभी असलेली माझी  मुलेही   मला जोरजोरात हसू लागली होती.

एकंदरीत  माझा अवतार आता  पाहण्यासारखा झाला होता.  मला हसावे की रडावे हे समजत नव्हते  ते पाहून ती सर्वजण  मला अजूनच चिडवू लागली होती.

मग मी सुद्धा  प्रसंगावधान  ओळखून त्यांच्या हास्यात सामील झाले आणि

एकंदरीत माझ्या या  भूत प्रकारणामुळे आम्हाला घरातून निघायला सकाळच्या  साडेचारचे साडेसहा वाजले होते…

मुले आणि नवरा माझ्याआधी  उठून तयार होऊन बसली होती .

माझी च तयारी बाकी होती सोबत न्यायच्या  डब्याचा बेत रद्द  करून मी पटापट तयार होऊन गाडीत बसले. गाडी रस्त्याला लागली आणि नवरा मला म्हणू लागला बघ हो जरा सांभाळून बस रस्त्यावर कुठे भूत बित   दिसेल अजून  त्यांच्या या बोलण्यावर मी त्यांच्या कडे जरा रागानेच पाहिले. तर गालातल्या गालात हसून समोर बघून गाडी चालवू लागले . आणि आता आई बाबाची परत जुंपते का काय म्हणून मुले एकामेकाकडे  आश्चर्याने बघू लागली….

 

दर्शना ओमकुमार भुरे

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!