डिटेक्टीव भूत-भूतकथा
वैशाली जोशी खोडवे
त्या दिवशी सगळ्याच पेपर मधे पोलीस डायरी वगैरे जे सदर असते, त्यात एका अपघाता ची बातमी होती. एक कार डिव्हायडरला धडकून एक पुरूष जो कार चालवत होता आणि पॅसेंजर सीट वरील महिला मृत्यूमुखी पडले होते.नंतर च्या तपासा नुसार ते नवरा बायको होते, व त्यांची ओळख ही पटली होती. पण एक गोष्ट पोलिसांना उलगडली नव्हती ती अशी की, पोस्टमार्टेम रिपोर्ट नुसार महिले चा मृत्यू अपघातानेच झाला होता, पण पुरूषाची मृत्यूपूर्वी काहीतरी झटापट झाली असावी, कारण त्याच्या श्वास नलिकेवर दाब पडल्याचे रिपोर्ट मधे नमूद करण्यात आले होते. पोलीस पुढील तपास करत होते.
अभिजितला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली होती, त्याचे लग्न ठरले होते, त्याची होणारी बायको पुण्यातच नोकरीस होती, आणि हा औरंगाबादला. त्यामुळे दोघांनी ही जाॅब बदलण्याचे प्रयत्न करायचे ठरले होते ज्याचे आधी जमेल त्याने शिफ्ट व्हायचे असे त्यांनी ठरवले होते. दोघेही मूळचे ना पुण्याचे होते, ना औरंगाबाद चे होते, त्यामुळे त्यांना तशी एका शहराची ओढ नव्हती.
अभिजित शनिवार रविवार पुण्यात येऊन फ्लॅट भाड्याने/ विकत घेण्याच्या खटपटी करत होता.
छोट्या जाहिराती मधे एक संपर्क त्याला मिळाला. तो आणि त्याची होणारी बायको मिळून त्या मालकाला भेटले फ्लॅट ही पसंत पडला छोटा आणि जरा लांब होता, पण त्यांना चालण्यासारखा होता,ज्यावेळेस व्यवहाराचे बोलणे झाले, त्यावेळेस त्याने बाजारभावापेक्षा बर्यापैकी कमी किंमत सांगितली, आणि त्याबाबतही तो फारसा आग्रही नव्हता’ म्हणून अभिजितला थोडी शंका आली, आणि मित्रांनीही त्याला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. म्हणून त्याने त्याच्या एका मित्राला सगळी कागदपत्रे दाखवली, त्या मित्राचे असे 2,3 फ्लॅट घेऊन आणि विकूनही झाले होते, त्यामुळे तो तसा माहीतगार माणूस होता. कागदपत्रात ही काही शंका घेण्यासारखे नव्हते. शेवटी त्यांनी तो प्लॅट फायनल केला व यथावकाश खरेदीही केला.
अभिजीत ची नौकरी ही व्यवस्थित चालू झाली. त्यांच्या लग्नाचीही तयारी सूरू होती एकूण सगळे प्लॅननुसार आणि आनंदात चालले होते.
त्यादिवशी अभिजीत ची सेकंड शिफ्ट होती, तो कंपनीतून 11.30 ला घराकडे निघाला होता. मधे एक फारशी रहदारी नसलेला असा रस्ता होता. त्याच्या फूटपाथवर ओपन जिमचे साहित्य बसवलेले होते. फर्स्ट शिफ्ट च्या वेळेस सकाळी येताना बरेचजण तिथे जीम करताना दिसत. पण रात्री सामसूम असे.
पण आज एक स्त्री तिथे दिसली ती ह्यांच्याकडे पहात होती असे त्याला जाणवले. पण त्याने दूर्लक्ष केले. दुसर्या दिवशीही तेच झाले. पण ह्यावेळेस त्याने आधीपासून निरिक्षण ठेवले होते, कालचाच लाल रंगाचा ड्रेस तिच्या अंगावर होता, आजूबाजूला कोणी ही नव्हते, तिची एखादी स्कूटी वगैरेही दिसली नाही त्यामुळे त्याला मनात थोडी भिती वाटू लागली.म्हणून त्याने नंतरच्या दिवशी आपला रस्त्या बदलला, थोडा वर्दळीचा रस्ता पकडला, तरी त्या तूरळक गर्दीत ती त्याला दिसलीच, त्याच वेशात, त्याच्याकडेच पहात होती.
त्याने ही गोष्ट त्याच्या होणाऱ्या बायकोला ही सांगितली. तिने त्याची थोडी चेष्टा ही केली. पण सर्व आलबेल नाही हे तीलाही जाणवले. त्याने पुढच्या आठवड्यात ही सेकंड शिफ्ट मागून घेतली. तोच प्रकार परत घडला. तो घरी आला दार उघडले तर समोर एक जुना पेपर तिथे पडलेला होता, त्याला आश्चर्यच वाटले कारण जाताना त्याने सर्व घर स्वच्छ केले होते.पेपर रद्दीत ठेवण्यासाठी गॅलरीत आला, ती स्त्री त्याला पाठमोरी जाताना दिसली.पण तेवढ्यात होणाऱ्या बायकोचा गुड नाईट काॅल आला म्हणून त्याचे विचार फार ताणले नाहीत.
दुसर्या दिवशी तो नेहमीच्या स्टॉलवर नाष्टा करायला आला, टेबलवर बसला, तर तिथेही तोच पेपर त्याला दिसला, त्याने चमकून आजूबाजूला पाहिले तर थोड्या लांब अंतरावर ती बसलेली दिसली ह्याची आणि तीची नजरानजर होताच ती पटकन ऊठून चालू लागली, आणी वळण घेऊन दिसेनाशी झाली.
त्याने तो पेपर नीट पाहण्यास सुरवात केली. पण त्याला काहीच सापडले नाही.
पण असे वारंवार होऊ लागले त्या एकाच तारखेचा पेपर त्याच्या समोर कोणत्या ना कोणत्या कारणाने येत होता, आणि दूर आजूबाजूला ती दिसायचीच. एव्हाना त्याची भीड आता चेपली होती. ती दिसते पण आपल्याला काही धोका करत नाही हे ही त्याला जाणवले होते.
त्यादिवशी कंपनीत सकाळी लवकरच जायचे होते, म्हणून तो घाईने निघाला होता. नंतर कामाच्या रगाड्यातून थोडा मोकळा वेळ मिळाला, तेव्हा त्याने चहा मागवला आणि नेट वर जरा बातम्या पहाव्या म्हणून त्याने पेपरची वेबसाईट उघडली, तर तो जागेवर उडालाच, वेबसाईट उघडल्याबरोबर तोच पेपर समोर ओपन होता. एका अपघाताची बातमी होती, आता कंपनीत ती कशी दिसेल हा विचार त्याच्या मनात आला, पण त्याक्षणीच त्याचे बातमीतल्या फोटोवर त्याची नजर गेली, त्याने थोडा झूम करून तो फोटो पाहिला तर तो हादरलाच तो फोटो त्या स्त्रीचा होता. म्हणजे त्याला तिचे भूत दिसत होते तर…..
तो तडक उठला घरी गेला, रद्दीतला तो पेपर घेतला आणि होणाऱ्या बायकोला बोलावून घेतले आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि सर्व हकीगत पोलीसांना सांगितली, ही बातमी,मला होणारे त्या स्त्री चे भास, ह्यांचा काहीतरी संबंध आहे असे ठामपणे सांगितले.तसा गुन्हा काहीच घडलेला नव्हता त्यामुळे पोलीसांना रितसर तक्रार ही दाखल करता येत नव्हती, तेवढ्यात अभिजीत पाणी पिण्यासाठी बाहेर आला तर त्याला थोड्या लांब अंतरावर ती झाडाखाली दिसली तो धावत तिकडे निघाला तर, ती झपझप चालत वळणावर दिसेनाशी झाली. हा का पळाला हे पाहून पोलीस ही त्याच्या मागे गेले. आतामात्र तो काकुळतीने विनवू लागला, त्याची अवस्थापाहून पोलीस म्हणाले आम्ही तपास करतो.
पोलीस त्यांच्या सोसायटीत आले तिचा फोटो दाखवून आजूबाजूला चौकशी केली तर कोणीच त्या स्त्रीला पाहीले नव्हते. त्यांनी अभिजीत ची ही माहिती घेतली, त्याने नुकताच हा फ्लॅट विकत घेतल्याचे कळाले. सहज एका हवालदाराने किंमत विचारली, ती कळल्यावर हवालदार म्हणाले, इतक्या कमी किंमतीत कसा मिळाला? अभिजीत ही म्हणाला की तो किंमती बाबत फारसा आग्रही नव्हता.
इन्स्पेक्टरला ही जरा विचित्र वाटले, त्यांनी त्याची माहिती घेतली, ते जे जोडपे मृत्यूमूखी पडले होते, त्यांच छोटा असा कन्स्ट्रक्शन चा व्यवसाय होता.तिथे त्यांनी त्या माणसाबद्दल चौकशी केली तर तो त्यांच्या ऑफिस मधे कामाला होता असे कळाले. आता मात्र पोलीस चांगलेच कामाला लागले ती अपघाताची केस reopen केली. त्या माणसाचा कसून शोध सूरू केला कारण आता पुढचे कोडे तोच सोडवू शकणार होता. जागोजागी त्याचे फोटो व माहिती असलेली पत्रके लावण्यात आली.
आता एक वेगळाच प्रकार सुरू झाला होता, अभिजीत च्या समोर कोणत्या ना कोणत्या प्रकारे देगलूर ह्या गावाचे नाव येऊ लागले. कधी कोणाच्या बोलण्यात, कधी पेपर मधे, कधी ट्रॅव्हल्स च्या गाडीवर….आणि त्या प्रत्येक वेळेस त्या स्त्री चा भास होत असे…मागच्या अनुभवावरून तो वेळीच सावध झाले आणि पोलिसांना ती माहिती दिली. एक प्रयत्न म्हणून पुणे पोलीसांनी त्या माणसाची माहिती देगलूर पोलीसांना कळवली फोटो ही पाठवले, आणि शोध घेण्यास सांगितले. तो फोटो पहाताच एक काॅन्स्टेबल म्हणाले हा तर समोरच्याच ऑफिस मधे असतो मला नेहमीच जाता येता दिसतो.
त्यांनी लगोलग ही खबर पुणे पोलिसांना दिली, पुणे पोलीस तिथे पोहचले, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यात धक्कादायक माहिती समोर आली.
हा त्या दिवशी त्यांच्याच गाडीतून जात होता. एका व्यवहारात मालकांना 25 लाखाची रक्कम मिळाली होती. तीच घेऊन ते आणि त्यांची बायको घरी येत होते. इतकी मोठी रक्कम जवळ होती, म्हणून त्यांनी ह्याला सोबत घेतले होते.
पण ऐनवेळेस ह्याची नियत फिरली, ह्याने हळूच कमरेचा पट्टा काढला, गाडी त्या सामसूम रोड ला लागल्यावर ह्याने मागूनच पट्टा त्यांच्या गळ्यात टाकला आणि जोरात आवळला, त्यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी डिव्हायडरला धडकली.त्यांच्या बायकोचा जागीच मृत्यू झाला, आणी श्रीवास्तव ह्यांचाही कोंडून आणि स्टिअरिंग वर धडकून मृत्यू झाला.
हा सावधच होता, त्यामुळेच किरकोळ दुखापतीवर वाचला. पटकन पैसे घेऊन तो तिथून सटकला. पुढे स्वतःचा फ्लॅट मिळेल त्या किमतीला विकून त्याने पुणे सोडले आणि देगलूर ला स्थिरावला. त्याला वाटले पोलीसांचा ससेमिरा सुटला. तो तसा सुटलाही होता पण ती स्त्री मरणानंतर ही तो गुन्हा उघडकीस यावा म्हणून भूत होऊन अभिजीत ला ईंडीकेशन देत होती.
अशा प्रकारे एक जवळपास perfect crime उघडकीस आलाच.
आभास हा छळतो मला
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
छान कथा, न्यायदेवता आंधळी नाही.
धन्यवाद