मन-लेख
मन-लेख
मन धावतय खूप पुढे पुढे.
शरीर मात्र थकलेय आता.
आयुष्यभर मनाच्या तालावर नाचून नाचून.
मनाचा वेग नाही गाठू शकत ते.
मन थकायला तयार नाही.
कधी मागे,कधी पुढे सतत धावत राहायचे आहे त्याला.
त्याला शरीराची गरजही नाही.
पण मनाभोवती कोंदण केलेल्या शरीराला मोह होतो मनाबरोबर धावण्याचा.
थोडावेळ धावतेही पण मग मात्र होतं गलितगात्र.
मनाला माहित असतात शरीराच्या सीमा.
पण मानायला तयार नसते.
भुतकाळाच्या आठवणी आणि भविष्यकाळातील स्वप्न यातच झुलत राहतं ते.
किती आठवणी गोठवल्यात आणि कित्येक स्वप्न साठवलीत या मनाने.
कोण कधी आपल्यासोबत कसे वागले?
कोणी आपल्याला दुखावले?
आपण कोणाला दुखावले?
कोणी अपमान केला?
कोणी आनंद दिला?
सगळे सगळे या चिमुकल्या मनात कुलुपबंद आहे.
त्याची चावी मनाकडेच.
मन चंचल थांब थांब म्हंटले तरी पळत राहणार.
कधी पुढे पुढे पळत राहते तर कधी मागे खूप मागे अगदी आपल्या बालपणापर्यंत पोहचते.
पण मनाने ठरवले तर तेवढेच स्थिरही राहते ते.
एवढ्याशा मनाने आयुष्यात आलेली कितीतरी
वादळे पचवली आहेत.
किती मान,अपमान,हेवेदावे,सुखाचे सोहळे,
भोगलेले आनंद,दुःख ,यातना,वेदना सगळे सगळे मनातच सामावले आहे.
आपली,आपल्या जवळच्या माणसांची कित्येक गुपिते याच्याजवळच शाबूत असतात कुलुपबंद.
काही गोष्टींचे कौतुक करायचे राहूनच गेले ही खंत.
जेव्हाच्या तेव्हा तोडीस तोड उत्तर द्यायला हवे होते
असे वाटणारे बरेच प्रसंग.
दुसऱ्यांच्या माफ केलेल्या चुका
काही स्वतःच्या चुका ज्या तेव्हा मान्य नाही करता आल्या……
आता बालीश वाटणारे पण तेव्हा पुरवून घेतलेले हट्ट
काही छोट्या गोष्टींचा खूप आलेला राग
मी का माघार घेऊ म्हणून ताणलेली नाती
काही जवळच्या माणसांची गुपीतं
काही दुरच्या माणसांनी केलेले हेवेदावे.
अशा कैक आठवणी आहेत मनात.काही दरवळ देणाऱ्या ,मनाला प्रसन्नता देणाऱ्या ,काही मनाला उदास करणाऱ्या.
एवढे मोठे शरीर पण मनावर जराही ताबा नाही त्याचा.
मन – निराकार.
आकारही माहीत नसलेलं पण वर्षानुवर्षे शरीराला गुलाम बनवायची ताकद असलेले.
मुळात जन्मापासून सोबत असणारे मन दिसलेच नाही कुणाला.
काही थांगच नाही याचा.
कधी अवकाशाला गवसणी घालणारे तर कधी
एखाद्या प्रसंगाने पंखविहीन पक्ष्यासारखे जमिनीवर कोसळणारे
कधी समुद्रासारखे खोल खोल
कधी वाऱ्यासारखे बेफाम होणारे
कधी हळवे होणारे
कधी रागात धुमसणारे
तर कधी प्रेमात न्हाऊन जाणारे….
अवघं जग यांत्रिक झाले पण मन मात्र तसेच.
म्हणूनच प्रत्यारोपण होत नाही मनाचे.
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा











सुंदर ….
Wah
Wahh
मन उधाण वाऱ्याचे
खूप खूप सुंदर…अगदी खरं
Apratim 🌹🌹🌹🌹🌹