लघुकथा….
“भेटी लागी जीवा…!”
सकाळचं झुंजूमंजू झालं होतं,पुढचा टप्पा गाठत आम्ही मजल दरमजल चालत होतो,डोक्यावर सुंदर मंजिरी असलेली तुळस घेतलेली एक चिमुकली माझ्या शेजारीच चालत होती…मी तिला विचारलं,”तू ग कशी आलीस वारीत?कोण आहे सोबत तुझ्या?आणि शाळा नाही का ग तुझी?”
गोड हसून म्हणाली,” माऊली,माझं नाव मुक्ता…शाळा online हाय म्हनून आले वारीला… मोबाईल हाय की संग…! जरा ही माजी माळ धरता का हातात?हे तुळशी वृंदावन मी काखेत घेते जर वेळ,..!”
मी कौतुकानं तिच्याकडं बघत च राहिले. आणि ‘पंढरी नाथ महाराज की जय म्हणत नामघोषात आमची वारी पुढे निघाली ती थेट कुलकर्णी च्या वाड्यावर…!लोणी गावाची शान आणि भले गृहस्थ…घरात अन्नपूर्णेचा सदैव वरदहस्त होता…वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था तिथे केली होती…भाकरीची चळत ,झणझणीत आमटी,भात, नवच पण थोडं मुरलेला लोणचं असा बेत…आवडीच्या जेवणावर ताव मारून पुढची वाट चालू लागलो…ऊन,वारा, पाऊस पंढरीच्या ओढीने देह चिंब झाला होता…विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ ‘याची देही याची डोळा’ पाहण्याचा सोहळा अंगात एक प्रकारची शक्ती संचारली होती…!
विठू माऊलीचा ध्यास लागला होता…नामाचा गजर, विठ्ठलाचे रूप,पंढरीची ओढ,चांद्रभागे ची भेट,टाळ मृदंगचा गजर, रिंगण खेळण्यातली मजा, सारं काही समोर दिसत होतं…ती चिमुकली पोर,इतके वेळ आजूबाजूला नाचत होती,ती आता मधेच दिसेनाशी झाली होती…तिची तुळशीची माळ माझ्याकडेच …?
तिला खूप शोधले वारीत नाहीच भेटली कुठे…
हा भक्तीचा मेळा, आणि आता विठूच्या चरणांची भेट होणार,साक्षात पांडुरंग डोळे भरून पाहता येईल हा आनंद …दूरवर नजर टाकली आणि पंढरी दिसली…सारा लोभ,मत्सर,मोह,अभिमान,स्वाभिमान सारं इथेच गळून पडलं…आणि आपसूकच नतमस्तक झाले…!वारीच सुख अनुभवलं…
“विटेवरी उभा,कटेवरी हात।
पंढरीत उभा,माझा पंढरीनाथ।।
त्या दिव्य तेजाने झोपेतून खडबडून जागी झाले,अंगात एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली….जागेवरच ताडकन उठून बसले…पाहिले तर काय?
ती गोड मुक्ताई दिसेना,वारकरी दिसेनात,संतांचा मेळा नाही,की चंद्रभागा नाही….पण भेट मात्र सर्वांची झाली….जीव सुखावला…विठुरायचे दर्शन झाले,स्वप्नात का होईना पण वारी सुख अनुभवले,तुळशीची माळा घेऊन खुद्द रखुमाईने ‘मुक्ताई’च्या रुपात दर्शन दिले…जीव कृतकृत्य झाला या कोरोना च्या काळात…
यालाच तर म्हणता येईल,
“भेटी लागी जीवा…
लागलीसे आस,
पाहे रात्रंदिवस
वाट तुझी….!”
पांडुरंग….पांडुरंग…🙏🙏
©® सौ. प्रिया देशपांडे
नांदेड….❣️
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
खुप छान लघु कथा प्रिया ताई
खूप छान कथा
Ram krushn hari…sundr