जागतिक महिला दिन 2024
जागतिक महिला दिन 2024

जागतिक महिला दिन 2024

जागतिक महिला दिन 2024

नवरा बायकोचा पहिलं अपत्य. लाडाचं, कोडाचं, कौतुकाचं, प्रेमाचं , काळजीच, जबाबदारीच सर्वसामान्यांचे असतं तसंच. माझीही ‘ ती ‘. लडिवाळ पावलांची आणि बोबड्या बोलाची.

ती पण लहानपणापासून हट्टी, जिद्दी, मनमानी सोबतच लोभस देखणी, चाणाक्ष आणि हुशार .ती घरात सर्वांची लाडकी.

ती साजिरी गोजिरी, चैतन्याची खाण भारी

ती अंगणाची शोभा, ती लावण्याची प्रभा .

मुलगी म्हणून जन्मली तरी खूपशी मुलासारखी .

लहान असेपर्यंत किंवा समजेपर्यंत मुलं आई आजीने जसा तयार केलं किंवा जे कपडे घालायला दिले तेच घालतात. समजायला लागल्यावर हिने स्वतःच्या आवडीनुसार तयार व्हायची , आपल्याच आवडीचे कपडे घ्यायला लावायची. आजीने पचपचित डोक्यावर तेल थापून भांग काढणे आवडायचा नाही तिला.

एखादा फ्रॉक आवडला नसेल तर तो तसाच पडून राहील पण हात सुद्धा लावणार नाही. असं मनमानी बालपण .

आई-वडील आपल्याला न मिळालेल्या गोष्टी मुलांसाठी पूर्ण करतात. माझ्यापेक्षा बाबांची लाडकी प्रत्येक हट्ट पुरविणार मग ते , कोणतीही वस्तू खेळणी तिला जे मागितले ते.

माझ्या रागवण्याचा काही परिणाम होत नसे.

मला म्हणायचे : हो घेऊ दे गं तिला. आपल्याला होतं का असं ? मग मुलांना मिळू दे ना. ‘ म्हणून मला चुप करायचे.

लहानपणापासून कुत्रे पाळणे, सांभाळण्याचा शौक . आजही घरात चार चार सांभाळते. त्यांना नुसतं कुत्रा म्हटलेलं आवडत नाही, ‘आपल्यासारखं त्यांना पण नावे असतात, आपल्याला कोणी नुसतं माणूस म्हणून हाक मारतात का’? असे गमतीशीर उत्तर तयार असते तिचं .

तसंच गाडी चालवायचा नाद. बाबांनी नवीन गाडी घेतली की आधी चालून कुठेतरी आदळून यायचीच यायची . मग काय मुकाट बोलणे खाणार .

बारावी नंतर तिला एलएलबी करायचं होतं पण घरात कोणाचीच इच्छा नव्हती. ब्रेन वॉश करून तिला बीबीए साठी तयार केलं पण डोक्यातला किडा वळवळ करतच होता. ते एक वर्ष वाया घालवून तिने पुन्हा एल एल बी ला ऍडमिशन घेतली आणि जिद्दीने पूर्णही केलं. वकिली तिच्या रक्तातच आहे. आता एल एल एम करते .

बोलण्यात तर फारच पटाईत . समोरच्याचे म्हणणे पटले नाही की तिथल्या तिथे खोडून काढते, आपलं पटवून देते .

तोंडावर बोलण्याची हिंमत ठेवते , माघारी कुरबुरी केलेल्या पटत नाही . चूक ते चूक. बरोबर ते नेहमीच बरोबर .

तिनेही अनेक चुका केल्या असतील पण त्यातूनही शिकली, घडत गेली , जाणीव ठेवली .

आपल्या चुका आपण नेहमी न विसरता लक्षात ठेवाव्या म्हणजे पुढे चुकण्याची शक्यता कमी होते.

मित्र-मैत्रिणी खूप नाहीत पण जे आहेत ते पक्के, घट्ट. त्यांच्यासाठी काहीही करायला मागेपुढे बघणार नाही अगदी तिच्या बाबांसारखी.

तिचा एक बालमित्र अचानक अपघातात गेला त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कोणाचेही न ऐकता स्मशानात सुद्धा गेली. तिचा स्वभाव खूपसा तिच्या बाबांसारखा , त्यामुळे जशी मोठी होत गेली तसे त्यांचे खटके उडायचे , मतभेद व्हायचे. पण जीवही बाबांचा तितकाच तिच्यावर.

ते दोघेही जातीचे वकील. त्या दोघांच्या भांडणात मध्यस्थी मात्र मी करायचे, वकिली मात्र मी करायचे.. भांडण मिटवायला नंतर ते दोघे एक होत आणि मी बाजूला पडायची.

नवऱ्याला म्हणायचे मी : तिला एक मुलगी म्हणून समजू नका. तुमचे स्वतःचे ‘ ते ‘ वय आठवा. तुम्ही त्या वयात कसे राहायचे, कसे वागायचे, म्हणजे तुम्हाला ‘ती ‘ समजेल .

मग त्यांना माझं पटायचं .

तिला समजावताना तिचे बाबा नेहमी म्हणायचे : बाळा अति राग टोकाचा तापटपणा करू नको. आपलंच खूप नुकसान होते त्यात. माझं झालं, तुझं होऊ नये .

माझी धाकटी राखी पौर्णिमेला भावासोबत तिलाही राखी बांधते. मुलगी मुलगा भेदभाव तिला अजिबात पटत नाही. कोणी विषय काढलाच तसा तर खूप वाद घालेल. घरात घराबाहेर कामे मुलींनी करायचे आणि काही द्यायची वेळ आली की मात्र वारसाने मुलाला द्यायचे म्हटले की मग एकदम उग्ररूप धारण करणार . कामेही घरातल्या वंशाच्या दिव्यालाच सांगत जावे म्हणते.

कधीही मंदिरात स्वतःहून न गेलेली ‘ ती ‘ बाबाच्या आजारपणात त्यांच्या नेहमीच्या गणपती मंदिरात गेली. पायरीवर बसून रडलीही. घरात लहान भावंडासमोर , आजी समोर अडलेल्या डोळ्यातल्या धारा गणपती समोर आपोआप वाहिल्या .

कोविड काळात पितृछत्र हरवलं . शेवटचे बाबा पण मुलांना बघायला मिळाले नाही. पण ‘ हि ‘ने हिंमत बांधली. स्मशानात बाबांना शेवटचे पाहिले. व्हिडिओ कॉल वर. शांत झोपलेले.

माझी ही छोटी परी अचानक आभाळाएवढी मोठी झाली होती. एका बाजूला आजी आई दुसरीकडे लहान भावंड मध्ये ही . सगळं दुःखाचे वादळ पोटात दडवून सगळ्यांना सांभाळलं.

ती सगळ्यांचीच आई झाली, आईची पण आई झाली .

‘बाबांचे राहिलेले काम आपण पूर्ण करू आई’ असे सतत म्हणून माझी ताकद बनली .

स्वतःसाठी अनुरूप जोडीदार शोधला. सगळ्या अवांतर खर्चाला फाटा देऊन कोर्ट मॅरेज केलं. कोर्टात जाताना आम्हा सगळ्यांना सांगितलं, ‘ कोणीही तिथे रडायचं नाही ‘ मात्र स्वतःवर ताबा नाही ठेवू शकली.

 

तिने बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, तिथेच ती जिंकली आहे.

ती आज आमची सावली झाली, तिथेच ती जिंकली आहे.

तिच्या प्रत्येक प्रश्नाचं आज तिच्याकडे उत्तर आहे, तिथेच ती जिंकली आहे.

माझ्या आयुष्यात येणाऱ्या या मुलीला आजच्या जागतिक महिला दिनी सलाम.

८ मार्च २०२४

……….. मोहिनी राजे पाटनुरकर

7 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!