लपंडाव- प्रेमकथा
लपंडाव- प्रेमकथा

लपंडाव- प्रेमकथा

लहानपणी निलीमा मित्रमैत्रिणी सोबत लपंडाव खेळायची.कधीच सापडत नव्हती ती.कुठे लपून बसत होती देव जाणो..!
मग हळूच कुठूनतरी प्रकट व्हायची अन् शशीच्या पाठीत जोरात “धप्पा” म्हणत एकच गोंधळ करायची….आता शशी वर डाव उलटला म्हणजे तो बारीक डोळ्यातून निलीमा कुठे लपते हे हळूच पाहायचा आणि मग निलिमा त्याच्या चिडकेपणाचा एकच राडा घालायची..निलिमा,शशिकांत,मंगेश,वर्षा ,राणी असा त्यांचा ग्रुप असायचा….मुलींची संख्या जास्त म्हणून साऱ्या मिळून शशिकांतला चिडवत असतं…
शशी तसा फार शांत मुलगा.त्याच्या आईला भीती वाटायची,कि याला मित्र कमी अन् मैत्रिणीच जास्त आहेत .पुढे याला मुलींसारख्याच सवयी लागल्या तर ?…….
म्हणून जस सातवीत गेला तसा तो मंगेश सोबत राहू लागला .पण त्यांचा लपंडाव कधी संपला नाही चाळीतल्या प्रत्येक घरात लपण्यात त्यांना आनंद वाटायचा .
हळू हळू ते सर्व मित्र -मैत्रिणी विखुरले गेले . कोणाची बदली झाली , कोणी नवीन घरात राहायला गेले.शेवटी मात्र निलीमा आणि शशी कॉलेज च्या वळणावर सोबतच राहिले .
किती गंमत असते नाही का ?….. प्रेमाची दोन रूपं म्हणजे एक निखळ प्रेम आणि दुसरे निखळ मैत्री. एकाशी होते ते प्रेम आणि अनेकांशी होते ती मैत्री साऱ्या मित्र-मैत्रिणीत शशी आणि निलीमातलं निखळ प्रेम झाकलं गेलं नाही…..वेगवेगळ्या वायतले वेगवेगळे टप्पे…..गोरीपान फ्रॉक मधली गोड निलीमा आता चक्क धिप्पाड,दांडग्या, उंच्यापुऱ्या शशीच्या प्रेमात पडली होती. सुस्वभावी निलीमा सर्वांनाच आवडायची. मैत्रीचे सुरवंट जणू प्रेम रुपी फुलपाखरात रूपांतरित झालं होतं . आणि प्रेमाची सुरुवात झाली होती. इतर मित्र -मैत्रिण दोघांच्याही मनाच्या इवल्याश्या कोपऱ्यात हक्काने मैत्रीचे राज्य करत होते . सारे जण अधून-मधून ठरवून भेटायचे पण पूर्वीच्या त्या लपंडावाची सर येत नव्हती.
अचानक निलीमाला मधल्या काळात मावशीची प्रकृती ठाऊक नसल्याने पुण्यास जावे लागले . इच्छा नसतानाही ती पुण्यात गेली.शशी पासून दूर जाण्याची तिची इच्छा नव्हती पण मावशीचे आजार पण वाढतच गेले आणि निलीमाचा मुक्काम वाढला. शशी तिच्या वाटेकडे डोळे लावूनच बसला . शेवटी त्याने जाॕबसाठी पुण्याला जाण्याचे ठरवले . तसा जाॕब पण चांगलाच मिळाला आणि शशी पुण्यात स्थायिक झाला . आता उपवर मुलींची स्थळं त्याला येऊ लागली पण निलीमात त्याचा जीव गुंतला होता. त्याला निलीमाच हवी होती . तो तिची वाट पाहणार होता.तिचा शोध घेणार होता .
वर्षे उलटली निलीमा भेटली नाही . घरून मुली पाहण्यासाठी आग्रह होता ,
“पाहून तर घे किंवा सुरुवात तर कर “

असा आई – बाबांचा आग्रह असायचा ,पण तो मात्र निरुत्तर ……
पुण्यात बंगला झाला , गाडी झाली . व्यवस्थित स्थायिक झालेला शशी तिशीच्या जवळ चाललेला पाहून आई बाबा अस्वस्थ होत होते . निलीमा खरंच लपंडाव खेळत होती . कुठे लपून बसली होती कोणास माहित? कुठुनच धागा-दोरा लागत नव्हता अचानक सारे मित्र-मैत्रिण विखुरले गेले होतो .
आज मात्र शशीला एक वेगळा हुरूप आला होता . बागेतली फुले पाहून त्याच मन प्रसन्न हसलं होत…… तो लवकर तयार झाला आणि आॕफिसची ची वेळ झाली तशी त्याने गाडी काढली पण नेमके तेव्हा गाडीच सुरु होत नव्हती . कित्येक दिवसात सर्व्हिसिंग ला वेळ नसल्याने गाडी बिचारी थकली होती. वेळ तर जाताच होता पण गाडी मात्र साथ देत नव्हती. एक तास वाया घातल्या नंतर शशीने आॕफिसमध्ये फोन करून वेळ होणार असल्याचे कळवून टाकले आणि सकाळचे ताजे तवाने मन कोमेजून गेले. आता टॕक्सीने ने जाण्याशिवाय पर्याय न्हवता .
एवढ्यात कार्पोरेशनकडे जाणारी एक बस त्याला मिळाली आणि योगायोगाने त्याला त्या बसमध्ये निलीमा भेटली. दोघेही एकमेकांना पाहून आश्चर्यचकित झाले , आनंदाला पारावार उरला नाही . अगदी मागच्या चार वर्षात तिच्यात काहीच बदल झाला न्हवता . गोरीपान , निळसर डोळे , मध्यम केस , डोळ्याच्या डाव्या बाजूस बारीकसा तीळ… शशी तर क्षणभर पहातच राहिला. निलीमाची अशी भेट व्हावी …!आज किती बरे झाले गाडी बंद पडली ते ! असे वाटले क्षणभर …. लपंडावातली निलीमा सापडली होती. अचानक खो देऊन ती समोर आली होती.
ती दोघे असे एकमेकांना भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून लपेनास होता. भेटी झाल्या आणि पुन्हा एकदा प्रेमकथेला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने ….
मध्यंतरीच्या काळातल्या घडामोडींनी आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली होती. निलीमचा आजारी असलेली मावशी हे जग सोडून गेली होती पण जाताना तिने तिच्या मनाला पटेल असे काम उरकून गेली होती.
तिची सारी मालमत्ता तिने तिच्या पुतण्याच्या नावे केली आणि निलीमाने त्याच्याशी लग्न करावे असा तिचा हट्ट मृत्युपत्रात नोंदवून ठेवला होता. हा लिखित करार शशी आणि निलीमाच्या मध्ये उभा होता. ह्यातून काहीच मार्ग निघणार नाही का ?दोघेही हतबल झाले होते . आता पुन्हा जणू लपंडाव सुरु झाला होता. मग एक गडी नव्याने वाढला होता. आता कोण जिंकणार?…
आता निलीमा आणि शशीची रोज ठरवून भेट होऊ लागली. पुढे यातून काय मार्ग निघेल याचा विचार सुरू असतानाच निलीमाने पुढाकार घेतला

.” शशी मला वाटतं शब्दांचे खेळ नकोत आणि वेळही डावडायला नको बोलण्यात स्पष्टता आणि सुसूत्रता असली की माणूस जिंकणं कठीण नाही आपण दोघे मिळून अभिजित ला भेटू आणि जे खरं आहे ते स्पष्ट बोलू मला मावशीच्या प्रॉपर्टी मध्ये रस नाही त्यापेक्षा तुझ्या प्रेमाच्या छायेत मला जे सुख आहे ते या पैशात नाही शोधत मी.”

शशीला निलीमाचे म्हणणे पटले. अभिजित साधा माणूस , सभ्य , इंजिनियर , गोरा-गोमटा आणि समजदार ऐकेल असेच तिलाही वाटत होते. समजून घेईल निलीमाच्या प्रेमाला आणि शेवटी शशी व निलीमा अभिजित च्या भेटीस आले………
पैसा बघितला कि माणसाची मती फिरते.हा समज अगदी चुकीचा असतो हे प्रामाणिक अभिजित कडून शिकता आले . अभिजितला निलीमा ठाऊक होती पण शशीला तो आज नव्यानेच भेटत होता.नमस्कार वैगेरे ओळखी झाल्या. आणि ठरल्याप्रमाणे निलीमाने बिनधास्त न घाबरता सारे विचार अभिजित समोर मांडले, म्हणाली,
“आम्ही बालमित्र आहोत. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. मला मावशीचं मृत्युपत्र मान्य नाही तू त्यातून मला मुक्त करावंस हीच इच्छा आहे. “
तो मनाशीच हसला , आणि सांगू लागला.
“काकूंना आम्ही कधीच आपलं मानलं नव्हत, पण तिनेही कधी आम्हाला त्रास दिला नाही. पण तिचं मन मोठं . तुम्ही सारे तिचे आयुष्यभर केलात पण शेवटी घराचा वारस म्हणून तिने सारी धनदौलत माझ्या नावे केली पण मलाही याचे ओझे वाटायला नको म्हणून मी या पैशातून  एक वृद्धाश्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राहिला प्रश्न लग्नाचा तर मी पण आता स्वतः चांगल्या पैकी स्थायिक झालोय आणि एका मध्यम वर्गीय कुटुंबातील माझ्याच आॕफिस मध्ये असणाऱ्या मैथिलीवर माझे गेल्या चार वर्षांपासून प्रेम आहे . आम्ही अशातच लग्न करणार होतो आणि काकूंची ही घटना घडली. तुम्ही दोघे आनंदाने एकत्र येऊ शकता.   मी तुमच्या मार्गात येणार नाही उलट माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी असतील.”
शशीला काही बोलण्याची गरजच पडली नाही निलीमही मनोमन सुखावली चांगलीही माणसे आहेत जगात या हा दाखला मिळाला.
दोघांच्याही मनात वर्षानुवर्षे फुललेले गुलाबी मोरपीस आज   मिळाले. आणि आज खऱ्या अर्थाने दोघांच्या आयुष्यातला लपंडाव संपला…

…सौ, प्रिया…

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!