फुलली रातराणी-marathi stri katha
By-ज्योती रामटेके
आज किती दिवसांनी मनस्वी ने आरशात बघितले. केस किती पांढरे दिसत आहेत. आताशी तरुण दिसणारी मी म्हातारी दिसायला लागली. चेहरा निस्तेज.. निर्विकार दिसत आहे. अरे.. हे काय, आरशात कोण हसत आहे मला. आवाज तर तनयचा.. अग वेडा बाई किती आळशी आहात तुम्ही. केसांना डाय लावा जरा. अहो अजून तुम्ही पन्नाशीच्या नाही झाल्या .दोन महिने बाकी आहेत.लक्ष द्या स्वतःकडे.
अरे वेड्या.. माझ्यावर इतकेच प्रेम होते तर का मला सोडून गेलास मनस्वी ओरडली. माझे टापटीप राहणे .चांगले दिसणे तुला आवडायचे नं, मग का केले असे? मला मुलींना का सोडून गेलास. काय दोष होता आमचा? किती सहज हे सुंदर बंधन तोडले.
तुला माहित आहे का समाज काय म्हणतोय तर .. खासकरून आपलेच जवळचे लोक. परवा दुकानात गेली तर तुझ्या मित्राची बायको दिसली.बघून न बघितल्या सारखे केले तिने. मी बघितले तर किंचित हसली.दबक्या आवाजात हळूच बोलत होती. सोबत मैत्रीणी होत्या.
दिसायला तर छान आहे बाई,मग नवरा का सोडून गेला असेल ? दुसरी म्हणाली, असा भरलेला संसार कुणीही सोडत नाही,बाईचाच काही दोष असावा.घरात सर्व वैभव आहे. मागच्या हळदीकुंकवाला बघितले मी.
अहो घरात प्रेम नाही मिळाले तर माणूस भरकटतो असा.
यंदा हळदीकुंकवाला बोलवायचे कि नाही कळत नाही.
अग चला लवकर.. तयारी बाकी आहे, कुणीतरी बोलले.
हो..हो.. चला. त्या निघून गेल्या. त्यांचे ते तप्त सूर कानावर आदळत होते. कशीतरी घरी आली.
ओक्साबोक्सी रडायला लागली. मुली धावत आल्या. रडायचे कारण विचारु लागल्या. न सांगता त्यांना कळले सारे.
तुझे असे वागणे कल्पनेपेक्षा भयानक होते. तुझ्या वागण्यातून तसे कळत होते पण मुलींच्या प्रेमापेक्षा ती परकी स्त्री तुला जवळची वाटली. मी तर तुझ्या आयुष्यात किती स्थान मिळवले होते ते तुलाच माहीत. मी मात्र तुझ्या प्रेमात वेडी होती. माझा शेवटचा श्वास सुध्दा तुला न विचारता सोडला नसता. तुझ्या त्या दिखाऊ गोडबोलण्यात दंग होते मी.
अरे केसांना डाय सुध्दा तु जेव्हा चिडवायचा तेव्हा करायचे.
तुझ्या प्रेमात किती वेडी बनले होते मी..
मुर्ख होती मी.. एखाद्या वेली सारखी तुझ्या आधारासाठी धडपडत होते.खरेच किती सुंदर आयुष्य होते आपले.हास्याने खळखळ करणारे आपले आयुष्य तुझ्या निर्णयाने स्तब्ध झाले. आपल्या उमलत्या कोवळ्या कळ्या आपल्या कोशात बंद झाल्या. काय मिळाले रे तुला? आता हळूहळू त्यांनी तुझ्याविना आंनदी राहणे सुरु केले आहे.. मी पण प्रयत्न करत आहे. वेळ लागेल थोडा पण आता जगायचे तर आत्मसन्मानाने. माझे अस्तित्व शोधायचे मला. मलाही आहेत भावना. स्वच्छंदी, फुलपाखरू बनून उंच भरारी घेणार मी.
बस झाली आता अवहेलना. तुझ्या बेभान वागण्याची शिक्षा मी का भोगायची..माझा काय गुन्हा रे ?
चुकला तुच..पण समाज मला गुन्हेगार ठरवत आहे.
माझ्या कर्तव्यात चुका काढत आहेत.पण आता बस…
अग आई.. काय करते ग बाहेर?
काही नाही बेटा.. रातराणीच्या सुगंधात बसून आहे. आता उर्वरित आयुष्य असेच सुंगधी जगायचे आहे, भरभरून आंनदी.
उंच भरारी गगनात.. झेपाविल मी..
आकाशातील चंद्र, तारे ..मुठीत सामावेल मी..
अस्तित्व माझे मिटलेले शोधेल मी…
कथा आवडल्यास comment मध्ये नक्की कळवा.
प्रिय वाचक, कथा आवडल्यास नक्की Like,Share करा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाणmarathi.shabdaparna.in वर पाठवू शकता
email-shabdaparnamarathi@gmail.com
whatsapp-9867408400
https://www.facebook.com/









