मनाचा पिसारा-मराठी लघुकथा
मनाचा पिसारा-मराठी लघुकथा

मनाचा पिसारा-मराठी लघुकथा

मनाचा पिसारा-मराठी लघुकथा

मनाची भाषा कधी कळेल रे कुणाला..
बंद कुपीत जसा अत्तराचा फाया…
वाटे मोकळे करावे त्याला..
पण अवचित भीतीने टाकले आत
मुक्त संचार करावा त्याचा, पण
मनात येई ते सांगावे तरी कुणाला..
वेडे मन माझे,घाबरले ते जनाला..
अंतरीच्या वेदना ना कळल्या कुणाला..

 

मन… काय असेल हे ?

दिसत नाही,पण प्रत्येक जण आपापल्या परीने त्याला नाव देत राहतो. अनंत काळापासून या मनाचा थांगपत्ता नाही कळला कुणाला.कधी ते मेणाहून मऊ असते तर कधी वज्राहून कठीण बनते. कधी क्रोधाने पेटून उठते तर कधी सहजच कुणाला माफ करते.मनाच्या कथा आणि व्यथा कुणाला कळल्या?
मनाची परिभाषा कुणाला कळणार. कधी ते लहान बनत आईच्या मांडीवर खेळत असत तर कधी ते एखाद्या सुंदर मुलीकरीता झुरत असते.कधी ते शाळेत जाऊन आपल्या मित्रांना खुणावित राहते.जे शक्य नाही त्या गोष्टी जास्त आठवत राहते मन..

या जगात येणारे बाळ कसे मन घेऊन येत असेल?
निष्पाप .. निरागस मन घेऊन येत असेल पण काळाच्या ओघात किती बदलत असते ते. लहानपणीचे निरागस मन किती निष्पाप असते, एखाद्या फुलपाखरासारखे.
प्रियकराच्या मनात सतत त्याची प्रियसी असते,तर एखाद्या चित्रकाराच्या मनात त्याचे चित्र असते. तो सारखा मनात चित्र रंगवित असतो. बाळासाठी आसुसलेल्या आईच्या मनात सतत तिचे बाळ असते.

आईचा आणि मनाचा फार जवळचा संबंध असतो.
तिच्या मनात सतत आपल्या मुलांचे भावविश्व असते.

शाळेच्या वयात नकळतच मनात वर्गातील सुंदर मुलगी ठान मांडून राहते.सतत मन तिच्यात गुंतलेल.तिला मात्र काही माहिती नसायचे.तिचे मन मात्र कुठे? कळायचे नाही.
ही मनाची व्यथा एक दोन मित्रांना कळायची.. तिच्यावरुन मग चिडवत राहायचे. तिच्या कडे चोरुन बघणे.. तिने बघितले तर पटकन दुसरीकडे बघायचे. हा पोरखेळ दहावी पर्यंत सुरू राहायचा. परीक्षा संपली कि सारे संपले. मनात मात्र ती कायम.

त्या काळात मित्र बनुन मुलीकडे जाण्याची पद्धत नव्हती.
कधीतरी मित्र सांगायचा अरे आज ती आईसोबत यात्रेत दिसली सोबत काकु होती. यात्रेत? अरे मी आलो असतो तर? मनात वेदनेची सल उमटली. अरे बाबा एकदाच सांग नं मनातले कदाचित तिच्या मनात तू असला तर?
खुपदा विचार करतो रे पण हिंमत नाही होत..तसे बघितले तर तिचे मागेच घर,सतत खिडकी उघडी ठेवून तिला चोरुन बघत राहायचे.. कधी.. कधी वेडा बनून मुकेशचे दर्द भरे गाणी लावायचे.

आज अचानक तिच्या घरी गर्दी दिसत आहे. काय झाले असेल? तो खिडकीतून बघू लागला. आई घाईत बाहेर निघाली. अरे चालतो का? लताचे लग्न ठरले. मुलगा बघायला बोलावले आहे.
मनात असंख्य सुया टोचल्यासारखे झाले.खिडकी बंद करून रडत होतो.मनातले सांगायला किती उशीर केला.
आई नेहमी म्हणत असते. मनातले लवकर सांगावे.
नाहीतर बरेचदा वेळ निघून जाते.मनातल्या भाव.. भावनांचा खेळ संपला होता.
ते अबोध प्रेम नाही कळले तिला.थोड्या वेळात आई घरी आली.छान आहे रे मुलगा,वयात अंतर आहे जरा, पण काही नाही होत. माझ्या आणि बाबांच्या वयात बारा वर्षाचे अंतर आहे.तु का नाराज दिसत आहे?अरे निकाल लागायला वेळ आहे अजून.

आई.. लता किती लहान आहे.तिला अजून शिकायचे असेल तर?
अरे तिच्या पाठीवर चार बहिणी आहेत, म्हणून घाई केली त्यांनी. दहावी पास झाला तो. मनात वेदना घेऊन शहरात निघून गेला.काळ समोर चालला आहे. वयाच्या मानाने मनाला आवर घालणे सोपे होऊ लागले आहे.आजकाल तर मनाला समजावणे जमू लागले त्याला. आता नोकरीमुळे गावी जाणे कमी झाले आहे.आता खिडकी बंद असते.
एखाद्या निरव रात्री खिडकीकडे बघायचे.आठवणींचा खजिना उघडायचा.आता तर पन्नाशी संपली आहे.मनातल्या खूप काही गोष्टी विरत चालल्या हल्ली…
आता मनात मुलांची काळजी. त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ दे देवा, मनात हाच एक ध्यास.
साठी जवळ येत आहे..साठी बुद्धी नाठी म्हणतात ते खरे असेल का? तो मनात हसला.

कथा आवडल्यास नक्की Like,Share करा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहनआहे,
ज्योती रामटेके
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!