By-सौ. दर्शना भुरे
पसंती-मराठी लघुकथा
श्यामलीला साडी प्रेस करताना बघून आई म्हणाली,
श्यामल ..ही साडी नको घालू ..
मागच्या वेळी सुध्दा तू हीच घातली होती.
का ग? साडीवरून अलगदपणे हात फिरवत श्यामल तिच्या आईला म्हणाली.
अग हा रंग तुझ्या सावळ्या वर्णाला खुलून दिसत नाही.
हे काय ग आई प्रत्येक वेळी मला मुलगा पाहायला येते वेळी तुझे श्यामल.. ही साडी घाल, ही नको, असे चाल, असे बस, असे उठ, हे कर, हे नको…मी शोभेची बाहुली आहे का ?मला खरचं वैताग येतो आहे आता या सगळ्यांचा.. श्यामलीची चिडचिड ऐकून आई तिला म्हणाली,
अग लोक मुलीलाच नावे ठेवतात ग…
आणि मुलाला…त्याचे काय ग आई…तो कसाही चालतो का? मागच्या वेळी आलेला मुलगा बघितला स्वतः किती काळा होता आणि त्याला बायको मात्र गोरीपान हवी..काय तर म्हणे सरकारी नोकरी…केवढा रुबाब दाखवत होता. बरे झाले…त्यांच्याकडूनच नकार आला तसा मलाही पसंतच नव्हता म्हणा…आणि त्याच्या मागच्या वेळेसही..
आता हे सर्व काढायची वेळ नाही आहे श्यामल बरीच कामे पडलीत…मुलाकडील मंडळी केव्हाही पोहोचेल. तयार हो पटकन..
तिघी बहिणींमध्ये श्यामल सर्वात लहान .. सावळ्या वर्णाची म्हणून तिला लाडाने श्यामली नाव पडलेले..
श्यामलीने ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण करुन नंतर फॅशन डिझायनर चा कोर्स केला आणि स्वतः चे बुटीक उघडले.. त्यातून तिची कमाई छान होत होती. सर्वांची मन जपणारी सर्वांची लाडकी, गुणवान , …पण तिच्या गुणापेक्षा तिच्या सावळ्या रंगालाच पाहूनच तिला गृहीत धरले जात होते.
श्यामलच्या दोन्ही बहीणींचे लग्न योग्य वयात झालेले ..पण शामलीला तिच्या सावळ्या रंगामुळे अवघड जात होते. त्यामुळे आईची तिच्या लग्नाविषयीची काळजी आता दिवसेंदिवस वाढतच चालली होती.
श्यामलीचे योग्य वेळी लग्न जुळावे म्हणून आता आईने देवधर्मांचा आधार घ्यायला सुरुवात केली होती. कडक व्रत उपवास चालू केले.
श्यामलीच्या बाबाला हे सर्व सोपस्कार पसंत नव्हते.
ते आईला समजावित, अग ..निर्मला मला पण आपल्या श्यामलीची काळजी नाही असे वाटते का तुला..
नशीबावर विश्वास ठेव.. बघ सगळे चांगले होईल आपल्या मुलीचे.. तिच्या रूपापेक्षा तिच्या गुणाची कदर करणारा नक्की भेटेल बघ तिला..
तू असे व्रत उपवास करून उगाच स्वतः ची तब्येत बिघडवून घेशील…
तेव्हा आई विषय टाळून गप्प राहणेच पसंत करी
तिला वाटे पुरुष काय कामानिमित्त दिवसभर बाहेर गुंतून राहतो. पण बाईचे काय? सर्वांच्या कुत्सित नजरा..आल्या गेलेल्यांना सर्वांना तिलाच तोंड द्यावे लागते. चार बायकांत उठणे बसणे मुश्किल होते.
आज येणाऱ्या मुलाची तरी पसंती माझ्या श्यामलला येवू दे असे ती मनोमन देवाला आळवू लागली.
ठरल्याप्रमाणे मुलाकडील मंडळी श्यामलीला पाहण्यासाठी आली.
श्यामलीने सर्व पाहुण्यांना चहा पोहे दिल्या नंतर नेहमी प्रमाणे स्वतःची ओळख करून दिली. बऱ्याच वेळापर्यंत बसून मुलाकडील मंडळी दोन दिवसांत कळवतो असे आश्वासन देऊन निघून गेली. शिकलेला नोकरदार मुलगा…आईला मुलगा पसंत पडला होता. पाहुणे घराबाहेर पडताच…श्यामलीला तिच्या खोलीत जाताना बघून आई बाबाला हळूच म्हणाली,
“अहो छान आहे ना मुलगा..तुम्हाला काय वाटते पसंती येईल ना…
आपल्या श्यामलीला यावेळी तरी”
आई पण ना..
माझा सावळा रंग सोडून माझ्यात काय कमी आहे. शिकलेसवरले स्वतः च्या पायावर राहिले घरातील सर्व कामेही उत्तम जमतात. पण तरीही माझ्या बाबतीत असे का? मी एक स्त्री आहे म्हणून मला मन नाही का भावना नाहीत का स्वतः ची आवडनिवड नाही..आता यापुढे मला माझे स्वतः चे प्रदर्शन मांडायचे नाही.
आई बाबाला बोलून बघू का? एकदा बाबा एकवेळ समजून घेतील पण आई नाही घेणार….नको आताच तर पाहुणे घराबाहेर पडली बघू दोन दिवस अजून वाट तिच्या मनात अक्षरशः घालमेल सुरू झाली होती.
तिला एकदम तिची मैत्रीण रेणू ऊर्फ आठवली रेणूने दोन दिवसांपूर्वीच
तिला काही कामानिमित्ताने माहेरी येणार असल्याचा फोन केला असल्याचे पाहुणे येण्याच्या गडबडीत ती पूर्णपणे विसरली होती.
आता रेणू कडे जावून जरा वेळ बसले तिला बोलले तर थोडे मन हलके होईल..
या विचाराने तिने केसांवरून कंगवा फिरवून थोडीशी पावडर लावली व आरशासमोर उभी राहत स्वतः वरून एक नजर टाकून …
स्वयंपाकघरात असलेल्या तिच्या आईला रेणूला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून पायात चप्पल सरकवून घराबाहेर पडली.
श्यामली सोडून बाकी जवळपास सर्व मैत्रींणीचे लग्न झालेले..
रेणूसोबतची तिची शाळेपासूनची दाट मैत्री ..लग्नानंतर रेणू तिच्या संसारात गुरफटली आणि श्यामली तिच्या व्यवसायात.. तसे फोनवर बोलणे होत होते पण आज कितीतरी दिवसांनी दोघी मैत्रीणी समोरासमोर खोलीत बसून मनसोक्त गप्पा मारत होत्या.
बाहेरील दिवाणखाण्यातून पाहुणे मंडळींच्या हसण्या, बोलण्याचे आवाज कानावर पडत होते.
त्या सर्व आवाजाने श्यामलीचे लक्ष वेधून घेतले.तिला हा आवाज नक्कीच कुठे तरी ऐकल्यासारखा वाटत होता. पण कुठे ? तिला काही आठवत नव्हते.
म्हणून मग तिने रेणूलाच विचारले तर रेणू म्हणाली,
“अग..माझा दिर आहे. अविनाश सुधीरच्या मामाचा मुलगा..
या वर्षी त्याच लग्न करायचे आहे. त्याला लग्नासाठी मुली पाहत आहेत नुकताच एक मुलगी बघून आला त्यावर बोलणी चालू आहे. हा अविनाश छान आहे बर का…नोकरी पण आहे ”
रेणू पुढे म्हणाली,
“अग…हो श्यामली मी विसरलेच…तुला पण पाहायला पाहुणे येणार होते न मग कसा आहे मुलगा आवडला का तुला”
पण शामलचे तिच्या बोलण्याकडे लक्ष नसल्याने पाहून रेणूने तिचा हात हातात घेऊन तिला परत विचारले,
“अग…श्यामली मी काय विचारत आहे”
“जावू दे ग..वैताग येतो हल्ली या सगळ्या गोष्टींचा”
म्हणजे..
अग मी पडले मुलीची जात मी काय बोलणार रेणू माझे मत कोण विचारात घेते. मुलाकडील मंडळीने होकार द्यायचा आणि मी फक्त मान हलवून माझी पसंती द्यायची…
श्यामली पुढे हळवी होत म्हणाली,
माझा वर्ण रेणू…माझ्या सावळ्या वर्णाला बघूनच नाकारतात..
अग.. सावळा रंग वगळता काय कमी आहे तुझ्यात श्यामली तू हुशार, कर्तुत्ववान आहे उद्योगी आहे.तुझा स्वतः चा चांगला व्यवसाय आहे. एवढे सर्व चांगले गुण न पाहता रूप रंग पाहतात
खरेच किव येते ग अशा लोकांची..
पण तू अशी उदास नको होवू तुझ्या गुणाची कदर करणारा लवकरच तुला भेटेल बघ..
माझे एवढे चांगले नशीब नाही ग.
का नाही?अग तुला माहीत आहे माझ्या दिराने आज एक मुलगी पसंत केली. खरे तर आज तो तिलाच बघायला गेला होता.
आणि तिला लगेच पसंत पण केली…
एका पाहणीत पसंती खरंच नशिबवान आहे मुलगी..गोरी पान असेल मग श्यामली दिर्घ श्वास सोडत रेणूला म्हणाली,
गोरीपान नाही पण मनाने सुंदर आहे. गुणी, हुशार आहे. दादाच्या लग्नातच तिला मी पाहिले होते तेव्हापासूनच मनात होती माझ्या हो की नाही हो वहिनी..
श्यामलीने चमकून वर पाहिले तर समोर तोच उभा होता. जो आज तिला घरी बघण्यासाठी आला होता.
हा इथे काय करतो? श्यामल त्याला तिच्या समोर असा अचानक उभा राहिलेला पाहून गोंधळून गेली.
. श्यामलीला अशा गोंधळलेल्या अवस्थेत बघून रेणू फिरकी घेत तिला म्हणाली,
मी तुला ज्याच्याविषयी बोलत होती ना तो हाच अविनाश माझा दिर ..
यानेच आज एक मुलगी बघितली..
तसे…मी पण…माझ्या दिरासोबत आज मुलगी बघण्यासाठी जाणारच होते पण..
सरप्राईज द्यावे म्हटले एका मुलीला..
हो ना..भाऊजी आणि आज तिच्या घरीपण पसंती कळवणार आहोत बरं आम्ही लवकरच …
श्यामलीला लाजेने चूर झालेले पाहून रेणू तिला आणखी चिडवत म्हणाली,
मग सांगा कसे वाटले सरप्राईज…
आवडला न माझा दिर…कळवू का घरी आईबाबाला तुमची पसंती जाऊबाई..
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा








Wah
छान हलकी फुलकी कथा