सर्जा-राजा- मराठीकथा
आजचा दिवस सर्जा राजाचा.
पण सर्जा राजा खिन्नतेने बसून आहेत. आधी अनुभवलेला पोळ्याचा सण आठवत आहेत. मुके प्राणी.त्यांच्या मनातील भाव,भावना कुणाला समजणार?फक्त श्रावणला समजायच्या.सर्जा राजाला भूक लागली,तहान लागली हे तो बरोबर ओळखायचा.सर्जाराजाला ढेप,कडबा खायला देण्याच्या वेळा श्रावण बरोबर पाळायचा. त्यांच्यासोबत असतांना गाणे गुणगुणत राहायचा,
माझ्या सर्जाराजाची जोडी रं
समद्यायले लावते गोडी रं
पण आज श्रावणही नाही आणि त्याचे मालक धनाजीरावही नाहीत.मालकीण लक्ष्मीबाई आहेत पण त्या दुसऱ्यांच्या आधीन झालेल्या.
राजा सर्जाला काही वर्षापुर्वी अनुभवलेला पोळासण आठवला.
श्रावण (गावकऱ्यांनी त्याचे नाव सरावन केले.)
आज सकाळीच उठला.मालक धनाजीरावांकडे आला.गोठ्यात बांधलेल्या राजा आणि सर्जाकडे गेला.
राजा सर्जाला आंघोळ घातली. मालकीन लक्ष्मीबाईकडून बैलांच्या पाठीवर पांघरायला झूल घेतली. बैलांना स्वच्छ पुसून त्यांच्या अंगावर झूल घातली.तोवर दूपार झालीच .
लक्ष्मीबाईंचा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होता.
आज सर्जा राजाबरोबर श्रावणलाही पुरणपोळीचे जेवण मिळाले.जेवण आटपेस्तोवर दूपार टळली होती.वर्षानुवर्षाच्या रिवाजानुसार लक्ष्मीबाईंनी श्रावण आणि सर्जाराजाला ओवाळले,कपाळाला टिळा लावला,नमस्कार केला.
श्रावण सर्जाराजाला घेऊन बाकी लोकांच्या घरी गेला. आज घरोघरी अंगणात सडा शिंपून रांगोळी काढली होती.बाया दारी आलेल्या बैलांना पुरणपोळीचा घास भरवत होत्या आणि श्रावणला पाच रु,,दहा रु. देत होत्या.
वर्षातून एक दिवस सर्जाराजाची मज्जा आणि श्रावणची कामातून सुटका असायची.
असे कैक पोळ्याचे सण आले आणि गेले.
धनाजीरावांना तीन मुले आणि एक मुलगी. घरी सत्तर एकर शेती असल्यामुळे मुलांनी शिकण्याचा प्रश्नच नव्हता.
आपल्याला कायबी कमी नायं. पोरं नायी शिकली तरीबी त्यायला कायबी कमी पडायचे नाही.
असा दर्प होता धनाजीरावांना. धनाजीरावांनी मेहनत करुन शेती घेतली होती.
पण मुलांमध्ये त्यांचा मेहनतीचा गुण आला नाही. घरी असणाऱ्या मुबलक पैशांमुळे मुले आळशी बनली होती.
धनाजीराव जिवंत असतांनाच त्यांनी मुलांचे लग्न झाल्याबरोबर शेतीच्या वाटण्या केल्या. शेतीबरोबर घराचेही तुकडे झाले.
तिघा मुलांना वीस वीस एकर,मुलीला पाच आणि त्यांचा लहानपणापासून सवंगडी असलेल्या श्रावणला पाच एकर शेती आणि सोबत सर्जाराजाची जोडी दिली.
तशीही धनाजीरावांच्या आळशी मुलांना सर्जाराजाची गरज नव्हतीच. त्यांनी धनाजीरावांच्या पैशातून ट्रॕक्टर घेतला. नांगरणी,वखरणीचे कामे आता ट्रॕक्टर करायला लागला.
धनाजीराव सरावनजवळ कुरकुर करायचे
सरावन, बैलाशिवाय शेती नायं रं.
शेतीचे तुकडे झाले. घरात येणारे उत्पन्न घटले. धनाजीरावांचा खजिना मुले रीता करायला लागले.
धनाजीरावांना मुले वीस वीस एकरशेतीचे चाळीस एकर तरी करतील असे वाटले होते पण झाले उलटेच.
मुलांनी कष्टाने शेती कमावली नव्हती.त्यांना तिची किंमत नव्हती. जशी जशी गरज पडेल तसतसे शेतीचा एकेक तुकडा तोडून विकायला लागले.
आईसारखी असणाऱ्या आपल्या काळ्या मातीचे असे लचके मुले तोडताहेत हे धनाजीरावांना सहन होत नव्हते.
यामुळे मुलांशी त्यांचे खटके उडायला लागले.
आयुष्यभर रुबाबात वावरणाऱ्या धनाजीरावांना मुलांचे उलट बोलणे सहन होत नव्हते. मुलांना शेती देण्याची घाईच झाली ही सल त्यांना बोचू लागली.
सर्जाराजाला आधीचे दिवस आठवायचे. धनाजीरावांकडे असलेल्या गायींना झालेले हे दोन वासरं.
दोघेही पांढऱ्या रंगांची. घरच्याच गायींची असल्यामुळे धनाजीरांचे लाडके होते.
धनाजीरावांचा गावात असलेला रुबाब,दरारा आठवून डोळे भरुन आले त्यांचे.धनाजीरावांचा त्यांच्यावर भारी जीव. गावात बस यायची नाही. धनाजीरावांची लेकीला माहेरची आठवण आली कि सर्जाराजाला बैलगाडीला जुंपून ते स्वतः तिला घ्यायला जायचे. कधी त्यांना एकट्याला कुठे जायचे असले तर छकड्याला सर्जा किंवा राजाला जुंपून एकटेच निघायचे.गोठ्यात दुसरेही बैल होते पण धनाजीरावांना सर्जाराजाला सोडून दुसरे बैल नको असायचे.याच सर्जाराजाच्या भरोशावर धनाजीरावांनी अनेक छकडाशर्यती जिंकल्या.
धनाजीराव आणि लक्ष्मीबाई असहाय्य,अगतिक झाले होते.अशातच अल्पशा आजाराचे निमित्त होऊन धनाजीराव गेले. त्यांच्या मागोमाग त्यांचा सवंगडी श्रावणही गेला.सर्जाराजाची जबाबदारी आता श्रावणचा मुलगा अरुणवर आली.पण म्हाताऱ्या सर्जाराजाला गरीब अरुण कसा सांभाळणार? त्यांच्या कडून नांगरणी वखरणीचे कामे होत नव्हती.
अरुणला त्या म्हाताऱ्या बैलांची जबाबदारी नकोशी झाली.त्याने त्यांची रवानगी धनाजींच्या वाड्यात केली.तिथेही त्यांना सांभाळायला कोणी तयार नव्हते.
पण लक्ष्मीबाईंनी मुलांना विनवणी करुन ती जोडी ठेवून घेतली.
एकेकाळी वाड्याच्या मालकाच्या गळ्यातील ताईत असलेले सर्जाराजा आज लक्ष्मीबाईसारखेच असहाय्य झाले आहेत.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा







