हिंगोलीच्या लग्नघरी माधवला अर्धांगवायूचा झटका आला. उपचार मिळायला उशीर झाला, परिणाम गंभीर दिसत होते. सुप्रियानी दत्तप्रभुंना साकडं घातलं.
स्वयंसिद्धा भाग १०
आशा – निराशा
सुप्रियाची आर्त विनवणी आणि देवानं तिच्या पदरात माधवच्या जीवाचं दान टाकलं . त्याला पूर्ण बर व्हायला चार-पाच महिने लागले.
पण देवानं जीवदान टाकताना त्याची वाचा आणि स्मरणशक्ती कायमची काढून घेतली. माधवच्या बुद्धीची पाटी कोरी झाली.
तो सुप्रिया, मुली, आई वडील, मित्र कोणालाच ओळखू शकत नव्हता. इतकेच नव्हे तर तो कोण ? कुठे राहतो ? कुठल्या कंपनीत नोकरी करत होता ? हे काही म्हणजे काहीच आठवू शकत नव्हता. जणू त्याच्या मेंदूतील आठवणीचा कप्पा काढून टाकला कोणी .
डॉक्टरांसोबत सगळेच त्याच्या बोलण्याची वाट पाहत होते. जेणेकरून त्याला कधी कशाचा त्रास झाला होता ते कळेल पण त्याला काहीच लक्षात येत नव्हते . खूप दयनीय अवस्था झाली होती. त्याला असं बघून सुप्रियाला गलबलून आलं . हसत्या खेळत्या संसाराला जणू दृष्ट लागली. पदरात दोन गोंडस मुलींचे देणं आणि अचानक परस्वाधीन झाली सुप्रिया .
म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांचे तर काय म्हणावे , ऐन चाळिशीतला मुलगा आज अंथरुणावर पाहून ते हतबल झाले होते.
तिला हातपाय गाळून चालणार नव्हतं . दुःख तर डोंगराएवढं होतं पण मार्ग तर काढावाच लागणार होता .
दोन मुली, स्मृती आणि वाचा गेलेला नवरा आणि म्हातारे सासू-सासरे असे पाच लेकरे सांभाळायला ती घट्ट पाय रोवून उभी राहिली. पर्याय होताच कुठे तिच्याकडे.
कुठे आहे तो देव ? कुठे गेली ती ईश्वर भक्ती? का इतकी मोठी शिक्षा भोगायची ? अनेक प्रश्न तिला भेडसावत.
ज्याच्या संगतीत आयुष्य काढायचं, तो अचानक मुका होऊन बसला होता, शिक्षा नाही तर काय ?
बाबांनी मुलींना ‘हाक ‘ मारावी असं त्यांना वाटत नसेल का? प्रश्न खूप होते तिच्यापुढे पण उत्तर मिळत नव्हते .
काळ कधी कुणासाठी थांबतो ?
तिने खूप धिराने संयमाने घेतलं . सासूबाई हळव्या होत्या खचल्या, पण सासरे सुप्रियाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. काय करणार होते ते तरी, मुली लहान होत्या माधवचा संसार पुन्हा उभे करणे गरजेचे होते.
चार-पाच महिने नांदेडमध्ये राहावे लागले. अशा परिस्थितीत सासू-सासरे पुन्हा औरंगाबादला पाठवायला तयार नव्हते. या पाच महिन्यात माधवसाठी केलेले औषधोपचार , आयुर्वेदिक तेलाने मसाज, सुप्रियाची शुश्रुषा यामुळे माधव बऱ्यापैकी हिंडू फिरू लागला पण बोलता मात्र येईना. मेंदूवर ताण देऊन खूप काही आठवायचा प्रयत्न करत होता मग असह्य होऊन डोकं धरून बसायचा. डोक्यात घण मारल्यासारखे वाटते असे इशारानेच सांगे. जणू दडून बसलेल्या स्मृती मेंदूवर आघात करतात .
आयुष्य कधीकधी असं वागतं की तेव्हा नसलेलं देतंय की असलेलं घेतय……. हा प्रश्न पडतो.
सुप्रिया माधवसाठी जे जे कोणी उपाय उपचार सांगत ते ती करत असे.
अशाच सांगण्यातून ती जवळच असलेल्या ( बिलोली पासून 2 किलो मीटर अंतरावर बेळकोनी) गावात कुणाच्या सांगण्यावरून घेऊन गेली, तिथे गंडे-दोरे केले.
बुलढाणा जिल्यातील सुलतानपूर या गावात चांगला गुण येतो म्हणे ,तिथे माधवला उपचारासाठी घेऊन गेली. तिथे लकवा सारख्या आजारावर काही विशिष्ट पद्धतीने उपचार करतात, तिला समजले होते. पण काही उपयोग झाला नाही .
‘ झटका आल्यानंतर तात्काळ आणले असते तर काही करता आलं असतं ‘, वैद्य म्हणाले ‘ खूप जास्त वेळ मध्ये गेला’. आता करूनही काही फरक पडणार नाही.
एक आशा घेऊन गेलेली सुप्रिया निराशे सोबत वापस आली. कुणाच्या सांगण्यावरून माधवची कुंडली एका ज्योतिषाकडे पण दाखवली वयाच्या चाळिशीत गंडांतर आहे , सांगितलं.
त्यांनी काही तोडगे सांगितले तिला करायला.
तिचा पुन्हा एक अनुत्तरीत प्रश्न , हे ज्योतिषी आधी का नाही सांगत काही , काय होणार ते , नंतर तोडगे सांगण्यापेक्षा ?
पण तरीही आशेचा एक किरण कुठेतरी, कधीतरी येईल, असं तिला मनोमन वाटत होतं.
चार-पाच महिन्यात केलेले प्रयत्न उपचार उपाय सगळ्यांचे प्रेम आणि सदिच्छा हे सगळं मिळून म्हणा की अजून काही, एक चांगला परिणाम झाला. माधवच्या हळूहळू काही घटना माणसे स्मृतीत येऊ लागले. सुप्रियाचे परिश्रम वाया गेले नाही. सगळंच काही त्याला आठवत नव्हतं. पण रोजचे लोक तरी तो ओळखू शकत होता आई-वडील – सुप्रिया सगळेच आनंदले.
मुली लहान होत्या पण बाबा आपल्याला ओळखू लागले ही खुशी त्यांच्यासाठी पुरेशी होती .
हळूहळू सुप्रिया त्यांना जुन्या सगळ्या गोष्टी घटना सांगून आठवण करून देऊ लागली त्यासाठी तिला जुने फोटो अल्बम उपयोगी पडले. घरातले सगळेजण आपापल्या परीने त्याच्यासोबत असलेल्या आठवणींची उजळणी करत होते.
क्रमशः
माधव पहिलेसारखा ठणठणीत बरा कधी होईल की नाही ? की अजून कोणती परीक्षा बाकी . वाचा पुढील भागात
………..मोहिनी पाटनुरकर राजे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.





सुरेख लिखाण
स्त्रीचा संघर्ष अधोरेखीत करणारी कथामालिका
Chan
खूप छान
Khup chan lihiles mohini ..