परिस्थितीशी समायोजन करणाऱ्या सुप्रियाचे अल्लडपण संपुन ती जबाबदार झाली. नोकरीचा अनुभव घेतला.
स्वयंसिद्धा भाग 3
नकटीच्या लग्नाला
सुप्रियाचा नविन नविन नोकरीचा उत्साह तीन चार महिनेच टिकला. एक दिवस तिथला मालक सगळे पैसे घेऊन पसार झाला. मग काय, पोलिसी चौकशा, स्टेटमेंट सगळं ओघानं आलंच.
जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल पुढे बघाल तर आशा दिसेल आणि स्वतःच्या आत आत्मविश्वास मिळेल.
या अनुभवातून पैसा कमी मात्र शिकवण मोठी मिळाली. वेळ आणि काळ सारे शिकवते याची प्रचिती येत गेली. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते ती म्हणजे ते सर्वांना चांगले समजतात आणि मग अडचणीत येतात.
सुप्रियाला तीन बहिणी. वंशाला कुलदीपक हवाच असा तो काळ. सहाजिकच दीपकच्या प्रतीक्षेत पणत्या तेवत गेल्या.
भावाचे आगमन झाले त्यावेळेस सुप्रिया आठव्या इयत्तेत शिकत होती . घर कामाला मोलकरीण लावायची त्यावेळेसची प्रथा नव्हती म्हणा किंवा खूपशी परिस्थिती नव्हती म्हणा पर्यायाने बहिणीच भागीदारीने कामे करीत. कामे करून शाळेत जायचं . कौतुक म्हणून नव्हे पण बहिणी बहिणी समजूतदारीने वागत म्हणून वाद शक्यतो व्हायचे नाही. सुप्रियाच्या वाट्याला किराणा आणणे, भाजी , मेडिकल , पैशाचा हिशोब ठेवणे इत्यादी कामाची जबाबदारी असायची. याच कामाच्या सरावाची तिला भवितव्यात ‘अशी ‘ गरज पडेल वाटलं नव्हतं.
एकापाठोपाठ एक बहिणींचे शिक्षण पूर्ण होऊन लग्न वय कधी गाठले? आई बाबांना लक्षात आलं.
तसे नातेवाईकांमधून आत्या मामा मावशी काका ही लोकं कोणतेही स्थळ आणत. का तर म्हणे आर्थिक परिस्थिती बेताचीच. एकीच्या लग्नाला जो खर्च करावा लागणार तो पुढे एक-दोन वर्षाच्या अंतराने तीनदा करावा लागणार होता पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी तर स्वर्गातून बांधून येतात .
सारं काही विधीलिखित…..
उन्हाळा म्हणजे लग्नसराईचे दिवस.
सुप्रियाची एक मावशी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नासाठी गावी आली होती . घरी तिच्यासोबत शेजारील दोन-तीन ज्येष्ठ मंडळी होते. ते सोवळ्यात जेवणाऱ्यापैकी होते. बाहेर कार्यक्रमात ते जेवत नसत . म्हणून घरी काही सोय होईल का ?
मावशीने विचारणा केली. घरच्या वाड्यातच मंदिर असल्याने रोजची पूजा नैवेद्य असतोच, मावशीला माहीत होते. त्यामुळे कडक सोवळे पण ओघानेच. आईनी ‘ हो’ म्हणून मान हलवली. उन्हाळ्याचे दिवस आणि घरचीच आमराई स्वीटचा मान आमरसाचा , बाकी नेहमीचे वरण भात भाजी पोळी .
बहिणींनी रांगोळ्या वगैरे काढून सर्वांना जेवायला वाढले. अनोळखी व्यक्तींना का होईना पण अन्नदान घडले, आईला मनोमन आनंद झाला.
पुढे काही दिवसातच मावशीचा फोन. अनोळखी पाहुण्यांपैकी एकाच्या मुलासाठी वधू म्हणून सुप्रिया पसंत पडली म्हणे. भराभर कामे उरकणे व्यवस्थित जेवायला वाढणे, त्यांच्यावर छाप पडली असावी.
बाबांनी मुलाकडची इतर माहिती मिळवली. मुलाचे वडील डेप्युटी कलेक्टर, मोठे घर शेती , एक भाऊ बहीण दोघे लग्न झालेली. ‘ हे ‘ शेंडेफळ फार्मास्युटिकल कंपनीत मॅनेजर. त्यांना वाटलं स्थळ चांगले पण आपल्याला झोपणारे नाही. बऱ्यापैकी सधन कुटुंब.
योग जुळून आला. एक दिवस घरचे सगळे त्यांच्याकडे जाऊन आले . आठच दिवसात बोलाचालीही झाली. प्रथेप्रमाणे देणे घेणे मानपान परिस्थितीनुसार जमवून घेतले आणि सुप्रियाच्या अंतर्मनाला सनईचे सूर सुखावू लागले तिकडच्या घरचे वातावरण तसं मोकळं वाटलं म्हणून सुप्रिया माधवच्या आठ पंधरा दिवसाला भेटी होत होत्या . कंपनीच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांना कारण मिळत होतं . हे सगळं साखरपुडा झाल्यावरच.
लग्नाची तारीख ठरली. तसं लग्न ठरल्यापासून बाबांची पैसे जमवण्याची आणि आईची रुखवत भांडी इतर सामानाची जमवाजमव सुरू झाली. गावातच घरी दत्त संस्थान मंदिर असल्याने तिथेच देवासमोर लग्न करायचे ठरले. एक महिना अवकाश होता पण आमच्या भावकीतल्या काही मंडळींचा त्याला विरोध होता . सुप्रियाच्या बाबांची खूप पंचायत झाली ऐनवेळी दुसरे मंगल कार्यालय शोधणे साहजिकच जास्तीचा पैसा जमा करणे . ती समस्या कशीबशी सुटली .
सुप्रियाला साहित्याची आवड म्हणून साहित्यिक भाषेत पत्रिकेचा मजकूर मुद्दामूनच छापला . हा sss हा म्हणता म्हणता सगळे पाहुणे जमले . लग्न तीन दिवसांवर येऊन ठेपलं तोच दुसऱ्या दिवशी आमच्या भाऊबंदकीतील एका आजीची निधन वार्ता येऊन ठेपली . आता दहा दिवसाचे सुतक.
नकटीच्या लग्नाला खरंच सतराशे विघ्न कसे येतात तो अनुभव आला . मग काय सगळीकडे भराभर फोन केले सगळ्यात आधी वर पक्षाकडे फोन करणे अत्यंत गरजेचे होते. तर तिकडे देव ब्राह्मणही झाले होते, हळद लागली होती. ‘ म्हातारीला हीच वेळ सापडली का ?’ कुजबूज झाली. सासरकडील जेष्ठ मंडळी त्यांच्या घरी आली. सुप्रियाची आजी त्यांना हात जोडून म्हणाली, ‘ अपशकुन समजून लग्न मोडू नका, खूप मेहनत घेतली साऱ्यांनी’.
संपन्न होणार की नाही सुप्रिया माधव चा विवाह सोहळा ?
की खरंच नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न येणार ?
वाचा पुढील भागात.
क्रमशः
…….मोहिनी पाटनुरकर राजे
पुढील भाग वाचा खालील लिंकवर
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.







खूप interesting Katha वाक्यरचना तर खूपच छान… ❤️❤️❤️
छान पुढील कथेच्या प्रतिक्षेत