६-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-By ज्योती रामटेके
घरामध्ये पियूष सर्वांना आवडला होता. चंदनाला छान वाटला तो. तशाही तिच्या फार अपेक्षा नव्हत्या. साधा
तिला समजून घेणारा नवरा हवा होता तिला. पियूष अगदी तसाच वाटला तिला. अपर्णाचा नाराजीचा सूर जरा कमी
झाला होता. तिलाही पियूष चांगला मुलगा वाटत होता.
अपूर्वला पण पियूष आवडला. बाबांनी चंदनाला
विचारले. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून बाबांना कळले
तिच्या मनात काय आहे ते.
चंदना-बाबांनी आवाज दिला. मुलगा आवडला नं तुला?
मला तर चांगला वाटत आहे मुलगा. आईचा स्वभाव वाटला थोडा विचित्र, वडील तर देवमाणूस वाटले. शांत स्वभाव. प्रत्येक वाक्य तोलून मापून बोलत होते ते.
अहो बाबा.. सुमनताई त्यांना बोलू देत नव्हत्या. ते बोलायला लागले कि त्या मध्ये बोलायच्या. मग ते चुप बसायचे. आपल्या घरी तर बाबाच बोलत असतात. आई शांत असते. अपर्णाने नेहमीप्रमाणे आपला मुद्दा मांडला
बाबा-अरे बेटा.. त्या समाजात वावरतात. रोज किती लोकांना भेटतात.बोलतात. आत्मविश्वास वाढतो, कसे बोलावे हे कळते. धीटपणा येतो. म्हणून तर चार भिंतीत राहून प्रगती नाही होत स्रियांची. त्या घराला घट्ट आवळून ठेवतात. नाती..गोती सोडायला तयार नसतात.
आयुष्यभर तेच करतात. स्वतःच्या आवडीच्या गोष्टी.
स्वतःच्या आवडी.. निवडी मारुन मनाला रिक्त करून टाकतात. मला तर नवल वाटते बायकांचे, एवढी सहनशीलता त्यांना कुठून मिळते कळत नाही.आता आपल्या घरातच बघ नं.. तुझ्या आईला मी कधी बंधनात ठेवले नाही.तिला शिकवायला तयार होतो मी. कमी वयात लग्न झाले, दहावीत होती ती. परीक्षा संपली, आणि लग्न झाले.
घरात मोठा परिवार. काम करता.. करता वेळ संपायचा.
नंतर चंदना झाली, सारे आयुष्य बदलून गेले. आईला शिक्षणाचा आग्रह केला होता पण नाही जमले सर्व. घरच्या जबाबदाऱ्या तिला जास्त महत्वाच्या वाटल्या.
आता होत आहे बदल. कुटुंब लहान झाली आता.. नात्यात जिव्हाळा नाही.जाणे.. येणे कमी झाले, त्यामुळे वेळ मिळतो स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करायला. मला तर पटते हे सर्व नविन पिढीचे. स्वतः तर सुखी राहतात ते. आमची पिढी दुसऱ्या साठी जास्त जगली. घाण्याच्या बैलासारखी परिस्थिती होत होती आमची.. पण मजा वाटायची. तो एक वेगळाच आनंद होता.
आईसारखी चंदना झाली. तू मात्र कुणावर गेली माहीत नाही.. बाबा बोलले..
आई-अहो, कुणावर म्हणजे.. ती पक्की तुमच्या बहिणी वर गेली.
रमाताई किती बोलतात.
बाबा-हो..ग.. रमा आहे बोलकी, हल्ली येत नाही जास्त. आल्यावर घर फुलून जाते. चिमणीसारखी चिव.. चिव करत असते. आजकाल बरे नसते तिला. एकटी नाही येऊ शकत.
वयाच्या मानाने लवकरच थकली. मोठे सहा भावाचे कुटुंब
वीस वर्षे एकत्र होती सर्व.. जबाबदाऱ्या भरपूर. हळूहळू विभक्त होत गेली सर्व. फुलराणी म्हणायचो मी तिला. सदैव फुलासारखी फुललेली, माझी लाडकी बहीण. लग्नानंतर कोमेजून गेली बिचारी.
सुरवातीला खूप त्रास झाला तिला. नंतर सवय झाली.
लोक चांगली होती. पण लग्नानंतर एकत्र कुटुंबात आपोआपच काही बंधने आली
अपर्णा-बापरे.. बाबा मला नाही जमणार हे सर्व.
अपर्णा तुम्ही आजकालच्या मुली.. हल्ली हे सर्व काळाच्या ओघात कमी होत आहे. शिवाय शिक्षणाचे पाठबळ आहे तुम्हाला. बाबा रमा आत्याने मला लहानपणी तिच्या घरी ठेवले होते काही दिवस. किती मजा होती तिच्याकडे. रोज पंगतीत जेवण असायचे. मी तर दिवसभर खेळत बसायचे. लहान मुले भरपूर होती. आत्या दिवसभर कामात दिसायची.रात्री जेवण झाल्यावर रोज एक कथा सांगायची. ती रोज गुलबकावलीची..राजा.. राणीची गोष्ट सांगायची. मी तर ऐकता.. ऐकता झोपून जायची.
बाबा-आता काळ बदलला बेटा.. कथा विस्मृतीत गेल्या आता.
प्रत्येकाला काहीतरी ओझे आहे असे वाटते. लहानपण पुस्तकाच्या ओझ्याखाली हिरमुसले आहेत. सुख- सुविधा असलेले लोक खळखळून हसताना दिसत नाहीत.
लहानपणी मला नेहमी वाटायचे, पैसेवाले लोक सर्वात सुखी. नंतर तो भ्रम होता हे कळले.
चला.. बसा सर्व,आज मी कथा सांगणार तुम्हाला. आईला आवाज दे. आता रमा हवी होती, मजा आली असती.
चला.. ऐका मग राजा-राणीची गोष्ट……
क्रमशः
https://marathi.shabdaparna.
कथामालिका आवडत असल्यास नक्की कळवा.
प्रिय वाचक, तुम्हीही शब्दपर्णवर लिखाण पाठवू शकता.





Chhan katha
छान ,
कथेत कथा 👍