गंगु आजी..काय करत व.
काय नाई व सारजा.. ढोरा वासराले पाणी पाजुन रायली.
या घरात मायाशिवाय एक काम नाई होत बीचारे.
सकाई बजाराले गेली हुती.
बजार कायचा माय.या करोनान बेजा काव आनला.नीरा मुसक बांदून फिरा लागल. कोनी कोनाले ओयखत नाई.
ओयखीची बाई नीरा खेटुन उभी रायते पन ओयखु नाई येत.
अव माय माई सोबतीन जना बजारात दिसली..मले ओयखु नाई आली. तिन मुसक काढल तवा धुम हासो आमी.
आमास बसाव मनल त पारावर बसलो..
एकमेकीच बोलन बी नाई समजे मगं जनान मुसक काढल.
अन आला बाई पोलिस… बसल्या …बसल्या पाचशे रूपयाचा दंड केला बीचारे.
बजार झाला हुता..चंचीत शंभराची एक नोट हुती.पोलिस पाचशे रूपयाच्या खाली काइ येत नुता.द्या आजी लवकर
तुमाले घरी जाच हाये ना.
मायीत लयच सटकली.. अरे मुरद्या..पीक नाई पानी नाई ..बॕकेच लय मोठ कर्ज हाये.पानी..पाउस त्याच्या मनान पडते. जवा पाईजे तवा येत नाई.तुले माईत आहे काय.. आठ दीस ढोरावानी काम करतो तवा बजार हुते माया. एक रूपया कमी करासाठी मी एक घंटा दुकानासमोर घालवतो.अर तुले गरीब मतारी बाईच दिसली काय.. अर जरास मालदार लोकाले पकड.अर आमच पोट हातावर हाये दादा ..मले दमा हाये तरी बी पाचशे रूपये वाचासाठी मुसक बांधुन आली बजाराले.
हे पाय आजी..दंड भर नाही तर चला पोलिस स्टेशनला
बापा तटीसा येउन काय करू मी.
आजी ….चला मोठया सायबाकड
हे पाय बाबू मी भीत नाई…तस बी मले घरी काम नाई .
दोन टाईम खाची सोय नाई. त्यात बुढाबी नीरा बोलत रायते.खाल्ला कुटका आंगी नाई लागु देत. मी बी तसी कटायलीच आहो..त्याच्यात ते मायावाली सुनबोळ उलीसा मले मान देत नाई….हु मनल की भांडन करते…अन ते उली…उली माये नातू एक बी सीरेल पावू नाई देत..देवाधरमाची सिरेल आली का टी …वी बंद करतेत.तस बी मले कुठबी रायन हाये…नेउन टाक जेलमधी…
अव आजी बजाराले पोराले काउन नाइ पाठवत?
अरे बाबु …त्यालेच पाठवत जाओ पण त्या दोघाले माया पैशाची किंमत नाई…अर्धा पैसा नीरा खर्यात गमावते अन सुन भलकसी मटकी हाये ..रंग …बेरंगी नकपालीस आनते…ओठाची लाली..पावडर..इस्नो..ईचारू नगस बाबा
काव आनला तीन मले…अन माया पोराले.आता करोना हाये त लग्नाले जान कमी हाये तिच नाई त हर लग्नात जाते उंडाराले.
अव आजी ते पाय मोठे सायेब येउन रायले.
अरे …दादा .. येऊ दे…मले भेव नाई कोनाचा.
बोला …आजीबाई…काय म्हनता …
पाय न बाबु…कस या पोलीसान पकडल मले…
आजीले द्या सोडुन..त्या बजाराले आल्या हुत्या..फिराले नाई..आपल्याले रिकावटवळे लोक पकडाचे हायेत..जे बीनकामाचे फिरत रायतात..
या आजी….च्या घ्या …अन घरला जा.
बर…बापा..तुयासारखे सायेब पाईजे..तुले गरीबाची जान हाये…
गंगा आजी बजार घेऊन घरी आली…
बर सारजा काय म्हनत व
अव समद्या गावात बोंब झाली हुती तुले पोलीसान पकडल म्हनुन…
काय बीचारे ….पकडल हुत …सोडून बी दिल मंग..मायाजवळ कुठल्ले पैसे …बर ते जाउ दे
बस…भात्क खावुन जाय.
लय दिस झाले माय…या करोनान मले भात्क नाई भेटल
देव आजी..वरून उलीसा कांदा टाकजो..
माया धन्याले बी देजो उलीसा…
त्यायला बी लय आवडते.
ज्योती रामटेके







