संध्याकाळची वेळ होती, सर्व कामे नुकतीच आटोपली…इतक्यात फोनची बेल वाजली, फोन हाती घेतला तर माझी बालमैत्रीण पिंकीचा होता. मी म्हणाले,
‘बोल पिंकी कशी आहेस? तब्येत वगैरे ठीक आहे ना .?’ तर ती म्हणाली
‘हो ग मी छान आहे.. तू कशी आहेस?’
मी म्हणाले,‘एकदम मजेत’
तर ती म्हणाली,
“अगं ऐक ना..! मी एक ऑनलाईन बिझनेस जॉईन केला आहे, तुला सांगावेसे वाटले म्हणून फोन लावला.. तु होतेस का गं जॉईन?’‘. नाही ग मला वेळच नाही..मला जमणार नाही.’ अशी कारणे सांगून मी तिला टाळू लागले.
तर ती म्हणाली,’अग मी अपंग असून नविन काहीतरी करण्यास सतत धडपडत असते, तू तर चालणारी, चारचौघात जाणारी असूनही कंटाळा करते…बघ विचार करुन पटलं तर.
’बरं ठीक आहे बघेल पटलं तर’.
असं म्हणून मी फोन ठेवून दिला.
आणि तिच्या बोलण्याचा विचार करू लागले.
दोन-तीन महिन्यापूर्वी मी तिच्या घरी गेले होते.
तेव्हा मला ती कृश अंथरुणाला खिळलेली दिसली . तिला लहानपणापासून पोलिओने ग्रासले होते. तरीही
नेहमीच आनंदात आणि उत्साहात असलेली पिंकी त्यदिवशी का कुणास ठाऊक खूपच हताश आणि निराश दिसत होती. तिला त्या अवस्थेत बघून मला खूप वाईट वाटले तिचा हात हातात घेऊन मी तिला विचारले, ‘का ग कशी आहेस..?’ तर ती अगदी चक्क रडायला लागली आणि म्हणाली,
‘आता सहन होत नाही ग..!’
मी म्हणाले, ‘ हिम्मत ठेव..! अशी खचून जाऊ नकोस… नेहमीच आनंदात , उत्साहात राहणारी तू.. तुला एवढी हळवी झालेली मी कधीच पाहिलेले नाही,
‘अगं नातेवाईकां समोर हरले ग… ते मला अपमानित करतात विचारत नाहीत’.
‘का ग तुझा भाऊ वहिनी काही अडचण आहे का? मी बोलू का त्यांना?.
तर ती म्हणाली,
ती तर देवमाणसे आहेत ग. त्यांच्यामुळे तर मी जिवंत आहे.
तिन्हीसांजेची वेळ झाली.
तिच्या लहान वहिनी अनुने देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावुन नंदेच्या पाया पडली, पिंकीने सुध्दा अनुला तोंड भरून
“ सुखी रहा”
असा आशीर्वाद दिला. आजकालच्या काळातही असे संस्कार पाहून मला आश्चर्य वाटले. अनु हसून मला म्हणाली,
‘ताई..कशा आहात? येत जा मैत्रिणीला भेटायला. त्यांनाही छान वाटते.’ मी हसून हो म्हणाले. मला खुशाली विचारुन ती चहा ..पाणी करण्यासाठी स्वयंपाक घरात निघून गेली. मी पिंकीला म्हटले,
‘का गं.? ही रोजच तुझ्या पाया पडते की आजच मी आले म्हणून.?
ती म्हणाली,
‘नाही ग रोज पडते. अगं..! खूपच छान आहे, माझ्यामुळे ती सतत कामात असते, घरात अडकून असते, माहेरी पण जायला मिळत नाही.
पण तरीही तिची काहीएक तक्रार नाही, आणि ही माझी छकुली…’
तिच्या उशापाशी एक मुलगी
नुकतीच येऊन बसली होती. तिच्या गालावरुन हात फिरवत मला सांगू लागली.
‘ही माझी छकुली माझी तर जणू दुसरी आईच आहे..! मला कधीच एकटे सोडत नाही, माझे सर्व काळजीने करते…’ छकुली तिच्या भावाची मोठी मुलगी.
पुढे ती म्हणाली,
‘अगं विकास ची खूप काळजी वाटते. त्याला काम नाही, वरून दोन मुली, तरी सर्व कर्तव्य निमूटपणे पार पाडतो गं..! ‘
मी विचारले,
विनय दादाचा फोन वगैरे येतो का कधी?. तिकडे नेत असेल ना तुला तो
अधून मधून?.
तर ती म्हणाली,
‘नाही गं..! त्याने तर आमच्याकडे चक्क पाठ फिरवली, चक्कर तर सोड पण साधा फोनवर चौकशी सुद्धा करत नाही’. असे म्हणून तिचा हुंदका दाटून आला.
विनय पिंकीचा मोठा भाऊ, तो असाही वागू शकतो मला नवल वाटले. तर ती पुढे म्हणाली,
‘अगं..आपल्या मुलाबाळात, संसारात रमला ग तो…आपल्याला एक अपंग बहिण आहे याचीसुद्धा त्याला आठवण नाही’.
नंतर ती पुढे बोलू लागली,
‘आई बाबा वारले तेव्हा परक्यासारखं आला.एक दिवस मुक्काम केला आणि जातांना चक्क वाटणीची भाषा बोलू लागला. तर माझा छोटा भाऊ म्हणाला की,
‘ दादा माझी मनस्थिती ठीक नाही. आपण या विषयावर नंतर बोलु.’
तर तो म्हणाला, ‘आत्ताच बोला काय ते मला नंतर वेळ नाही.’ मग मीच मध्ये बोलले.
दादा…. तो म्हणतो ते खरे आहे. आमची परिस्थिती फारच नाजूक आहे. आई बाबा गेले, बाबा गेल्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद पडला.
विकासला कामही नाही. तरी तो रोज मिळेल ते छोटे-मोठे काम करतो. त्यामुळे कसातरी आमचा उदरनिर्वाह होतो.
दोन मुली, पत्नी ,मी अशी अपंग… एवढ्या सर्वांच त्याला पालन-पोषण करावं लागते…. मी पण ट्युशन वगैरे घेऊन मिळेल तसा त्याला हातभार लावते’. तर तो नुसता ऐकत होता. दादाची बायको तिथे बसून सर्व बोलणं ऐकत होती.
ती मध्येच आपल्या तोऱ्यात म्हणाली, ‘तुमचे रडके गर्हाने ऐकायला थांबलो नाही. मुद्याचं काय ते बोला. तुमचं भागत नाही ना?’. मग माझ्याकडे पाहून मला म्हणाली,
‘तुमचा जगून तरी काय उपयोग.? मरा की’.
“नुसता खायला काळ अन् भुईला भार”.
आणि
विकास कडे बघून म्हणाली, ‘एक काम करा.. हिला ढकल गाड्यात बसवा, भीक मागेल ही, हिला पाहून कोणीही दोन-चार रूपयाची भीक नक्की च देईल… त्यावर जगा.
भागेल तुमचं..पण दादा कांहीच बोलला नाही. मी माझ्या लाचार परिस्थितीला बघून खूप रडले.
मी तिला शांत करत म्हटलं,
‘मनावर घेऊ नकोस, होईल सर्व नीट…’ तेवढ्यात अनुने चहा आणला. आम्ही सर्वांनी चहा घेतला.
अनु म्हणाली,
पिंकी ताई.. रडू नका,आम्ही आहोत ना..! तुम्ही एकट्या नाहीत.
मी निरोप घेऊन निघाले. निघता-निघता अनुला म्हणाले,
मला माहित आहे तुम्ही तिची खुप काळजी घेता, तरीपण मी सांगते ग..!
‘ तीला दुखवू नका.’
ती म्हणाली,
‘नाही ताई..! आम्ही त्यांची सर्व काळजी घेतो.’ आणि मी घराबाहेर पडले. मनात एकच विचार घोळत होता. एवढा बदलला तिचा मोठा भाऊ..?
आपल्या लहान बहिणीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे ज्याने जपले तो हाच..?.
विश्वासच बसत नव्हता.
पिंकीचे पूर्वीचे आयुष्य आठवले. दोन भावंडांमध्ये एकुलती एक बहीण, मोठा भाऊ विनय आणि छोटा विकास, मधली पिंकी. तिच्या आई- वडिलांची आर्थिक परिस्थिती मजबूत होती. घरचा स्वतःचा व्यवसाय, घर सतत माणसांनी गजबजलेले. तिला लहानपणी कशा ..कशाचीच कमतरता नव्हती. अगदी सुखात दिवस होते पूर्वीचे… वडील काहीसे अबोल फारसे कोणाशी बोलत नव्हते. आई मात्र सुंदर, उंच तसेच हसतमुख स्वभाव, लाघवी बोलणे आणि प्रेमळ अशी होती.
तिने पिंकीला अगदी च राजकुमारी प्रमाणे वाढवले, पिंकी होतीही तशीच एखाद्या राजकुमारी सारखी गोरी, मोठे डोळे, लांबसडक काळे-भोर केस आणि गोड आवाज. परंतु अशा पिंकीला काळाची नजर लागली.
अचानक एके दिवशी……
ती तापाने फणफणली आणि त्यातच तिचे दोनही पाय कमरेपासून लुळे पडले.
तिच्यावर खूप औषध उपचार केले. पण काहीही गुण आला नाही. डॉक्टर म्हणाले,
या दुखण्यातून….
“ती आता कधीच बरी होणार नाही”. दुडुदुडु धावणारी आपली लाडकी लेक अशी अचानक लुळी पडलेली बघून आई-वडिलांना खूप वाईट वाटले.
पण पिंकी हरली नाही. नशीबात आलेले भोग तीने आनंदाने स्वीकारले.
पायावर चालणारी पिंकी आता रांगू लागली.
मला आठवते तसे ती रांगतच होती. आपण चार-चौघी पेक्षा कुठे कमी आहोत किंवा वेगळे आहोत असे तिने कधीच कोणाला भासू दिले नाही. तिचा मोठा भाऊ कुठेही तिला आनंदाने कडेवर उचलून नेत असे. अगदी तिचे कॉलेजचे शिक्षण संपेपर्यत.
पिंकीने अशा बिकट अवस्थेत सुद्धा जिद्दीने एम.ए. ची पदवी मिळवली.
ती केव्हाच हरली नाही का आपल्या अपंगत्वाला लाजली नाही. आमच्या सोबत सर्व खेळ नॉर्मल मुलीप्रमाणे ती खेळत होती. भराभर जिने चढत उतरत होती, सागरगोटी, लपा-छपी, अशी सर्व खेळ आम्ही खेळत होतो. पाय नसूनही ती…
रांगत तिच्या आईला सर्व घर कामात मदत करत असे. झाडून घेणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे, अशी सर्व कामे आनंदाने करीत होती.
मंजुळ आवाजात आम्हाला गाणे, पोवाडे गाऊन दाखवत होती.
आम्हाला तिच्यासोबत खूप करमत होते.
गल्लीमध्ये कुठलाही समारंभ असला तर ती त्याचे अध्यक्षपद आनंदाने पार पाडत असे. आमच्यावर जणू तिची एक प्रकारे जरब होती. तिची आई सुद्धा आमच्या….
सोबत मैत्रिणी प्रमाणे राहत होती.
असे दिवसामागून दिवस सरकत गेले.
मोठ्या दादाचे लग्न ठरले.छानशी वहिनी घरात आली. दादा आणि वहिनी दोघेही कमावते, त्यांनी हळूहळू आपला स्वतंत्र संसार थाटला. हळूहळू त्यांनी घरी सुद्धा येणे बंद केले.
अचानक पिंकीच्या आईची तब्येत एक दिवस खालावली आणि छोट्याश्या दुखण्याने त्यांची प्राणज्योत मालवली. तिचा तर कोणी प्राणच काढून घेतल्यागत झाला. आईचा आधार गेला तरीही तिने बाबाकडे बघून आपले दुःख गिळले…. आई गेल्यापासून बाबा आतल्या आत मनाने खचत चालले होते. आणि ते ही एक दिवस आई पाठोपाठ निघून गेले.
आता
पिंकी आणि तिची लाचार परिस्थिती हमसून हमसून रडू लागली. हसती खेळती पिंकी अबोल झाली.
“आपला जगून तरी काय उपयोग”?. आपण असे लाचार, असहाय्य,
दुसऱ्यावर अवलंबून, आता आपले कोण हक्काने करणार?.
तिच्या छोट्या भावाने तिला
या दुःखातून बाहेर काढले. तिची जबाबदारी आनंदाने स्विकारली.
ती हळू-हळू या परिस्थितीतून बाहेर येऊन पूर्ववत होऊ लागली. लहान मुलांच्या ट्युशन वगैरे घेणे, त्यांना देवाचे आरती, भजन शिकवणे, कथा सांगणे, तिचा वेळ आता आनंदाने जाऊ लागला.
आपण मिळवलेल्या ट्युशनच्या पैशातून तिच्या भावाला थोडीफार मदत होऊ लागली. तिचा मोठा भाऊ पैसेवाला असूनही त्यांना पैशाची मदतच काय तर साधी खुशाली सुद्धा विचारत नव्हता.
पण तरीही…
“वेड्या बहिणीची, वेडी माया”
ती म्हणते..
‘माझा दादा जिथे असेल तिथे सुखी असो’. तसेच, ‘माझा लहान भाऊ- वहिनी यांच्या सुद्धा सर्व इच्छा पूर्ण होवोत, त्यांना आयुष्यात सुख मिळो’.
जीवन देणे आणि घेणे हे परमेश्वराच्या हाती असते, फक्त ते जीवन कसे जगावे हे आपल्या हाती असते.
आज दुःख आहे तर उद्या सुख येईलच. माणसाने जीवनात आशावादी राहावे, थोड्याशा दुःखाने खचून जाऊन आत्महत्या करणे यावर पर्याय नाही. तिने नशीबाने आपल्या पुढ्यात जे वाढल ते आनंदाने स्विकारले.
– दर्शना भूरे








आयुष्यातील अस्थिरता छान मांडली