हरवून गेल्या जाणिवा-सत्यकथा
हरवून गेल्या जाणिवा-सत्यकथा

हरवून गेल्या जाणिवा-सत्यकथा

हरवून गेल्या जाणिवा
सौ. दर्शना भुरे

 

आईने खूप दिवसांपासून मागे तगादा लावल्यामुळे ओवीने कपाट आवरायला घेतले आणि कपाट आवरता आवरता ओवीच्या हाती जुन्या फोटोंचा अल्बम लागला..
अल्बम खूप जुना असल्याने खिळखिळा झालेला होता. त्यामुळे त्यातील सर्व फोटो ओवीने दुसऱ्या अल्बममध्ये लावायला घेतले सुधा ओवीची आई ती पण ओवीच्या मदतीला होती.
अल्बममध्ये फोटो लावत असता ओवी तिच्या आईबाबाचे लहानपणापासूनचे ते शाळा-काॅलेजातील एकेक फोटो कुतुहलाने न्याहाळू लागली ..
तेव्हा तिला त्यात  कितीतरी जुने चेहरे असलेले फोटो सापडले. त्यामधील एक अनोळखी चेहरा वगळता ओवीला बाकी सर्व चेहऱ्यांची ओळख पटत होती.. तो अनोळखी चेहऱा राहून राहून तिचे सतत लक्ष वेधून घेत होता. कोणाचा असावा तो चेहरा.. यापूर्वी तर कधी पाहिल्यासारखा वाटत नाही. या विचाराने बराच वेळ आपल्या स्मरणशक्तीवर जोर देऊन तिने त्याला ओळखण्याचा प्रयत्न केला पण तरी ओळख पटत नाही हे पाहून मग तिने तो फोटो आईलाच दाखवत विचारले
आई ही आजी कोण आहे ग?
बघ न कशी वेगळीच दिसते .. कशी हुप्प उभी आहे फोटोत..जराही हसू नाही आहे हिच्या चेहऱ्यावर .. किती निर्विकार चेहरा आहे.ना काही भाव ना भावना.
ओवीचे बोलणे ऐकून..
तिच्या हातातील फोटोवरून नजर फिरवित आई तिला म्हणाली,
अग..ही मोठ्याआईची चुलत बहीण आहे. आम्ही मुले तिला वैकुंठाआजी म्हणायचो..तिचे नाव वैकुंठा होते .
ओवीने विचारले, आणि ही मोठीआई म्हणजे तुझी आजी ना…
हो तिच ती आम्ही आमच्या वडिलांच्या आईला मोठीआईच म्हणत होतो…
ओवी- पण किती गंभीर दिसते न तुझी वैकुंठाआजी..

आई- अग कोणीही माणूस जन्मतः असा नसतो ओवी..
त्याची परिस्थितीच त्याला गंभीर बनवते…
प्रथा, परंपरेला महत्त्व देणारा पूर्वीचा काळ..त्या काळातील माणसे विषेशतः
स्त्रिया खूप मर्यादित जीवन जगत असत.. खूप सोसले ह्या आजीने..

खरेच का ग आई..
यातील प्रत्येक फोटो मागे काही ना काही आठवणी लपलेल्या आहेत ओवी..
किती छान न आई… या सर्व जुन्या फोटोंच्या रुपात तुझ्या जुन्या आठवणींचा पेटाराच जपून ठेवला तू ..
आईच्या हातून फोटो घेत ओवी आईला म्हणाली,
खरे आहे ग ह्या आजीचा चेहरा आज नजरेसमोर पाहून त्यांच्या आठवणींचा सर्व डोंगरच माझ्या नजरेसमोर उभा राहतो आहे..
त्यांचा तो भारदस्त आवाज ..
कडक व्रत नियम आजीची फोटोतील छबी न्याहाळता न्याहाळता सुधा आजीच्या आठवणीत पुर्णपणे हरवून गेली..
मोठीआई आणि वैकुंठाआजी चुलत बहीणी उमरगावसारख्या खेड्यात दोघी लहानाच्या मोठ्या झाल्या.. एकत्र खेळल्या बागडल्या.. वैकुंठाआजी माझ्या मोठीआईपेक्षा बरीच मोठी..
गोरीगोमटी , थोडीशी बुटक्या बांध्याची वैकुंठा आजी .. वेळप्रसंगी जरा तापट स्वभावाची असली तरी आपल्या बोलण्यात कायम गोडवा ठेवी..
थोडक्यात सांगायचे झाले तर मी असे म्हणेंन की ही आजी जेवढी प्रेमळ तेवढीच रागीटही होती. तेव्हा आम्ही मुले तिला जरा वचकूनच राहत होतो. पांढऱ्याशुभ्र रंगाची काष्टा नेसलेली नववारी साडी, गाठ बांधलेली चोळी,कपाळावर काळा बुक्का लावलेली अशी आजी आम्हाला जरा चमत्कारिकच वाटे..
जेव्हा केव्हा आमच्या कडे ती येई तेव्हा ..
जानकी…कोणी आहे का घरात…असा बाहेरील व्हरांड्यातूनच बहिणीला आवाज देतच घरात येई..तेव्हाच्या तिच्या येण्याने , तिच्या आवाजाने घर अगदी भरल्यासारखे वाटे..
.आजीच्या डोक्यावरचा पदर कधीही खाली पडलेला मी पाहिला नाही..
माझ्या मोठ्याआईचे नाव जानकी होते. मोठीआई वैकुंठाआजीच्या काकाची मुलगी..तिच्या पेक्षा वयाने लहान, लहान बहीणीत वैकुंठाआजीचा खूप जीव.. घासातला घास ती बहिणीसाठी ठेवी.
सासरच्या रीत रिवाजानुसार..
कुठलाही सणवार वैकुंठाआजी अगदी उत्साहाने साजरा करीत होती. दिवाळीच्या दिवशीची आजीच्या हातची नक्षीदार मुरड पाडून केलेली जिभेवर लगेच विरघळणारी खुसखुशीत करंजी आणि जाळीदार अनारश्याची सर कोणालाही येत नसे…
मोठीआई सांगत होती तिचे माहेर मोठे..घरची जमीनदारी असल्याने त्या सर्व भावंडांचे बालपण थाटामाटात गेले होते..घरी सर्व भाऊ एकमेकांना धरून राहत..
माहेरी चार चुलते आणि तीन आत्या सर्वात मोठा चुलत्याचे नाव मधुकर , मधुकरची तीन मुले विरेंद्र,वामन व सदाशिव आणि तिघांच्या पाठीवर जन्मलेली लहानगी वैकुंठा.. चुणचुणीत गोबऱ्या गालाची वैकुंठा एकुलती एक म्हणून आई वडीलांची लाडकी तर होतीच शिवाय तिचे तिन्ही भाऊपण तिला जिवापाड जपत..
मोठीआई तीन नंबरचा भाऊ सुधाकर ची मुलगी मोठ्याआईचे नाव जानकी, जानकीला दोन बहिणी कांता, शांता आणि एक भाऊ वारीषेन,
तसेच इतर दोन चुलते दिवाकर, शिवंकर , निमा, नर्मदा, रत्ना अशा तीन आत्या त्या सर्वांची प्रत्येकी दोन -दोन, तीन-तीन मुले ..सर्वात मोठा चुलताच घरातील कारभार सांभाळत असे … त्यांच्या प्रत्येक शब्दाला घरीदारी मान होता.
वैकुंठाआजीचे सासरही गडगंज पैसा अडका सोने नाणे कशाचीही ददात नव्हती.. एकंदरीत वैकुंठाआजीने सासरच्या बाबतीत नशीबच काढले होते पण…
ओवीसोबत बोलताना सुधा वैकुंठाआजीच्या आठवणीत   हरवून गेली..

क्रमशः

वैकुंठा आजीचे जीवन उलगडत जाणारी ही सत्यकथा.तिच्या हरवलेल्या जाणिवांचा हा प्रवास ….कथामालिकेबाद्दल तुमचा अभिप्राय अवश्य कळवा.

पुढील भागाची लिंक

https://marathi.shabdaparna.in/३-हरवून-गेल्या

4 Comments

    1. Mohini1408

      छान सुरुवात, आवडेल आम्हाला पण वैकुंठा आजीचा जीवन प्रवास वाचायला.
      उत्तम , सहज सोपी भाषा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!