स्वप्न तहानलेले-ज्योती रामटेके
धवल,कनक,आनंदी आणि वाडा यांची ही कथामालिका
१-स्वप्न तहानलेले
आंनदी कितीतरी वर्षांनी माहेरी निघाली होती.
माहेर कसले आता…आई बाबा गेले आणि माहेर संपले. शेतीच्या कागदपत्रांवर सही हवी म्हणून दादा.. वहिनी आग्रहाने बोलवत होते. तसेही आता माहेरची ओढ संपलीच आहे.
आंनदी झाली का तयारी?
धवलने आवाज दिला.
नाही हो. करते आता.
मुलांचे आवरता.. आवरता.. वेळ कसा गेला कळलेच नाही.
बरं. आवर लवकर.. रामू आला आहे. तुला स्टेशनवर सोडून रामूला परत त्याच्या खेड्यावर जायचे आहे.
तुला गाडीने जा म्हंटले पण तुही लहान मुलांसारखा हट्ट करतेस आनंदी.
मुलांना सांभाळून घेऊन जा. रेल्वेचा प्रवास आहे. जपून जा.धवलला काळजी वाटत होती.
मुले लहान आहेत म्हणून काळजी वाटत आहे मला.
धवल किती काळजी करणार तुम्ही? अहो.. या चार भिंतींच्या आड जीव गुदमरून गेला आहे मुलांचा.
कुठे फिरायला जायचे म्हटले तर तुम्हाला वेळ नसतो. मामाचे गाव कसे दिसते हे पण मुलांना कळेल. सर्व मित्र मामाकडे जातात.
कालच पुर्वी म्हणत होती,
आई चल न ग कुठेतरी? मी पण कंटाळली आहे घरात राहून. मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी आतूर झाली मी. लोकांची वर्दळ.. गर्दी बघून बरीच वर्षे निघून गेली आहेत.कुठे फिरायला गेलो असतो तर मजा आली असती. आता माहेरी जायची इच्छा नाही होत. पण या वेळी मुले खूप मागे लागलीत.
दादा वहिनीचे फोन येऊन गेले म्हणून जाणे आहे.
आपले लग्न झाले तेव्हा गेलो होतो फिरायला. नंतर नाहीच जमले. तुम्ही दिवसभर कामात व्यस्त. सुरवातीला वेगळ्या वातावरणात रुजायला वेळ लागला मला नंतर हळूहळू जमले सर्व.
नंतर मुले झाली आणि सारे बदलून गेले. माझ्या घरी भरपूर माणसे. लहानपणापासून एकत्र कुटुंब.भरपूर लोकांची सवय. लग्न झाल्यावर मी एकटी पडली. तुमचे श्रीमंत घराणे. जाणीवपूर्वक मी काही बंधने स्वतःला लावून घेतली.
हो ग.खरयं तुझे सगळे म्हणणे.
माझ्याशी,आपल्या संसाराशी एकरुप झाली तू.त्यासाठी स्वतः बदलली.मलाही तुझ्यासोबत,मुलांसोबत वेळ घालवावा वाटतो पण कामाचा व्याप वेळ देत नाही.
आंनदी तुझ्या गावातील तो सुंदर वाडा आहे की विकला त्यांनी? जुना वाडा विकून लोकं पैसे कमवायला लागली म्हणून सहजच विचारले.
अग अजून एक आठवलं बघ. त्या वाड्यात एक सुंदर मुलगा होता. काय नाव होते त्याचे. आठवले.
कनक हो कनकच नाव होते . तुझ्याच वर्गात होता नं तो.आपल्या लग्नात आणि नंतर एकदा भेटलो होतो मी त्याला.
गायचाही उत्तम असे ऐकले होते.
कनक गाव सोडून दूर निघून गेला असे मला कुणीतरी सांगत होते.
बरं झाली का तयारी?
आंनदी डोळ्यातील अश्रू लपवत गाडीत बसली.
आंनदी लवकर ये. तू घरी नसते तेव्हा घर सुने.. सुने वाटते. धवलचा चेहरा उतरला होता.
गाडी स्टेशनवर कधी पोहचली कळले नाही.
बापरे! आई किती गर्दी!
कुठे जात असतील हे सर्व. रोज अशीच गर्दी असते का ग? प्रश्नांची सरबत्ती सुरू होती पुर्वीची.
रेल्वे आली. मुले खूष होती. ते प्रथमच रेल्वेने प्रवास करत होते.त्यांना मजा वाटत होती. मोकळ्या वातावरणात, लोकांच्या गर्दीत हरवून गेले होते ते.घरात सतत त्यांच्या कडे लक्ष. त्यांना नाही आवडायचे ते.
आंनदी खिडकीतून बाहेर बघत होती. रेल्वेच्या वेगात झाडे किती प्रंचड वेगाने मागे जात होती. आपले आयुष्यही असेच वेगाने सरकत आहे. काळ किती ताकदवान असतो नं.. प्रत्येक गोष्ट विसरायला भाग पाडतो. तरीही काही जखमा आतून भळाभळा वाहत असतातच. अदृश्य रुपात सतत छळत असतात.
आई.. आई.. पुर्वीच्या आवाजाने आंनदी भानावर आली. मामाचे गाव अजून किती दूर आहे?
पुर्वी विचारत होती.
का ग कंटाळली का?
नाही ग, मला तर गाव येऊच नये असे वाटत आहे.किती मजा वाटत आहे रेल्वेने.आता आपण दरवर्षी येत जाऊ.
हो नं आई
रुद्र विचारत होता.
मला तर खूपच मजा येत आहे पुर्वी बोलली.
मध्येच रेल्वे थांबली. तिला सिग्नल मिळाला नव्हता. कुठेतरी जंगलात थांबून होती. रात्रीच्या वेळी बाहेरचे जंगल अंधाराने व्यापून गेले होते.
रुद्र, पुर्वी जेवण करून झोपी गेली.त्यांच्या चेहऱ्यावर आज वेगळेच तेज दिसत होते. लहानपण किती निरागस, भाबडे असते नं.
का मोठे होतो आपण…आंनदी मनाशी पुटपुटली.
धवल कसा असेल ? जेवला कि नाही? बघते फोन करुन.
धवलच्या काळजीत तिचा जीव गुंतला होता. फोन लागत नव्हता. गाडी सुरू झाली. पोहचायला रात्रीचे बारा वाजणार होते. ओळखीचे एकेक गाव मागे पडत होते.
त्या नीरव शांततेत डोळ्यासमोर सारखा कनकचा चेहरा येत होता.जस..जसे.. गाव जवळ येत होते तशी त्याची आठवण व्याकुळ करायला लागली.
एक गाणे तो तिच्यासाठी नेहमी गायचा.आजही ते गाणे तिच्या तोंडपाठ होते. मनातच ती गुणगुणायला लागली.
गीत आसावले तुझ्यासाठी
सूर खोळंबले तुझ्यासाठी
तू मला अर्थ दे अजून तरी
शब्द ओलांडले मी तुझ्यासाठी….
तेवढ्यात धवलचा फोन आला. तो काळजीत होता.
नीट सांभाळून जा,माझी काळजी करु नको…असे सांगून धवलने फोन ठेवला. त्याच्या सोबत बोलल्यावर आंनदीला हायसे वाटले.
क्रमशः
प्रिय वाचक,हा कथामालिकेचा पहिला भाग.
तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा.तुमचा प्रतिसाद,तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाची आहे.







अप्रतिम …
खुप छान सुरूवात
Khup chhan siruwat…katha chhanch asel
कथेची सुरुवात छान