शरदरावांची आज पंचाहत्तरी आटोपली.
घरात राहणारे दोनच जीव कावेरी आणि शरदराव .
घर आज घरासारखे वाटले जवळच्या लोकांच्या येण्यामूळे.
मित्र ,जवळचे नातलग,मुलगा,सून, नातू शांतनू आले होते.
कार्यक्रम संपल्यानंतर शरदरावांचा बावीस वर्षांचा नातू शांतनू आजोबांना आत्मचरीत्र लिहा म्हणून मागे लागला.
पंचाहत्तर वर्ष म्हणजे तसे भरपूरच कि.
नेहमी हसत खेळत दिसणाऱ्या आजोबांच्या आयुष्यात काय काय गमती जमती घडल्या असतील त्या आम्हाला कळायलाच हव्या.
इति शांतनू.
शांतनूच्या म्हणण्याची सगळ्यांनीच री ओढली.
शरदरावांना पण वाटले-
लिहावे का आत्मचरित्र?
परत सगळे आयुष्य आठवेल आपल्याला? ते आनंदाचे,दुःखाचे अनुभव
गोड,कटू अनुभव
प्रेम,रागाचे अनुभव
सगळे आठवून परत ते सगळे पचवू शकू आपण?
आणि आपण पचवले तरी ज्यांच्यासाठी आपण हे लिहिणार ते तेवढ्याच असोशीने समजून घेणार?
बघू या म्हणत शरदराव एक मोठ्ठी डायरी आणि पेन घेऊन लिहायला बसले.
शरदरावांना काही आठवावे लागलेच नाही.
पटपट सगळ्या स्मृती समोर यायला लागल्या.
जवळपास सत्तर वर्ष मागे गेले.
पाच सहा वर्षाचा शरद.
रस्ते ,विज नसणाऱ्या खेड्यात राहणारा,पण तेव्हा आपण विजेविना राहतो याची तेव्हा जाणीव नसणारा.
वीज माहीतच नव्हती त्याला.
काहीही आणायचे तर बाजूला असणाऱ्या गावी जावे लागायचे.
अगदी तेल,गुळ,दळणआणायचे तरी.
कधी गावाला जायला नाही मिळाले तर आई घरीच जात्यावर दळायची.
दळण दळतांना गोड आवाजात ओव्या म्हणायची.
आपल्या आईच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य कसे ?
याचे शरदला नेहमीच नवल वाटायचे.
शरदचे खेड्यात निसर्गाला बिलगून डोंगरांच्या मध्ये वसलेले झोपडीवजा कौलारु घर होते.
घरात आई,बहीण आणि शरद.
घराला कुडाच्या भिंती.
दिवाळी आली कि आई त्या भिंतीही थोड्या लिंपून जमिनीसारख्या सारवायची.
घरात दोन खोल्या.
एक समोरची पडवी आणि दुसरी स्वयंपाक खोली.
आत्मचरीत्र- मराठी लघुकथा
फड्याने झाडून झाले कि आई खोलीचे कोपरे आधी पांढऱ्या मातीने सारवायची. नि मग शेण कालवलेल्या पाण्याने सारवायची.
त्या शेणाचा सुगध दरवळतोय आजही शरदच्या मनात.
आताचे फिनाईल आणि तेव्हाचे शेणाचे सडा,सारवण यांची तुलना होऊ शकेल?
तो सडा,सारवणाचा सुगंध शांतनू अनुभवू शकेल?
सहा वर्षाचा झाल्यावर शरदला शाळेत टाकायचा विचार केला आईने.
बाजूच्या गावात मॕट्रीकपर्यतशाळा होती.
शरद तिथेच जायला लागला.
शाळा नदीच्या काठी.
शाळेसमोरच वडाचे मोठे झाड,
त्या झाडाच्या आजूबाजूने बांधलेला पार.
शाळेच्या मधल्या सुट्टीत वडाच्या पारंब्यांना लोंबकळणारी शाळेतली मुले.
चवथीपर्यतची शाळा म्हणजे एक मोठी खोली आणि चार कोपऱ्यात चार वर्ग.
शाळेला सुट्टी झाल्यावर मुले थोडावेळ तिथेच खेळायची.
विटीदांडू,लगोऱ्या…..
घरी जायची घाई नाही अन् मुले कुठे आहेत याची घरच्यांना भीती नाही.
लगोऱ्या खेळायला कापडाचा बनवलेला चेंडू
सगळे कसे चित्रपटापेक्षाही झरझर सरकत आहे नजरेसमोरुन.
आताच्या computer, projector ने सुसज्ज असलेल्या शाळेशी तिची तुलना नाही होऊ शकणार.
जगण्याचे,माणूसकीचे शिक्षण मिळायचे त्या शाळेत.
Technology चा गंधही नव्हता शाळेला म्हणून यांत्रिकपणाही नव्हता.
आणि शाळा खाजगी झाल्या नव्हत्या म्हणून व्यावसायिकपणाही नव्हता.
शाळेत नदी ओलांडून जावे लागायचे.
आई पण शरद सोबतच निघायची नदीवर घरचे कपडे धुवायला.
ती नदीवर कपडे धुण्याची मजा,
तो कपडा नदीत लांब सोडला कि हवेमूळे फुगायचा ते बघतांना होणारा आनंद वाॕशिंग मशीन वाल्या पिढीचा प्रतिनिधी असणारा शांतनू उपभोगू शकेल?
तेव्हा त्यांच्या खेड्यात आठवड्यात एकच दिवस बाजार भरायचा.
बैलगाडीत शेतकरी माल आणायचे.
(आता गाड्या पार्क राहतात तशा तेव्हा बैलगाड्या,छकडे उभे असायचे.)
आठवड्याभराचे सगळे सामान तिथेच मिळायचे.
रोजच्या जेवणासाठी घराच्या पुढे असलेल्या अंगणात उगवणाऱ्या भाज्याच आधार असायच्या.
कारल्याच्या वेलीवर येणारी कारली,
वालाच्या वेलीवरच्या शेंगा,
कोहळ्याचा वेल बोंड बनवायला लावायची आई.
ताजी भाजी तोडून त्याची चुलीवर केलेली भाजी सोबत ज्वारीची निखाऱ्यावर भाजलेली भाकर
याची सर शांतनूच्या Online मागवलेल्या पिझ्झा,बर्गरला कशी येणार?
आणि ऊठसुट शाॕपिंगची सवय असलेल्या आजच्या पिढीला तेव्हाचा आठवडीबाजार समजेल?
मातीची चुल आई घरीच बनवायची.
कसलेही शिक्षण नसलेली आई चुल किती तंतोतंत बनवायची.
जेवणासाठी घरात मोजकीच भांडी असायची.
चारपाच ताटल्या आणि तेवढ्याच वाट्या.
वेगवेगळ्या प्रकारची डिनरसेटस् वापरणाऱ्या पिढीला एकाच ताटलीत बहीणभावाने जेवण्यातील मजा कळेल?
घराच्या दारात विहीर होती.
थोडा मोठा झाल्यावर शरद रहाटावरुन पाणी ओढायचा.
घरात पाणी साठवायला मोजकीच भांडी.
एक आईच्या लग्नात आंदण आलेला गंगाळ
आणि एक मोठा रांजण बस्स एवढेच. .
आई विहीरीवर चढून बादलीला दोरी बांधून झपझप पाणी ओढायची.
आईचा दिवस पहाटेच सुरु व्हायचा.
घर,अंगण फड्याने झाडून झाले कि
सडा,सारवण,चुलीवर पाणी गरम करुन आंघोळ,स्वयंपाक करुन शेतात न्यायला एका कपड्यात शिदोरी बांधून नऊ वाजता शरद सोबत आई निघायची.
बहीण दिवसभर शेजारच्या काकीच्या भरवशावर.
आई सांजवेळी घरी आली कि कंदिल आणि दिवा साफ करुन लावायची.
पुढची सगळी कामे त्या मिणमिणत्या प्रकाशातच व्हायची.
एखाद्या दिवशी शेतावर मजुरीला गेली नाही तर विटलेल्या लुगड्यांची मध्ये मुलांचे जुने कपडे टाकून गोधडी शिवायची.
थंडीच्या दिवसात गोधडी अंगावर पांघरुण घेऊन आईजवळ झोपण्यातला आनंद….नाही सांगता येणार.
आईत तेव्हा असलेल्या एनर्जीचे आता शरदरावांना आश्चर्य वाटते.
कसलेही Supplementary Vitamin न घेता अथक काम कशाच्या बळावर?
आजच्या पिढीत एक दिवसही बाई आली नाही कि होणारी तारांबळ…
किती निगूतीने संसार केला आईने.
ही पिढी समजून घेईल आईचे श्रम?
शरदला सातवी पास झाल्यावर मामाने एक रेडिओ घेऊन दिला.
त्या खेड्यात फक्त शरदजवळच रेडिओ होता.
तो रेडिओ घेऊन सुट्टीच्या दिवशी गावभर फिरत राहायचा.
त्याच्याजवळ रेडिओ आहे हे सगळ्यांना समजले पाहीजे हा उद्देश.
सेलवर चालणारा रेडिओ. रोज सेल त्याला कोण घेऊन देणार? आई महीन्यातून एकदाच मजूरीच्या पैशातून सेल घेऊन द्यायची.
कोण आनंद व्हायचा शरदला. हा आनंद वर्षातून एकदा मोबाईल बदलणाऱ्या पिढीतल्या शांतनूला कळेल?
शरद दहावी पास झाला.
दहावी पर्यंत दोनच ड्रेस होते त्याला.
आलटून पालटून तेच घालायचे.
गणवेश हा प्रकार नव्हता त्याच्या शाळेत.
कंपास बाॕक्स,Waterbottle, School bag,
Crayon,वेगवेगळ्या आकाराच्या Waterbottle…हे असले काहीही नव्हते.
गावात दहावीपर्यतच शाळा होती.दहावी झाल्यानंतर आता कुठे शिकायचे?
मामाने त्याला पुण्याला अॕडमिशन घ्यायला सांगितले.
नदीकाठचे आई ,बहीण,सवंगडी असलेले सुंदर खेडे सोडून शरद पुण्याला आला, त्याचे खेडे सुटले.
पण त्याच्या ह्दयात ते तसेच वसले होते.
ती नदी,कौलारु मातीचे घर,शाळा,अन् त्याच्यावर माया करणारी त्याची आई. हे कायमच त्याच्यासोबत होते.
आईच्या तुटपूंज्या मजूरीत शरदचे पूण्याचे शिक्षण होणे अशक्य होते.
शरदने रात्रीच्या शाळेत प्रवेश घेतला.
दिवसा पैसे मिळवायला काही कामे करायची अन् रात्री शिक्षण.
शरद राहायचा त्या खोलीच्या बाजूच्याच खोलीत सुगंधा राहायची.
शरदला आवडायची ती.
तिलाही शरद आवडायचा.
दोघांनी लग्न करायचेही ठरवले होते.
पण शरदला नौकरी लागल्यानंतर सुगंधा त्याला साजेशी नाही,असे वाटायला लागले.
आॕफिसमधल्या एका मित्राची बहीण कावेरी त्याला पसंत पडली.
नंतर नौकरी,कावेरीशी लग्न, संसारात कावेरीने दिलेली साथ, कावेरीचे त्याच्या जीवनात असलेले मजबूत स्थान तरीही मनाचा एक कोपरा सुगंधाचा आहेच.
सुगंधाला फसविले ही बोचही आहेच अजून.
हे कावेरीला कळले तर ती काय विचार करेल?
आणि शांतनु?
gf,bf च्या या जमान्यात आपण जपून ठेवलेला पहिल्या प्रीतीचा सुगंध आणि अपराधीपणाचे शल्य शांतनुला कळले तर तो हसणार नाही आपल्याला?
अशा कैक गोष्टी घडल्या आहेत आयुष्यात आणि कैक निसटल्याही आहेत.
काॕलेजमध्ये असतांना विडीचे लागलेले व्यसन,
पैसे जास्त मिळावेत म्हणून अधून मधून खेळलेला जूगार….आईच्या संस्कारामूळे तरलो. वाहवत जाऊ नाही शकलो.
आजपावेतो फक्त मला माहीत असलेल्या माझ्या कित्येक चुका मीच सगळ्यांना सांगायच्या?
जे मी कावेरीजवळही कधी कबूल केले नाही ते सर्वांना सांगायचे?
आणि मनाला वेदना देणाऱ्या अघटीत घटना.
आणि मनाला वेदना देणाऱ्या अघटीत घटना.
ज्या विसरायला कित्येक वर्ष लागली त्या जखमा मी परत ओल्या कशा करु?
त्यांची खिपली कशी काढू?
आईजवळ दागिने नव्हतेच.फक्त गळ्यात बाबांनी लग्नात घातलेले छोटे मंगळसुत्र मला पूण्यात पाठवतांना मोडावे लागले.
शरद समजला तेव्हा तिच्या भावना.
पण आता ते आठवून
त्या यातना परत नको.
शरदने नौकरी लागल्यानंतर आईसाठी काय काय करायचे याचे मानोरे बांधले होते.
मातीचे घर पाडून त्याला तिथे विटा,सिमेंटचे पक्के घर बांधायचे होते
विहीरीवर मोट लावायची होती.
पण त्याला नौकरी लागल्यानंतर लगेच आई गेली. आई गेली त्या दिवसापासून त्याचे खेडेही त्याला अंतरले.
आठवणी किती वेगात पळताहेत.
आपल्याला उगाच वाटतं आठवणी मागे पडल्या.
एक आठवली कि लगेच दुसरी,तिसरी…
मध्ये एवढा काळ जाऊन एकही आठवण धूसर,अस्पष्ट नाही.
सगळ्या कशा लख्ख आणि स्पष्ट एकापाठून एक येताहेत.
बापाशिवाय गेलेले बालपण, आई,शाळा,सवंगडी, कौलारु घर,नदी,सुगंधा….
नको. नको त्या आठवणी.
त्यांना इथेच थांबवायला हवे.
शरदरावांनी डायरी आणि पेन खाली ठेवले.
मनातल्या मनात पुटपुटत राहिले,
“कोण म्हणतं सर्व दुःखावर काळ हेच औषध आहे.
काही दुःख काळापेक्षाही मोठी असतात.
काळ हेच औषध….विसरेल हळूहळू….असे काहीही नसते.
जखमा शरीराच्या भरतात.
मनाच्या?
मनाच्या जखमा तशाच ओघळत राहतात .पण त्या भरल्या नाही तरी लपवणे सोपे असते.
शरीराच्या जखमेसारख्या त्या दिसत नाहीत कुणाला.”
प्रिती









सुंदर लिहिले
खुप खुप छान
खूपच छान