कागदाचा तुकडा
कागदाचा तुकडा

कागदाचा तुकडा

सोनाली पहिल्याच नजरेत कोणीही

तिच्या मोहात पडावं अशी अतिशय देखणी, गोरीपान , रेखीव बांधा, चाफेकळी नाक, पाणीदार डोळे

पण तिच्या या जन्मजात सौंदर्याला लागलेला कलंक म्हणजे तिला मिळालेला गरीबीचा शाप.

घरात अठराविश्व दारिद्र्य दोन वेळच्या जेवणाची भ्रांत,वरून सावत्र आईचा जांच.

पण सोनालीने याही परिस्थितीला न हरता आपल्या चेहऱ्यावरचे हास्य कायम जपलं.

सावत्र आईच्या जांचामुळे कॉलेज मधील शिक्षण सुध्दा तिला अर्ध्यावर सोडावे लागले होते.

घरात आई-वडील आणि ती, त्यातून वडील सतत आजारी असायचे.

तिची आई तिला घरोघरी स्वतः सोबत स्वयंपाक करण्यासाठी घेऊन जात होती.

घरातील सर्व कामे ,वडीलांची देखभाल आणि आईसोबत घरोघरी स्वयंपाकासाठी फिरणे.. यामुळे तिची होणारी ओढाताण तिच्या वडिलांना पहावत नव्हती.

आपल्या लेकीला आपण तिच्या मनासारखं शिकवू शकलो नाही. या विचाराने त्यांचे डोळे सतत भरून येत. पण त्याला काहीच इलाज नव्हता. बायको पुढे त्यांचे काहीही चालत नव्हते.

हल्ली सोनालीच्या काळजीने तिचे वडील जास्तच आजारी पडू लागले. आणि यातच हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोनालीच्या डोक्यावरील मायेचा हात कायमचा हरवला.

सोनाली आता एकटी पडली होती. क़ुणाचा आधार न उरल्याने सोनालीची सावत्र आई तर आता तिचा जास्तच छळ करू लागली होती.

समीर ज्यांच्याकडे सोनाली स्वयंपाकाला जात होती. त्याच्या नजरेत सोनाली पहिले पासूनच भरली होती.

तो तीला अगदी मनापासून पसंत करीत होता. समीरच्या घरात त्याच्या लग्नाची बोलणी चालू झाली होती.

तेव्हा त्याने सोनाली सोबत लग्न करण्याची आपली इच्छा आहे.असे आपल्या आई-वडिलांना सांगितले. ते ऐकताच ती दोघे ही एकदमच आश्चर्यचकित झाले,

“काय?… स्वयंपाक करणारी एका मामुली घरातील मुलगी आपण आपल्या इथे सून म्हणून आणायची?. शक्य नाही. हे जमणार नाही”

आपले प्रतिष्ठित घराणे आहे. शिवाय समीरला चांगली नौकरी आहे. लोक काय म्हणतील.? समाजात आपलं हसं होईल.

“लोक काहीही म्हणून देत. मला त्यांची पर्वा नाही. मी लग्न करीन तर सोनालीशीच नाहीतर .. नाही”.

 

शेवटी समीरच्या इच्छेप्रमाणे त्याच्या आई-वडिलांनी सोनालीच्या आईशी बोलून तिला मागणी घालण्याचे ठरवलेे.

सोनालीच्या आईलातर आधी एवढ्या मोठ्या घरच स्थळ सोनालीला सांगून आलं. हे खरंच वाटेना. आजपर्यंत ती सोनालीवर सर्व कामे ढकलून ऐषआरामात जगत होती.

पण सोनाली गेल्यावर काय? आपली कामे कोण करणार?. याची तिला चिंता होती. म्हणून त्यामूळे ती तिचे लग्न लावून देण्याचं सतत टाळत होती.

पण श्रीमंत घराणे पाहून तिच्या मनात लालसा उत्पन होऊ लागली होती. आणि याचा गैरफायदा घेण्याचे तिने ठरविले.

समीरच्या घरच्याकडून भलीमोठी रक्कम घेऊन त्याच्या बदल्यात सोनालीचे समीरशी लग्न ठरवलं.

लग्न करून सोनाली उंबरठा ओलांडून सासरी आली. ते घर आणि त्या घरातील लोकं तिच्या आधीपासूनच परिचयाचे असल्याने तिला तिथे रूळायला अजिबात काहीच वेळ लागला नाही. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा समीर सारखा प्रेमळ नवरा मिळाला म्हणून ती मनापासून खूप खुश होती. स़ोनाली साठी खरंच हे सर्व दिवस मंतरलेले होते. आपले नशीब असे एकदम पालटेल असा तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. सगळं काही तिला अगदी भरभरून ‌मिळत होते.

पण तिला एका गोष्टीची खंत वाटतं होती. ती म्हणजे स्वत:चे शिक्षण पूर्ण न करता आल्याची त्यामुळे तिला चार चौघात वावरतांना अगदी अवघडल्यासारखं होत होते.

समीरने तिची ही दुविधा दूर करण्याचे ठरविले. आणि सोनालीने जेव्हा त्याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी भेटवस्तू काय देणार म्हणून विचारले तेव्हा त्याने आपल्या पाठीमागे लपवलेला एक कागद सोनाली समोर धरला आणि तिला म्हणाला,” हे बघ तुझी वाढदिवसानिमित्तची भेट,

काही …ही..

हा कसला कागद मला देताय भेट म्हणून”, ती समीरला आश्चर्याने म्हणाली.

 

” हो हा कागद वाच.

आणि याच्यावर सही कर.

अग तुला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती ना म्हणून मी तुला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी हा दाखला आणला आहे. तेव्हा यावर सही करून तुझे पुढील शिक्षण आनंदाने सुरु कर”.

दाखल्यावर सही केल्यावर सोनाली एकदम खुश होत समीर ला म्हणाली,

वाह वा..

खरंच धन्यवाद समीर.

तू आज मला जगातली सगळ्यांत महागडी वस्तू जरी भेट दिली असती, तरी एवढा आनंद झाला नसता जेवढा आनंद मला ह्या एका कागदाच्या तुकड्यामुळे झाला. ही भेट माझ्यासाठी खरेच खूप अनमोल आहे

. “माझ्या जीवनातील हा सर्वोच्च क्षण मी कधीही विसरणार नाही”.

– दर्शना भुरे जैन

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!