मराठी लघुकथा- तोल
शरद अतिशय देखणा,हुशार आणि उमदा मुलगा….एकुलता एक असल्याने घरात सर्वांचा लाडका IT पुर्ण केलं आणि campus interview मध्ये selection झाले तेही अमेरीकेत…एका नामांकित कंपनीत….घरात आनंदी आनंद होता….मुलगा परदेशी जातोय याचं पालकांना फार कौतुक होतं आणि भिती ही होती….कि तो आपल्याला परका तर होणार नाही ना..!!!
अमेरिकेत शरदची नौकरी सुरु झाली….चांगला दांडगा पगार त्यामुळे सर्व काही मजेत चालु होतं….सर्व सुखसोईंनी परिपूर्ण असं त्याचं आयुष्य रुळाला लागलं होतं…
त्याच्या घरी भारतात मात्र त्याचे दोनाचे चार हात करायचा घरच्यांनी घाट घातला होता
दोन महिन्यांची सुट्टी घेऊन शरद भारतात आला….घरच्यांना वाटले शरदला नौकरी करणारीच मुलगी हवी असेल पण शरदला घर सांभाळणारी गृहकर्तव्यदक्ष मुलगी हवी होती…एक दोन स्थळं पाहील्या नंतर सोनलचे स्थळ आले.
सोनल दिसायला देखणी आणि उच्चशिक्षित पण तिलाही शरद आवडलेला म्हणून तिने नौकरी न करण्याची इच्छा दर्शवली….अगदी साधेपणाने लग्न समारंभ पार पडला…सोनलने घरात छान समतोल राखला सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकिने वागुन तिने सर्वांची मनं जिंकली… पाहता पाहता दोन महिने संपले…
.शरद आणि सोनल अमेरिकेला जायला निघणार होते….त्याच दिवशी सकाळी शरदच्या वडिलांना हार्टअटॅक आला आणि त्यातच ते गेले…
शरदवर घराची पूर्ण जबाबदारी होती….. त्याची मात्र द्विधा मनस्थिती झाली होती,अमेरिकेस जावं की इथेच रहावं….
मनात सतत विचार,आईला एकटीला सोडून ही जाता येत नव्हते….मग त्याने भारतातच रहायचा निर्णय घेतला.. सोनलने हे सगळं स्विकारलं अगदी कसलाही नाराजीचा सुर न लावता.
नौकरी गेलेली,वडिलांच्या आजारपणात झालेला खर्च,घरखर्च हे सगळं म्हणजे शरदची तारेवरची कसरत होती… पण आहे त्यात समाधान मानण्याचा आणि सर्व खर्चांचा ताळमेळ लावण्याचा तोल मात्र सोनलने सावरला होता
त्यात कोरोना नावाचं संकट भारतावरही येऊन ठेपलं… नौकरी मिळत नव्हती उलट कंपन्यांनी आहे तो स्टाफ ही कमी करायला सुरुवात केली…. शरद दिवसेंदिवस अधिकच खचत चालला होता….
त्यातच शरदच्या आईला ब्रेन ट्युमर झाला,आईच्या आजारपणाचा खर्च काही केल्या त्याला झेपेना…मग कर्ज काढलं पण परतफेड कशी करणार हा यक्ष प्रश्न उभा राहीला….
रोज पैसे परत मागण्यासाठी लोकांचे,नातेवाईकांचे फोन येऊ लागले…काही दिवसांनी तर धमक्या पण सुरु झाल्या….शरद पुर्णपणे खचला…एक दिवस घरातुन सकाळीच बाहेर पडला….समुद्र किनारी बराचवेळ भटकला..
. मनात काही तरी घोळत होत… स्वतःला संपवायचं आणि या सर्वातुन सुटका मिळवायची असा विचार डोक्यात घोळत असतानाच,त्याला डोंबार्याचा खेळ करणारी मुलगी दिसली ती दोरीवरुन चालत होती अगदी सांभाळुन एक एक पाऊल टाकत होती…शरद टक लावुन हा खेळ पाहत होता..
.हे विदारक दृश्य पाहता पाहता त्याला जाणवलं ही अशिक्षित मुलगी आणि तिचं कुटूंब एवढ्या हालाखीच्या परिस्थितीत ही स्वतःला तगवुन ठेवु शकतात…स्वतःचा तोल सावरु शकतात मग मी तर उच्च शिक्षित आहे मी असा कसा शस्त्र टाकुन पळतोय….मला लढावं लागेल आणि मी लढणार हा निश्चय करुन असंतुलित झालेल्या आयुष्याचा पुन्हा तोल सावरण्यासाठी सज्ज झाला….
रागिणी पवार, अंबाजोगाई









Chan