भाग-६
तृष्णा
आता तृष्णा कुठे असेल?
हा प्रश्न कायम त्याच्या डोक्यात यायचा.
बाबांना विचारु का तुम्ही घर कुणाला भाड्याने दिले होते का?बाबा काही बोलले नाही तसे.आईला काही माहीत नसेल.ती कधी आलीच नाही इथे.
उद्या बाबांनाच विचारतो.
विचाराच्या तंद्रीत त्याची नजर घरभर भिरभिरत होती.
तृष्णाचे अस्तित्व जाणवणाऱ्या फार कमी गोष्टी होत्या घरात.
पण कधीकाळी घरभर तिचा वावर होता हे जाणवायला त्या पुरेशा होत्या. तिने लिहिलेल्या कविता अक्षरे धूसर झाली तरी तिच्या तरल मनाची साक्ष देत होत्या.
बाजूच्या बेडरुममध्ये बाळाची खेळणी बघून तृष्णा आई होती हे लक्षात येत होते.तिचे आईपण कवितेतही होतेच.
तो दुसऱ्या रुममध्ये गेला.बाळाचा एखादा फोटो दिसेल म्हणून शोध घेऊ लागला.एक उपडी फ्रेम दिसली टेबलवर.पण फ्रेमच्या आतील फोटो फारच पिवळट,अस्पष्ट दिसत होता.
त्याचा चेहरा काही केल्या दिसत नव्हता.
अमोलने फ्रेम तिथेच ठेवली. दुपार झाली होती.भूक लागली होतीच.तो हाॕटेलकडे परतला. येतांना बाहेरच वांग्याचे भरीत,भाकर खाऊन आला.
रुममध्ये कॕसेट नंबर तीन त्याची वाट बघत होती.
त्याने लॕपटाॕप काढला आणि कॕसेट सुरु केली.
तृष्णा नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसून बोलायला लागली.
सख्यासोबत लग्न जूळले आणि संसाराची स्वप्ने बघायला लागली.चैतन्यला आता मनात जागा देणे मला अनैतिक वाटायला लागले. आता सख्याशीच प्रामाणिक राहायला हवे होते.
लग्न जमले तेव्हा घरी फोन नव्हता.
शेजारी होता.आईने सख्याला त्यांचा फोन नंबार दिला.
सख्याने मला फोन करावा असेही आईने आडून सुचवले पण एकही फोन आला नाही,
आईने माझे लग्न जुळल्यावर फोनसाठी नंबर लावला.सख्याला आॕफिसकडून फोन मिळालेला. रोज एकदा तिचा फोन असतोच.
लग्नाला आता एक महिना झाला. पण आमच्या वागण्यात अजून मोकळेपणा आला नाही.मने जुळली नाहीत. सख्याला नव्या संसाराची काही नवलाई वाटत नाही.
मी सिनेमात बघितलेल्या गोष्टी सोबत घेऊन तरंगत आलेली.तो वास्तवाच्या जमिनीवर घट्ट पाय ठेवणारा.
त्याने संध्याकाळी येतांना मोगऱ्याचा गजरा आणावा ,आम्ही दोघांनी सोबत झुल्यात बसावे,मी स्वयंपाक करतांना त्याने मध्ये मध्ये लुडबूड करावी.मी त्याच्यावार लटकेच रागवावे… अशा छोट्या छोट्या गोष्टींचे स्वप्न बघत मी आले.
तो बोलतोही मोजकेच माझ्यासोबत.
नवऱ्यामध्ये मित्र शोधण्याची माझी धडपड यशस्वी होईल का माहित नाही.
आमचे घर गावाबाहेर आहे.सखा दुसऱ्या गावी जाणे येणे करतो. कधी कधी आॕफिसमध्ये उशीर झाला तर येतही नाही.मी फोन केला तेव्हा येणार नाही असे सांगतो.(तृष्णाच्या डोळ्यात पाणी तरळत होते) कालही सखा आला नाही. आज संध्याकाळी येईल.मला भीती वाटते एकटीला इथे. रात्रभर मी जागीच असते.
मनातून काढले तरी कधी कधी स्वप्नात येतो चैतन्य.त्याच्यासोबत माझे आयुष्य कदाचित् ….नाही नक्कीच वेगळे राहले असते.
आमचे दोघांचे घर चैतन्याने सळसळले असते.
पण हे स्वप्न झटकून टाकते मी.तसे आता कधीही होणे नाही.मी आता दुसऱ्याशी बांधले गेले.चैतन्यचा विचार मनी,स्वप्नी कुठेही नको.
(तृष्णाचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले पण लगेच तिने चेहऱ्यावर हसू आणले.तिच्यात अजूनही बाल्य बाकी होते. पटकन हसू आणि पटकन आसू)
मी आता ठरवलं सख्याला जिंकून घ्यायचेच.त्यालाही माझ्याशिवाय कोण आहे आता?
ज्या आईसाठी त्याने लग्नाची घाई केली.ती आमच्या लग्नानंतर दोन दिवसातच गेली.आई जाण्याच्या दुःखामुळे कदाचित् सखा असा वागत असेल. आई म्हणते तसा मी धीर ठेवायला हवा.
पण तो माझ्यासोबत आईबद्दलही काहीच बोलत नाही. तिच्या आठवणी नाही,स्वतःच्य आयुष्याबद्दलही काही नाही आणि माझ्या भूतकाळाविषयीही काही विचारत नाही.
सध्यातरी दोन धृवावर दोघे आपण अशी अवस्था आहे आमची.वाट बघण्याशिवाय मी काय करणार?
आज सखा आल्यावर मी नदीवर जाणार त्याच्यासोबत.कितीदा मी त्याला म्हणते ऐकतच नाही.
मी इथे पहिल्यांदा आली तेव्हा रस्त्याने येता येता दिसली ही नदी.
नदीचे नावही किती सुंदर निर्मला.
निर्मळ पाणी अलेली ती नदी वाऱ्याच्या गतीनुसार धावत राहते.ती समुद्रापर्यंत पोहचत असेल का?
पहिल्यांदा दिसली तेव्हाच मला तिथे थांबायची इच्छा झाली होती.पण सख्याला म्हणायची हिंमत झाली नाही.उद्या मात्र मी जाण्याचा हट्टच करणार.
नदीवर सखा आणि मी हातात हात घालून फिरणार.तिथल्या वाळूवर दोघे जवळ जवळ बसणार.मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवेन.
चिव् चिव् चिव्…….डोअरबेलचा आवाज आला.
तृष्षाने घाईघाईने व्हिडीओ शुटींग बंद केले.
अमोलच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले.
तृष्णा जाईल का नदीवर? तिथे तिच्या मनासारखे होईल? आता ती कुठे असेल आणि तिचा सखा, दोघेही आता जवळपास पंचेचाळीस,पन्नास वर्षांचे असतील.
अमोलने मध्ये नदीचे काढलेले फोटो मुक्ताला पाठवले.लगेच मुक्ताचा फोन आला.
अमोल तू मजेत आहेस यार तिकडे.मस्त नदीवर फिरतोस.कधी येणार तू?
बघतो अग.बाबा पण बोलवत आहेत.
उद्या येतोस का?
बघतो.इथले काम झाले कि येतो लगेच.
अरे काम होणार कधी?
मिळाले एक दोन गिऱ्हाईक.होईलच एवढ्यात.
बरं परवा तरी ये.
ok,darling,
असे म्हणत त्याने फोन ठेवला.
सखा तृष्णासोबत नदीवर जातो का? तृष्णाचा हात हाती घेतो का? तिने ठरवल्याप्रमाणे त्याच्या खांद्यावर मान ठेवलेल्या तृष्णासोबत प्रेमाने वागतो का….आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचा पुढील भागात.
छान कथा मालिका 👌👌☀️☀️☀️☀️☀️