मराठी पाऊस कथा- ओली पावले
पहाटे पासूनच पाऊस चालू होता तिची सकाळची शिफ्ट होती .रस्त्यावर सगळीकडे पाणी साचले होते. पाऊस काही थांबायचे नावच घेत नव्हता . उशिर झाला तर मेट्रन रागावेल ह्या भितीने ती खूप स्ट्रेस मधे होती.
बस आली पण ती देखिल भरूनच , जर चढले नाही तर अजून अर्धा तास वाट पाहावी लागेल या भीतीने ती कशीबशी बस मध्ये चढली. पावसामुळे सगळीकडे पाणी साचलेले होते. बस ड्रायव्हरच्या चुकीचा अंदाजाने बस एका बाजूने खड्ड्यातून गेली . अनपेक्षित धक्क्याने अंजलीचा हात सुटला अन् ती धावत्या बसमधून बाहेरच पडणार होती , वेळीच एका तरुणाने तिचा हात पटकन पकडला आणि तिला आत मध्ये खेचले. तिला रडूच कोसळले . खूपच घाबरली होती ती .खरच त्याने तिला जीवदान दिले होते.
त्याचे आभार मानून ती हाॅस्पिटलच्या स्टाॅप वर उतरली. कशीबशी तिने तिची ड्युटी संपली. दुसऱ्या दिवशी ओव्हर देताना रात्रीची सिस्टर तिला म्हणाली की नवीन डॉक्टर आलेत ,खूपच स्ट्रिक्ट आहेत . राउंड घ्यायचा तर त्यांच्यासोबत जायलाच लागेल. भितभितच ती त्यांच्या केबिनमध्ये गेली ,पाहते तर काय ज्याने तिला काल जीवदान दिले होते तीच व्यक्ती तिच्या समोर उभी होती डॉक्टर अनिकेत प्रधान म्हणून…
“अच्छा तर तू सकाळची सिस्टर आहेस ! मी डॉक्टर अनिकेत आणि तुझे नाव काय ?” त्याने विचारले
“अंजली” असे ती घाबरतच म्हणाली अंजलीला यांच्याबद्दल खूप आदर वाटू लागला कारण त्यांनी तिला जीवदान दिले होते.जशी देवाला फूले व्हावी तशी ती दररोज सकाळी न चूकता एक गुलाबाचे फूल अनिकेतच्या टेबलावर ठेवायची .हळहळू आदराचे रूपांतर प्रेमामध्ये कधी झाले कळलेच नाही. अनिकेतला देखील ती खूप आवडू लागली . त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला तिच्या आईने लगेचच होकार दिला. पण अनिकेतच्या घरी मात्र त्याच्या वडिलांचा स्पष्ट नकार होता .त्याच्या उच्चभ्रू घरात डॉक्टरच सून हवी होती.त्याच्या आईने वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचे वडील मानण्यास तयार नव्हते .लग्न केलेस तर प्राॅपर्टीतून एक कवडीही मिळणार नाही अशी तंबीही दिली.
शेवटी वडिलांच्या संमतीशिवाय अनिकेतने लग्न करायचे ठरवले तारीख नक्की झाली.कोर्ट मॅरेज करायचे ठरले इकडे दैवाला काहीतरी दुसरच मंजूर होते.
लग्नाच्या दोन दिवस आधी अंजली अचानकच गायब झाली. अनिकेतने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचा काही थांगपत्ता लागत नव्हता. त्याने अख्खे शहर पालथे घातले, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल,शवागार देखील पण अंजलीचं काही पत्ता लागला नाही.
शेवटी लग्नाची तारीख आली. वडिलांनी त्याला म्हटले की तिला तुझी प्रॉपर्टी हवी होती ती नाही मिळाली म्हणून ती पळून गेली. पण अनिकेतचा अंजली वर विश्वास होता, आज तरी ती नक्की येईल ही त्याला आशा होती. तो त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला विचार करता करता त्याला डोळा लागला अचानक मंद सुगंधाने केबिन भरून गेली. त्याने डोळे उघडून पाहिले त्याला आश्चर्याचा धक्का बसला, त्यांची अंजली त्याच्यासमोर नववधूच्या वेषात उभी होती.त्यांने उठून तिला मिठी मारली ती पूर्णपणे ओलीचिंब होती
.” काय ग कुठे गेली होतीस मला सोडून आणि ओलीचिंब का ?”
“मी पहिल्या भेटीतही ओलीचिंब होते आणि शेवटच्या भेटीतही!”
“तुम्हाला शेवटचे भेटण्यासाठी मी या रूपात आले ,तुम्ही मला विसरून जा दुसरे लग्न करा “ती म्हणाली
.”काय झाले मला खरेखरे सांग”अनिकेतने विनवणी केली.
ती बोलू लागली, तुझ्या वडिलांनी मला माफी मागण्याच्या निमित्ताने घरी बोलवले.तू आणि आई घरात नव्हते. त्यांनी डाव साधला, त्यांचा विश्वासू नोकर शंभूला बरोबर घेऊन त्यांनी माझा गळा दाबून खून केला माझा मृत देह पोत्यात टाकून नदीत फेकून दिला.
अनिकेत तिला मिठी मारून रडू लागता, अचानक तो स्तब्ध झाला.त्याने काहीतरी निश्चय केला.आता तो मागे फिरणार नव्हता. त्याच्या अंजली बरोबर तो कुठेही जाण्यास तयार होता.
इकडे त्याचे आईवडील त्याला शोधण्यासाठी हॉस्पिटल मध्ये आले. सिस्टरने अनिकेत केबिनमध्ये असल्याचे सांगितले,अन् त्यांचा जीव भांड्यात पडला.
केबिन उघडून बघतात तर अनिकेत आत मध्ये नव्हता , टेबलावर एक गुलाबाचे फुल आणि खाली दोन ओल्या पावलांच्या खुणा होत्या..!
निलम
वाह खुप छान
सुरेख लिखाण
छान.. लिखाण.
खुप छान
अप्रतिम
वाह
खूपच सुंदर
Wahh