पाऊसगाणी बालमनाची-childrens rainysong
उन्हाने तप्त झालेली धरा आभाळालाही बघवत नाही.तिचे हिरवाईने नटलेले रुप पुन्हा पुन्हा बहाल करण्यासाठी मेघांची मदत घेऊन पावसाच्या धारांनी तो तिला चिंब करत असतो .तिचे सौंदर्य तिला बहाल करतो.
आभाळातुन पाऊसधारा धरतीकडे झेपावतात.आभाळाने पाठवलेल्या पावसाच्या स्पर्शाने सुगंधीत झालेली ती अनेकांची मने आकर्षुन घेते.काहींची मने तृप्त होतात,काहींची आनंदी,तर काहींची प्रियजनांच्या आठवणींनी व्याकुळ.
लहानथोरांना आवडणारा, प्रत्येकाला वेगवेगळी अनुभूती देणारा हा पाऊस कवीमनाला नेहमीच प्रेरणा देतो.
कवींच्या मनातुन निघालेल्या या काही निवडक कविता/गाणी पावसासारख्याच मनाला तृप्त करतात.
या भागात बालमनातून निघालेल्या पावसाच्या बालकवितांचे रसग्रहण केले आहे.
ये रे ये रे पावसा
सर्वांना आवडणारा पाऊस लहान मुलांचा विशेष आवडता आहे.त्यासाठी ते पावसाला पैसेही द्यायला तयार आहेत.
पण गंमत म्हणजे मुले लहान असली तरी त्यांना पावसाला खोटा पैसा देवून मडके भरुन घ्यायचे आहे.
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
ये ग ये ग सरी, माझे मडके भरी
सर आली धावून,
मडके गेले वाहून!
ये रे ये रे पावसा……कवी अनामिक असला तरी गेल्या तीन,चार पिढ्यांना हे गाणे खूप जवळचे वाटते.
ए आई मला पावसात जाऊ दे
आई बाळाच्या काळजीपोटी त्याला पावसात जाऊ देत नाही.त्याला मात्र पावसात भिजायचे आहे.एकदाच फक्त एकदाच…त्यासाठी आईची विनवणी सुरु आहे.
आई जाऊ दे ना मला पावसात.एकदाच मला भिजू दे.
ते वर मेघ बघ मला गडगडाट करुन बोलवत आहेत.
विजाही आभाळात चमकून मला पावसात भिजायला बोलवत आहेत.
त्यांच्यासोबत नाचायला,खेळायला मला जावू दे ना.
आपल्या घराच्या खिडकीखाली पाणी जमलयं.त्या तळ्यात मला होडी चालवू दे.
अहाहा! आई बदकांचा थवा बघ.किती छान नाचत आहे.बेडूकदादा डराॕव डराॕव आवाज करत मला बोलवत आहे.मला त्यांच्यासोबत पाठशिवणीचा खेळ खेळू दे.
ए आई मला पावसात जाऊ दे.
पावसाच्या सरींखाली उभे राहून मला पाण्याने पाणी उडवायचे आहे.भिजून मला ताप आला,खोकला झाला,सर्दी झाली,शिंका आल्या तरी चालेल पण मला एकदाच पावसात जाऊ दे.
ए आई मला पावसात जाऊ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे हे गडगड करिती
विजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणांत मज खूप खूप नाचू दे
खिडकीखाली तळें साचलें
गुडघ्याइतके पाणी भरलें
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप खोकला शिंका सर्दी वाट्टेल ते होऊ दे
लहानपणी सगळ्याच बालमनात वरील गाण्यातील भाव उमटतात.
मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या आणि योगेश खडीकर यांनी गायलेल्या या गीतातील चिमुरड्याचा भोलानाथ खास दोस्त आहे.तो त्याच्या सगळ्या शंका भोलानाथजवळ व्यक्त करत आहे.
चिमुरड्याला शाळेला सुट्टी हवी आहे पण पाऊस पडेल का….
दुपारी आई झोपल्यावर लाडू खायचा आहे.
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
पाऊस पडला,शाळेभोवती पाणी साचलं कि शाळेला सुट्टी मिळणार,शाळेला सुट्टी मिळण्यासाठी पाऊस पडायलाच हवा….त्यासाठी तो भोलानाथकडे साकडे घालत आहे.
पावसात त्याला आई झोपल्यावर आवाज न करता दबकत दबकत लाडू खायचा आहे.
त्याला शाळा मुळीच आवडत नाही म्हणून आठवड्यात तीन रविवार हवे आहेत.
उद्या लहानग्याचा गणिताचा पेपर आहे.गणित म्हंटले कि याची घाबरगुंडी उडणार,पोटात कळ येणार, ढोपर दुखायला लागणार….म्हणून पावसाने येऊन शाळा बंद करावी.
बालमनाला मोहवणारं,आवडणारं आणि बालमनातील इच्छा सांगणारे अजून एक पावसातील बालगीत.
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होईल काय
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥१॥
भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आठवड्यात रविवार येतील का रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥२॥
भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥३॥
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
बालमन-निरागस,स्वच्छ,पावसात चिंब भिजल्यावर धरा जशी निर्मळ होते अगदी तसेच नितळ असते.
पावसात चिंब झाल्याने मोरालाही अपार हर्ष होतो आणि तो थूईथूई नाचायला लागतो.
सर्वांचे आवडते पु.ल.देशपांडे यांनी हे सुंदर बालगीत लिहिले आहे.
कवीमधील बालमन मोराला सांगत आहे
वाहणारा वारा ढंगासवे झुंजला म्हणून ढग बघ कसे काळ्या कापसासारखे दिसत आहेत.
विजापण चमकत आहेत.आता वेळ आली आहे तुझ्या नृत्याची.
आंब्याच्या वनात नाच तू.
पाऊसधारेने सगळा आसमंत भिजला.आपणही पावसात न्हाऊ,गाणे गाऊ.तू नृत्याची सुरुवात कर.
पावसाचा एकेक थेंब बघ पाण्यात कसा नाचत आहे.पानांवर टपटप आवाज करत आहे.पाऊसधारेत आपण दोघे खेळू.निळ्या मित्रा तू नाच.
पावसाने आता जरा उसंत घेतली.
आपली दोघांची जोडी जमली.आभाळात सप्तरंगी इंद्रधनुष्य उगावले.त्या खाली तू नाच.
नाच रे मोरा नाच.
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा …
झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा …
थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा …
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच,
नाच रे मोरा …
असा हा पाऊस धरेइतकाच धरेवरील प्रत्येकाला तृप्त करणारा….
पिर पिर पिर पिर पावसाची
सर्वांना आवडणारा पाऊस एका लहानग्याला मात्र मुळीच आवडत नाही.त्याला पावसाची पिर पिर नकोशी झाली.पावसात सगळ्यांची लगबग चाललीय.बाबांनी छत्री काढली, ताईच्या साडीवर चिखाल उडाला,पावसामुळे दादाचा रेनकोट फाटला,गुरुजीही पावसामुळे शाळेत येऊ शकले नाही.बाहेर पाऊस आणि शाळेला सुट्टी मिळाल्यामुळे याला घरात रहावे लागत आहे.
पावसाची पिरपिर जरी त्याला आवडली नाही तरी पावसात भिजायची इच्छा मात्र आहेच.
पिर पिर पिर पिर पावसाची
त्रेधा-तिरपिट सगळ्यांची !
रस्त्यावर मोटारगाड्यांची
शर्यत लागली पोहायची
बाबांना ऑफिसची घाई फार
छत्रीला त्यांच्या लागली धार
फजिती झाली कपड्यांची !
ताईच्या साडीवर परीटघडी
चिखलाची सुंदर उठली खडी
दादाच्या रेनकोटचा भलताच थाट
पावसाने उसवली त्याची पाठ
भंबेरी उडाली फॅशनची !
कुणितरी सांगा हो काही उपाय
गुरुजींचा चिखलात फसलाय पाय
शाळेला सुट्टी पडली उगाच
घरात बसायचा माझ्यामागे जाच
संधी हुकली भिजायची
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
खुप खुप सुंदर
चिंब भिजलेली पाऊस गाणी धुंद बालपण आठवणारी
Wah sundr सवंगडी पाऊस
Mast