विधिलिखित –  भाग २-कथामालिका
विधिलिखित – भाग २-कथामालिका

विधिलिखित – भाग २-कथामालिका

पण जावेद ?
कसे शक्य आहे दोघांचे लग्न. उर्वशी लहानपणापासून रितीभाती पाळणारी,शुद्ध शाकाहारी आणि जावेद.
ऐकताक्षणी हादरले मी. मी काही सांगोपांग विचार करण्याआधीच दिराला,भावाला बोलवून घेतले.
आम्ही सगळे कर्मठ वातावरणात वाढलो असल्याने उर्वशीच्या लग्नाला होकार देण्याचा प्रश्नच नव्हता. उर्वशीला समजवण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला पण ती ठाम होती. जावेदशिवाय ती कुणाशीही लग्न करायला तयार नव्हती. पण आम्ही जावेदशी तिचे लग्न लावायला तयार नव्हतो.
भावाने आणि दिराने  मिळून लवकरच स्थळ शोधले मिहीरचे.
मिहिर सर्व दृष्टीने उर्वशीला साजेसा.
त्याला,घरच्यांना उर्वशी आवडली आणि पंधरा दिवसात लग्न पार पाडायचे ठरले.
उर्वशीवर ही जबरदस्ती होती. माझे आणि तिचे बोलणेच खुंटले होते. ती करायची प्रयत्न मला समजवण्याचा,खूप रडत रडत बोलायची माझ्याशी पण माझ्यातच हिंमत नव्हती तिच्या  नजरेला नजर देण्याची,तिच्याशी बोलण्याची.
मी काय बोलू शकत होते?
हे कि लहानपणापासून सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारी आई वेळ आल्यावर कशी जातीचा आधार घेऊन विचार बदलते.
माझ्या वरचे काही संस्कार मी प्रयत्न करुनही नाही बदलवू शकले आणि मी तयार झालेही असते उर्वशीच्या प्रेमापोटी  पण बाकिच्यांचे काय? समाज काय म्हणेल? आतापर्यंत ज्यांच्या आधाराने राहलो ते नातलग काय म्हणतील?
सगळे प्रश्नच प्रश्न होते उत्तर नसलेले.
मी हिंमत केली असती तर उर्वशीचे लग्न जावेदशी होऊ शकले असते.पण नाही जमले मला.
जातीच्या चौकटीबाहेर नाही जाता आले मला. उर्वशीसाठीसुद्धा  मी जातीची चौकट नाही ओलांडू शकली.
पण उर्वशी जाऊ शकत होती. चौकटीबाहेर.
पळून जाऊन ती लग्न करु शकली असती जावेदशी.
मला ती भीती होती.म्हणूनच तिचे लग्न घाईघाईने उरकवले.
का नसेल गेली उर्वशी जावेदसोबत?
माझ्यासाठी नसेल गेली का?
उर्वशी रमेल ना संसारात?
मिहिरच्या सहवासात पडेल तिला जावेदचा विसर.सध्यातरी एवढीच आशा बाळगू शकतो.
लेकीच्या आठवणी आठवता आठवता डोळा लागला त्यांचा.
 उर्वशी मिहिर सोबत सासरी-तिच्या घरी पोहचली. संपूर्ण घर उर्वशीच्या स्वागतासाठी सज्ज होते.
लांबचा प्रवास होता त्यामूळे सगळे थकले होते.
घरी आल्याबरोबर जेवून सगळे झोपले.
उर्वशीला तिच्या नणदेच्या सावीच्या खोलीत झोपायला पाठवले.
सावी पण थकवा आल्यामूळे लवकरच झोपली.
उर्वशी जागीच.झोप उडाली होती तिची गेल्या कित्येक दिवसांपासून. आईची ती जीव कि प्राण होती.
उर्वशी विचार करत होती,
मला कधीही कोणत्याही गोष्टीला नकार न देणाऱ्या माझ्या आईने माझ्या जीवनातील एवढी महत्वाची गोष्ट माझ्या मनाने केली नाही’
उर्वशीचे डोळे झरझर वाहायला लागले.
जावेद एम.बी.ए. ला माझ्याच काॕलेजमध्ये,
माझ्याच वर्गात. जावेद अतिशय हुशार,इंजिनियरींग करुन इथे आलेला. नोट्सची देवाणघेवाण  करतांना एकमेकांच्या प्रेमात पडलो. थोड्याच दिवसात जावेद मझ्या आयुष्याचा भाग बनला.त्याच्यात मी एवढी गुंतत गेली कि आधीचे आयुष्य त्याच्याशिवाय कसे काढले हा प्रश्न मला पडायचा.
एक जात सोडली तर किती साम्य होते आमच्या आवडीत,स्वभावात.
जातीतल्या टोकाच्या फरकामूळे आमची प्रेमकहानी काॕलेजमध्ये सगळ्यांना माहीत झाली.
एमबीए करायला दुसरीकडे असल्यामुळे आईपर्यंत काही गेले नाही.पण आईला मीच सांगणार होती.आई मला नकार देणार नाही याची खात्री होती मला.
मी आणि जावेदने कुठल्याही परिस्थितीत एकमेकांना न सोडण्याचे ठरवले होते.
फायनलची परीक्षा संपवून मी घरी गेले.
जावेदबद्दल आईला कधी सागते असे मला झाले होते.
आई शाळेतून घरी आली.दोनेक महिन्यानंतर मी घरी आले होते. आई मला बघून नेहमीसारखीच खूप आनंदी झाली. जरा वेळ थांबून मी आईला जावेदबद्दल सांगितले.त्याचे नाव ऐकल्याबरोबरच आईला धक्का बसला. जातीतला फरक मलाही माहित होता.
त्यामूळे आई थोडी नाराज होईल हा अंदाज होता.
पण माझ्यासाठी हो म्हणेल याची खात्री होती.
आईला मी जावेदच्या प्रेमाविषयी सांगितले तेव्हा आईला काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हते.
मी नातेवाईकांना विचारुन सांगते
एवढेच आई म्हणाली.
रात्री जावेदला फोन करुन  आईशी बोलल्याचे सांगितले.
दुसऱ्या दिवशी आईने घाईघाईने मामाला,काकांना बोलवून घेतले. त्यांनी सगळे ऐकल्यावर होकार देणे शक्यच नव्हते. त्यांनी जावेद-उर्वशीचे लग्न होऊ शकणार नाही हे आईला निक्षून सांगितले.
आई आपली बाजू घेईल ही मला आशा होती.
पण  आईने पहिल्यांदा जेव्हा मला गरज होती तेव्हाच माझा हात सोडला.
मला वाटले  होते  आई हळूहळू तयार.
पण तसे नाही झाले.मुळात आईचीच इच्छा नव्हती आणि  माझ्या साठी जरी ती तयार झाली असती तरी दिर आणि भावाला विरोध करुन पुढे जाण्याचे धाडस तिच्यात नव्हते.
आईने का असे केले? माझा विचार का नाही करु शकली ती.मी जावेदशिवाय नाही राहू शकणार नाही हे
तिला माहीत होते.
मी मात्र आईचा विचार करत राहिले. जावेद आणि मी पळून जायचे ठरविले  पण ऐन वेळी आईसाठी मी माघार घेतली. बाबांच्या मागे तिने माझा केलेला सांभाळ,मला कशाचीही कमी भासू नाही दिली तिने. माझ्यामूळे तिची मान घाली जाऊ नये म्हणून मी जावेदला फसविले. जावेद कुठे असेल. मी त्याला दिलेला आघात पचवू शकला असेल का तो?
जावेद, जावेद उर्वशी जोरात रडायली लागली.
तिचा आवाज ऐकून बाजूला झोपलेली सावी घाबरुन उठली.
उर्वशीला रडतांना बघून तिला वाटले वहिनीला आईची आठवण येत आहे.
वहिनी अग आईची आठवण येत आहे का?
उर्वशी काहीच बोलली नाही. सावीने तिचे डोळे पुसले तिला प्यायला  पाणी आणून दिले. उर्वशी जरा शांत झाली.
पहाट झाली होती. आज पूजा होती घरी. उर्वशी आंघोळ करुन खोलीच्या बाहेर आली.
Good morning उर्वशी बेटा.
तिचे सासरे म्हणाले.
Good morning बाबा. उर्वशीने प्रत्युत्तर दिले. स्वयंपाकघरात जाऊन तिने सगळ्यांसाठी चहा बनवून आणला.सावी होतीच वहिनीला मदत करायला. मिहिरच्या आईने स्वयंपाकघरात येऊन प्रसाद बनवायला सुरु केला.उर्वशी म्हणाली,
आई द्या मी बनवते.
 नको ग,तू नवी नवरी आहेस. आराम कर काही दिवस.
सावी वहिनीला घेऊन जा खोलीमध्ये.थोड्यावेळाने पूजेत बसायचे आहे.
हाॕलमध्ये सासरे पूजा मांडत होते. पाहूणेमंडळी हाॕलमध्ये येऊन बसली होती.
सगळी तयारी झाल्यावर  आईने उर्वशीला पूजेसाठी बोलवले. सावी  तिला  हाॕलमध्ये घेऊन आली.
आजपासून उर्वशीच्या नविन आयुष्याला सुरुवात होणार होती.
मिहिर आधीच तयार होऊन येऊन बसला होता.
पूजा  सुरु झाली. मिहिर अधूनमधून ऊर्वशीकडे बघत होता.उर्वशीचे त्याच्याकडे लक्ष नव्हते.ती पूजेत मन लावण्याचा प्रयत्न करत होती. पण एकाग्रता येत नव्हती. मनातून जावेद जात नव्हता. पूजा आटोपली. सगळ्यांची जेवणे झाली.आईबाबांनी मिहिर-उर्वशीला बाजूला एक मंदिर होते तिथे जाऊन दर्शन घेऊन यायला सांगितले.दोघेही  गेले. गाडीत बसल्यावर मिहिरने हळूच उर्वशीचा हात घेऊन तिला विचारले,
काय मग उर्वशी मॕडम आवडले का तुम्हाला आपले घर?आम्ही?
उर्वशीने काहीच उत्तर दिले नाही.कसनुसी हसली त्याच्याकडे बघून. मिहिर बोलत राहला तिच्यासोबत.
स्वतःबद्दल,आईवडील,सावी सगळ्यांबद्दल.मध्ये मध्ये तिला पण काही विचारत होता.ती हो,नाही असे काहीतरी उत्तरे देत होती. मिहिर खूप बोलका, हसरा
आहे हे ताडले तिने. साध्या साध्या गोष्टींवर पण तो खळखळून हसायचा.
ती पण जावेदसोबत असली कि अशीच खळखळून हसायची. तिच्या डोळ्यात जावेदच्या आठवणीने टचकन पाणी आले.
मिहिरच्या गप्पा रस्ताभर सुरुच होत्या.
घरी परतायला जरा उशीरच झाला. जेवणाची वेळ झाली होती.घरी सगळे वाट बघत होते.
रात्र झाली.मिहिर आणि उर्वशी झोपायला गेले. मिहिर  लग्न जमल्यापासून आजच्या रात्रीची वाट बघत होता.
उर्वशी काही केल्या जावेदला मनातून काढू शकत नव्हती. मिहिर अजाण होता.त्याला उर्वशीच्या मनातली खळबळ समजू शकत नव्हती.
मनात जावेद असला तरी मिहिरला ती थोपवून धरु शकली नाही.
उर्वशीला आता जे आहे त्याचा स्वीकार करण्यावाचून गत्यंतर नव्हते. इथे सगळी माणसे प्रेम करणारी होती. आई-बाबा,सावी सर्वजण तिची काळजी घेत होते.
तिचे मन रमावे म्हणून प्रयत्न करत होते. मिहिर तर आॕफिसमधून आला कि तिच्या मागेमागेच असायचा
उर्वशी तिचे कर्तव्य म्हणून सगळे पार पाडायची पण गुंतत नव्हती.मिहिर आवडत होता तिला.पण तो मित्रासारखा वाटायचा.जावेदची जागा त्याला देणे शक्य नव्हते.
मिहिरला तिची अलिप्तता,तिचा कोरडेपणा जाणवायचा पण रमेल हळूहळू  असा विचार करुन स्वतःची समजूत काढायचा.
क्रमशः
विधिलिखित भाग-३ वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण shabdparna.in वर पाठवू शकता.
आमचे साहित्य आवडत असल्यास नक्की like,comment,share करा.
प्रिती

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!