विधिलिखित भाग ३

वंदनाताईंना उर्वशी माहेरी येऊन काही दिवस राहावी असे फार वाटायचे पण उर्वशीला नको वाटायचे.
का कुणास ठाऊक आईकडे तिला जावेद जास्त आठवायचा. आणि  आईमूळे जावेदशी लग्न होऊ शकले नाही ही खंत वाटत राहायची.
ती मिहिरसोबत यायची आणि  मिहिरसोबतच जायची.
वंदनाताईंना तिचे तुटलेपण जाणवत राहायचे.
उर्वशी आता सासरी बऱ्यापैकी रुळली होती.
आई-बाबांचे हाॕस्पिटल बाजूलाच होते.सावीचे सकाळचे काॕलेज संपले कि दिवसभर ती घरीच असायची. आईबाबा पण मध्येमध्ये घरी यायचे त्यामूळे तिला एकटेपणा जाणवायचा नाही.
उर्वशी  रुळली होती इथे.पण जावेदला विसरु शकत नव्हती. कर्तव्यबुद्धीने ती मिहिरचे सगळे करायची पण प्रेम ? ते फक्त जावेदवर.
जावेद कुठे असेल? कसा असेल? सावरला असेल का?
अनेक  प्रश्नांचे काहूर माजायचे डोक्यात.
त्याला फोन करावा का? पण काय बोलणार? त्याला मी फसविले. आता  फसवल्याचे समर्थन करण्यात काय अर्थ आहे.
दिवस चालले होते. आईबाबा,सावी,मिहिर सगळेच उर्वशीवर खूष होते. आणि आता तर  आईबाबांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ते आजी आजोबा होणार होते.
मिहिर-उर्वशीला बाळाची चाहूल लागली होती. आता मात्र  उर्वशी जावेदला विसरण्याचा स्वतःहून प्रयत्न करु लागली. बाळासाठी स्वतःची काळजी घ्यायला लागली.  तिच्या वागण्यात आता आधीपेक्षा मोकळेपणा आला. मिहिरला तिच्यातील हा बदल लगेच जाणवला. वंदनाताईंना मिहिरच्या आईने लगेच ही गोड बातमी दिली.
(जावेदचे वृत्त)
इकडे उर्वशीने आईला विचारल्याचे सांगितल्यापासून जावेदने उर्वशीला खूपदा फोन केले पण उर्वशी फोन उचलत नव्हती. दोन तीन दिवसांनी उचलला तेही फक्त दोन मिनिटे बोलली.
जावेद माझे पुढच्या आठवड्यात लग्न आहे.
जावेदला क्षणभर काही कळलेच नाही.
कळले तोपर्यंत उर्वशीने फोन ठेवला होता.
वेड्यागत जावेद फोन करत राहला पण उर्वशीने नाही उचलला. हेच शेवटचे बोललेत ते दोघे.
जावेदला काहीच समजेना.
ही उर्वशी अशी विचित्र का बोलली?
लग्न?  माझ्याशिवाय दुसऱ्याशी.पण तिचा तर पूर्ण विश्वास होता  आईवर. मग काय झाले असेल?
डोक्यात नुसते प्रश्न घोंघावत होते.
जाऊन बघू का उर्वशीच्या घरी?
घरी जावेदच्या बहिणीचे लग्न होते.तो लगेच जाऊ शकणार नव्हता.
लग्न आटोपले कि जाऊ
असे मनाशी त्याने ठरवले.बहिणीचे लग्न  झाले कि  अम्मी-अब्बाला तो उर्वशीबद्दल सांगणार होता.
पण  आता उर्वशीला भेटून आल्यावरच घरी सांगू असे त्याने ठरवले. बहिणीचे लग्न आटोपले.
एकदोन दिवसातच तो  नाशिकला निघाला उर्वशीला भेटायला.   दुपारी रेल्वेतून उतरला.पत्ता होता त्याच्याजवळ. पत्ता घेऊन तिचे घर शोधत शोधत गेला. घराला कुलूप होते.
कुठे गेले असतील सगळे?
त्याने शेजारी चौकशी केली. शेजाऱ्यांनी सांगितले,
 
आज त्यांच्या मुलीचे  लग्न होते.ते आटोपून  आताच आलो आम्ही घरी.तुम्ही पण लग्नासाठी आले का? तसे असेल तर मग जरा उशीरच झाला तुम्हाला.
पण अजून आहेत सगळे मंगलकार्यालयात.तुम्हाला कुणाला भेटायचे तर जा तुम्ही.
एवढे बोलून ते गृहस्थ आत गेले.
जावेद  एखाद्या मुर्तीवत् तिथेच उभा राहिला. थोड्यावेळाने त्याने गृहस्थाला पुन्हा आवाज देऊन मंगलकार्यालयाचा पत्ता मागितला.
तुम्ही कार्यासाठी आले तर पत्ता असायला हवा तुमच्या जवळ.
जावेद बोलला,
हरवली लग्नपत्रिका.
गृहस्थाकडून पत्ता घेऊन जावेद घाईघाईने मंगलकार्यालयाकडे निघाला.  उर्वशीची पाठवणीची तयारी सुरु होती. नवरीच्या वेशातील  उर्वशी नवरदेवाच्या बाजूला उभी होती.जावेद खूप गोंधळला होता.खरे आहे  कि भास  आहे काही समजत नव्हते त्याला. एकदा डोळे भरुन त्याने तिला बघितले आणि  बाहेर पडला.तिचे तर लक्षच नव्हते कुणाकडे.
तिची हरवलेली नजर सांगत होती लग्न तिच्या इच्छेने झाले नाही. जावेदला आता कायमचेच तिच्या आयुष्यातुन बाहेर पडावे लागणार होते.
जावेद मंगलकार्यालयातून बाहेर पडला पण आता पुढे काय ? असेही होऊ शकते हा विचार त्याने कधी केलाच नव्हता. उर्वशीवर किती विश्वास ठेवला मी.  पण नक्कीच काहीतरी कारण असेल.
माझी उर्वशी अशी नाही करु शकणार.
दिवसभर तसाच सैरभर फिरत राहिला उर्वशीच्या आठवणी,मिळून बघितलेली स्वप्ने आठवत.

2 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!