१९-हरवून गेल्या जाणिवा-marathi story
सौ. दर्शना भुरे..
चिखलातून वाट काढीत चालताना बैल बिथरत होती त्यामुळे बैलगाडीतून फाट्यापर्यंत पोहोचायला मधुकरराव ला उशीर झाला होता.घरातील मंडळी सुध्दा सोबत होती.. त्या सर्वांची सकाळची लवकरची बस सुटली होती.
दुपारच्या दुसऱ्या बसने त्यांना वैकुंठा कडे पोहोचायला जवळपास संध्याकाळच झाली होती. एव्हाना कांताप्रसाद चे अंत्यसंस्कार पण आटोपून झालेले होते.
पुढे..
अंत्ययात्रेसाठी गेलेली सर्व लोक घराकडे परतली होती. पुरुष मंडळी बाहेरील व्हरांड्यात जमली होती. तर सर्व महिला आतल्या पडवीत बसल्या होत्या. बसल्या बसल्या विमलची नजर पडवीत तिच्या लेकीला शोधत सर्वत्र भिरभिरत होती. पण तिला ती तिथे कुठेही दिसत नव्हती.
लेक कुठेही नजरेस पडत नाही हे पाहून..
तिचा आता हळूहळू धीर सुटत चालला होता.
तिथे बसलेल्या बायका तिच्याकडेच बघत होत्या.
त्यापैकी एकजण हळूच तिला पाहून म्हणाली,
हिच..का?विनायक ची सासू..
हो..हिच
लोक तसे साधे दिसतात नाही का?
हो..ना पण लेकी चा पायगुण हो. तिचे लग्न जमल्या पासून एक एक विघ्न सुरू झाले विनायक च्या मागे..
बायकांचे असले बोलणे ऐकून विमलच्या काळजात धस्स झाले.
कांताही हे ऐकून धक्का बसला..
दोघींनाही ह्या बायका असे का बोलत आहेत . याचा अंदाज लागत नव्हता. त्यांना तिथे बसणे अवघडल्यासारखे होत होते.
तेथील सर्व प्रकार शारदा च्या म्हणजे वैकु च्या चुलत सासू च्या लक्षात
आल्यावर तिने त्या दोघींना बोलावून घेत वैकुंठाच्या खोलीत नेले.
वैकु अजूनही गाढ झोपेत च होती.
एवढ्या दिवसांनी वैकुला स्वतः च्या नजरेसमोर पाहून विमलला एकदम भडभडून आले.
.अवघ्या दोन तीन दिवसात
विमलला तिची लेक
अगदीच सुकल्यासारखी दिसत होती.
लेकीच्या डोक्यावरून हात फिरवत ती जावेला विचारू लागली..
कांता..आपल्या वैकुविषयी असे का बोलत असाव्यात त्या सर्व जणी ..
तिचे ऐकून कांता म्हणाली,
ताई..जुन्या वळणाच्या बाया आहेत त्या.. एवढा विचार करु नका त्यांचा…
शारदा पण म्हणाली.
खरे आहे विमला ताई कांता ताई चे बोलणे..
. तुम्ही नका मनाला एवढे लावून घेवू..
खुप गुणाची आहे आमची सुन.. अगदी गोड आहे पोरं.
आणि बायका बोलतात तसे काहीही नाही बर आमच्या सर्वांच्या मनात..
एकंदरीत शारदाच्या बोलण्या, वागण्यातून तर मनाचा मोठेपणा जाणवत होता. पण इतरांचे काय? वैकुंठाची स्वतः ची सासू ती या सर्वांसारखी वैकुलाच दोषी ठरवत असेल तर.. तर कठीण आहे मग माझ्या वैकुचे..
आईच्या हाताचा स्पर्श जाणवताच वैकु जागी होत तिला बिलगली
एवढे दिवसांनी तिच्या आईला भेटण्याची खुशी तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.
कांता ने वैकुला जवळ घेत..
आपल्या सोबत आबा आणि केशव काकाही आले आहेत असे सांगितले..
आबा आणि काका पण इथे आले आहेत मग मला भेटायला ते आत का नाही आले.. असे म्हणत लगेच त्यांना भेटण्यासाठी खोलीबाहेर जाऊ लागली..
पण बाहेर जमलेल्या बाया माणसाच्या गोतावळ्यात वैकु ला जाऊ देणे शारदाला योग्य वाटत नव्हते म्हणून तिने वैकुला बाहेर जाण्यासाठी अडवले.. आबाला भेटण्यासाठी का जाऊ देत नाहीत म्हणत
वैकु रडू झाली.
व मला आता इथे रहायचे नाही मला आपल्या घरी घेऊन चल म्हणून आईजवळ हट्टालाच पेटली…
त्या लहान जिवाला तरी कुठे माहित होते. आपण आता नुसती आपल्या आई आबाची लेक नाही आहोत तर या घराण्याची सुन सुध्दा आहोत.
सासू,सासरा,नवरा ही सर्व नाती तिच्या समजण्यापलीकडची होती..ती यासाठी अजून लहानच होती त्यामुळे नवीन लोकात, नवीन घरात तिचा जीव नुसता घुसमटत होता. तिला इथे अजिबात करमत नव्हते..तिला घरी तिच्या मैत्रीणींत ,भावंडात परतायचे होते.भातुकलीत रमायचे होते…
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा







