३-हरवून गेल्या जाणिवा
दर्शना भुरे
मुलींना परक्याचे धन आणि मुलांना वंशाचा दिवा म्हणून वाढविणारा सुमारे सत्तर.. ऐंशी वर्षापूर्वीचा काळ त्या काळात वैकुंठाआजीचे संपूर्ण बालपण गेले होते.. घरातील मुलींवर लादलेले नियम त्या घरातील सर्व स्त्रियांना भावजया,ननंदा आणि सुनांनाही लागू होते.. वैकुंठापेक्षा वयाने लहान म्हणून जानकी आणि तिच्या बहिणी कांता , शांता ..
वैकुंठाला आक्का म्हणून हाक मारीत असत.. त्यांचे पाहुन घरातील इतरही लहानमंडळी तिला आक्काच म्हणत होती..त्यामुळे ती वयाच्या नवव्या वर्षापासूनच सर्वांची आक्का बनली होती..
चार भावांचा मोठा परिवार त्यातून सतत घरी येणाऱ्या पाहुण्यांचा राबता.. धुणीभांडी सारख्या वरवरच्या कामाला नोकरचाकर होते.. पण घरातील स्वयंपाकघर मात्र घरातील स्त्रीने च सांभाळावे अशी नर्मदा आत्या ची सक्त ताकीद होती.. घरात चार जावांपैकी सकाळचा स्वयंपाक रत्ना, सिंधू व रात्रीचा स्वयंपाक कमल आणि विमलकडे वाटून दिला होता..
वैकुंठाला लहानपणापासून घरकामाची आणि स्वयंपाकाची खूप आवड होती..
दिवाळी आली की वैकुंठाची चंगळ असे..
दिवाळीत बनवलेल्या फराळामध्ये वैकुंठाला नर्मदा आत्याने बनवलेल्या सुंदर मोड पाडलेल्या खुसखुशीत करंज्या आणि पांढरे शुभ्र जाळीदार अनारसे खायला आणि बनवायला खूप आवडत..
त्यामुळे आई आणि आत्या जेव्हा केव्हा अनारसे बनवायला बसत ..तेव्हा स्वयंपाकघरात त्यांच्याजवळ बसून त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने तिची सारखी लुडबुड चाले..
अनारश्यासाठी भिजवलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन स्वतः च्या हाताने ती अनारसा थापण्याचा प्रयत्न
करीत असे. नाही जमला तर कंटाळून नर्मदाआत्याजवळ
मला तू बनवते अगदी तसाच अनारसा बनवायचा आहे..पण जमतच नाही तेव्हा तू मला शिकव.. असा हट्ट धरीत असे..
तिची अनारसा शिकण्यासाठीची धडपड पाहून नर्मदा आत्या तिला मग अनारश्याला जाळी कशी पाडायची..करंजीला छान नक्षीदार मुरड कशी घालायची यातील बारकावे अगदी बारकाईने शिकवू लागली.. लहानपणापासूनच धडपड्या स्वभावाची आणि सतत काही ना काही नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असलेल्या वैकुंठाला तिच्या नर्मदा आत्या कडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळू लागल्या..
त्या सर्व मनापासून ती शिकू लागली..
नर्मदा आत्या वरवर फार कठोरपणे वागत असली तरी मनाने अगदी हळवी होती..तिचा वैकुंठा तसेच घरातील बाकी सर्व मुलांवर खूप जीव होता.. जुन्या विचारसरणीच्या असल्याने मुलीच्या जातीचे फाजील लाड आत्यांना अजिबात मान्य नव्हते..
घरचा व्यवसाय शेती असल्याने पहिला पाऊस पडताच शेतातील कामाची धूम उडे निंदणी,पेरणी, खुरपणी असे शेतातील विविध कामे नर्मदा आत्या स्वतः जातीने शेतात हजर राहून मजूरांवर लक्ष ठेवून काम करून घेत असत.. तेव्हा नर्मदा आत्या सोबत तीपण शेतात जायची.
मजूरांसोबत शेतीतील काम करायला वैकुंठाला खूप आवडायचे.ती कामे तिला सहज जमायचेही. तिथे तिने तिच्या वयाच्या जिवाला जीव देणाऱ्या मैत्रीणी जमवल्या होत्या.तिची मैत्री कुणाशीही लवकरच होत असे.
वंदना, शेवंता, आशा, सुनीता तिच्या जिवलग होत्या.. त्यांच्या सोबत ती भातुकलीच्या खेळात रमून जाई..
क्रमशः
https://marathi.shabdaparna.





छान उत्सुकता वाढवणारी कथा.
सहज सोपी भाषा, लिखाण