९-तिची आजी
मनोहर आणि श्रीधरच्या सुट्ट्या संपल्या. मनोहरने बीए ला ॲडमिशन घ्यायचे ठरवले.
वसतिगृहाकडे जाण्याचा दिवस येऊन ठेपला.मनोहर इथे यायच्या आधीच एक घर बघून आला होता.
सीताई खूप वर्षांनी घराबाहेर पडत होती.यापूर्वी ती रमाईच्या लग्नाला गेली खूप वर्षापूर्वी. त्यानंतर आताच.
सीताईने सामानाची बांधाबांध सुरु केली. उद्या निघायचे होते. घरावरचा तिचा ताबा हळूहळू सुटत असल्याची जाणीव होत होती.
रेल्वेने जायचे कि बैलगाडीने यावर एकमत होत नव्हते. त्याकाळी लोकं रेल्वेने प्रवास करायला घाबरत होते.
गीताला रेल्वेने जायचे होते.पण सीताईला बैलगाडीने.
सामान पण बरेच असल्यामुळे बैलगाडीने जायचे ठरले.
गीता आणि श्रीधर रेल्वेने आणि आई आणि मनोहर बैलगाडीने असे जायचे ठरले.
प्रभाकरने श्रावणावर ह्या सगळ्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवली.
दिवस उजाडला.आज निघायचे होते घर सोडून. सीताने राघूमैनाची जोडी सोबत घेतली.
रेल्वेस्टेशनपर्यंत सगळ्यांनी सोबत जायचे ठरले.
सीताईला बैलगाडीत बघून सगळ्यां गाववाल्यांना आश्चर्य
वाटले.
तिच्या चुलत नणदा,दीर,पुतणे, वेशीपर्यंत पोहचवायला आले. पूर्णा तर दूरवर आली बैलगाडीसोबत. तिची जीवाभावाची मैत्रीण दुरावली होती.
सीताईच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते.
रेल्वेस्टेशनवरुन श्रीधर आणि गीताला उतरवून श्रावणाने बैलगाडी पुढे घेतली.
बैल वेगाने धावत होते.
सीताईचा नवीन प्रवास सुरु झाला. झाडे मागे पळत होती.शहर जवळ येत होते. इथेच याच शहरात रामची जीवनज्योत मालवली होती. सीताईच्या ह्दयात रामच्या आठवणी जमा व्हायला लागल्या.
काही तासात मनोहरचे वसतिगृह दिसले.
आई,माझे,श्रीधरचे वसतिगृह.
सीताईने बघितले.मोडकीतोडकी जुनाट इमारत होती.
तिला मनोहरचे कौतुक वाटले.जरा वेळात ते नवीन घेतलेल्या घरी पोहचले.
सीताईने आधी राघूमैनाचा पिंजरा उतरवून त्याच्यासाठी जागा शोधली.
इथे आता नव्याने संसार मांडायचा होता.
चूल बनवायची,लाकूडफाटा जमवायचा हे सगळे ओघाने आलेच. घर लहान होते. दोन खोल्यांचे.पण पुढे मागे अंगण होते. मागच्या अंगणात विहीर होती.
सीताईला मोठ्या घरात राहायची सवय होती. एखाद्या वाड्यासारखे तिचे घर होते.नेहमी अन्नधान्याने भरलेले.घरात धान्य साठवायला मोठी कणगी होती.तीळ,ज्वारी,तूर कशाची ददात नव्हती.
एका शेतात विहीर होती.तिथे वर्षभर भाज्या पिकवायची.घरची टमाटे,भेंडी,मिरची,वांगी…कशा ला काही कमी नव्हते.
गुराढोरांसाठी मोठा गोठा होता.दुधदुभत्याने भांडी भरलेली राहायची.दूध,दही,लोणी,ताक ….सगळेच मुबलक.
सीताई रवि घूसळून नेहमीच लोणी काढायची.
आता इथे चहा प्यायचा तरी एक आण्याचे दूध आणावे लागणार.सडासारवण करायचे तर शेण दुसरीकडून आणावे लागेल.
आई,गीताचा आवाज ऐकून विचाराची साखळी थांबली.
आई,मजा आली रेल्वेत.गीता आनंदी दिसत होती.
पण छोटे घर बघून जरा नाराज झाली.
गावावरुन आणलेली थोडी भांडीकुंडी सीताईने लावली.सध्या तीन दगडं आणून चूल बनवली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुरूवात केली.
दुसऱ्या दिवशी कुठूनतरी माती आणली आणि चूल बनवली. मनोहरने कोळशाची शेगडी आणून दिली.
पण सीताईला चुलीवरचा स्वयंपाकच बरा वाटायचा.
इथे जातं,पाटावरवंटा,खलबत्ता काहीही नव्हते.
भाजीसाठी वाटण वाटायचा मोठाच प्रश्न होता.
काही दिवस शेजाऱ्यांकडे वाटण वाटायला जावे लागले,मग सीताईने एकेक वस्तु जमा केल्या. इथे एक गोष्ट चांगली होती.वीज होती,एकच बल्ब लावला होता दोन्ही खोल्यांच्या मध्ये.पण कृष्णापूरला दिव्याखाली अभ्यास करण्यापेक्षा इथे अभ्यास व्यवस्थित होत होता.
तिघाही बहिणभावांच्या शाळा,काॕलेज सुरु झाले.
शाळेच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच श्रीधरने मी शाळेत जाणार नाही असे सांगितले. मनोहर आणि सीताईने त्याला खूप समजवले पण तो ऐकायला तयार नव्हता.
श्रीधरने शाळा सोडलीच.
मनोहरने प्रभाकरला पत्र पाठवून तसे कळवले. प्रभाकरने
शेती सांभाळायला श्रीधरला बोलवले पण श्रीधरला शेतीत
काम करायचे नव्हते.
तो मध्यप्रदेश मध्ये कोणी नातेवाईक राहायचे त्यांच्याकडे जायचे म्हणून मागे लागला. मागे त्या नातेवाईकाने श्रीधरला भोपाळला आला तर नौकरी मिळवून देईल असे सांगितले होते. श्रीधरने तेव्हाच त्याचा पत्ता घेतला होता.
श्रीधरच्या हट्टासमोर सीताई आणि मनोहरने माघार घेतली.
श्रीधर भोपाळला निघाला. सीताईला वाटले हा काही दिवसांसाठी जाईल आणि मागे फिरेल.
भोपाळ श्रीधरची कर्मभूमी बनेल असे कुणालाही तेव्हा वाटले नव्हते.
श्रीधरचे पत्र आले.
क्रमशः
Previous link
Next Part
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा





खुप छान👏✊👍
छान!
कथा हळूहळू पुढे सरकते.
आहे. छान कथा