तृष्णा
भाग-१३
तृष्णाच्या आईला आलेला संशय खरा असेल का?
वाचा खालील भागात
सखाच्या आयुष्यात दुसरी कोणी आहे याबद्दल हळूहळू ती ठाम झाली.दुसरी स्त्री आयुष्यात असल्याशिवाय पुरुष बायकोकडे एवढे दुर्लक्ष करणार नाही
मला तर काहीही सुचत नाही आहे.दुसरी कोणी असेल तरी मी कसे शोधू तिला? मला खूप भीती वाटतेय.
तसे असेल तर पुढे काय?बाळाचे काय? हा विचार काळजाचा ठोका चुकवतो.
सखा माझे आयुष्य आहे.तोच मला फसवत असेल तर….तृष्णा जोरजोरात रडायला लागली.
अमोल घाबरला.तृष्णाला कसे शांत करायचे.
कॕसेट बघतांना काळातील फरक तो विसरायचा,तृष्णा सोबत समांतर चालायचा,
ती समोर रडत आहे असेच त्याला वाटले.सखाचाही खूप राग आला.तृष्णाने रडत रडत शुटींग बंद केले.
अमोलनेही लॕपटाॕप बंद केला.
तृष्णाच्या आयुष्यात काय झाले असेल पुढे ? खरेच सखा दुसऱ्या स्त्री बरोबर…हा विचारही अमोलला नको वाटला.
का कुणास ठाऊक पुढचे शुटींग बघायची अमोलची इच्छा होत नव्हती.तिचे दुःख बघवणार नाही हा विचार मनात येत होता.
घरी निघून जावे का? आईबाबा तसेही यायला सांगत आहेतच.
कि तृष्णाचा शोध घेऊ? बाबांची मदत होईल का?
पण नको.बाबांना इथे कोणी राहत नव्हते असेच वाटत आहे.
विजयला अमोलने विचारले
विजय इथे आजूबाजूला तुझ्या ओळखीचे कोणी आहेत का रे?
नाही साहेब.
इथे आधी कोणी राहायचे त्याचा शोध कसा घ्यावा समजत नाही आहे.
साहेब वीस पंचवीस वर्षाआधी कोण राहायचे हे कसे समजणार? तेव्हा इकडे जास्त वस्ती पण नव्हती. एक-दोनच घरे असतील.
हो रे,पण प्रयत्न तर करावे लागेल.
पण साहेब नाव तर माहित पाहिजे.
तृष्णा.
तृष्णा नावाचे कोणी राहायचे.तृष्णा,तिचा सखा आणि बाळ असे तिघेजण राहायचे.
तुम्हाला कसे कळले साहेब?
कळले मला.
बरं विचारतो मी ओळखीच्यांना.
दोघांनी मिळून स्वयंपाक केला.
दोन तीन दिवस अमोलने कॕसेट लावली नाही.
घरून सतत आई,बाबा,अमोलीचे फोन येत होते.
बाबा सतत परत ये चा घोषा लावत होते.
अमोललाही त्यांना थांबण्याचे कारण सांगता येत नव्हते.
बाबांनी त्याला ह्या आठवड्यात आलाच पाहिजे असा दमच दिला.
तृष्णेचा शोध लागल्याशिवाय अमोल जाऊ शकत नव्हता.
विजयने गावात चौकशी केली.पण फक्त तृष्णा नावावरून कोणाला काही सांगता येत नव्हते.
आता पुढची शुटींग बघणे आवश्यक होते.
पाचवा महिना सुरु झाला.सातव्या महिन्यात आई मला माहेरी घेऊन जाणार आहे. बाळाच्या हालचाली जाणवतात आता आत. सुखद अनुभव अनुभवत आहे मी. सखाला पोटावर हात ठेवायला सांगते कधी कधी.बाळाने आत हालचाल केली कि आनंद दिसतो त्याच्या चेहऱ्यावर.
सखा खरेच माझाच आहे कि कुठेतरी गुंतला आहे? हा विचार मात्र कायम असतो डोक्यात.
कधी कधी वाटते सखाचा स्वभावच तसा असेल.मी उगाच संशय घेते त्याच्यावर. पण आईच्या अनुभवी नजरेचे काय मग?
सखा असे काही विचारले कि चिडतो.
मग मीही काही विचारत नाही. सध्यातरी बाळाकडेच लक्ष द्यायला हवे.
स्वेटर विणायला घेतले मी बाळासाठी.जवळपास पूर्णच होत आले.छोटेसे स्वेटर,छोटे छोटे हात,छोटे पायमोजे,छोटीशी टोपी सगळे कसे चैतन्यदायी वाटत आहे.
सखा कुठे गुंतला असेल तरी आमचे बाळ त्याला आणेल परत.
आज कविताकडे जाऊन आले.
मग सखासोबत नदीवर गेले.सखा आज माझा हात पकडूनच होता. उन्हाळा असल्यामुळे निर्मलेचे पाणी जरा कमी वाटत आहे. पण ती वाहत आहे पूर्वीसारखीच.
आधीची चंचलता कमी झाली तिची.संथपणा आला तिला आता माझ्यासारखा.
नदीच ती प्रत्येक ऋतूत वेगवेगळे सौंदर्य दाखवणारी.
नदी अविरत वाहणारी.
रात्री चंद्र आणि दिवसा
सूर्याचेप्रतिंबिंब सामावून घेणारी.डोंगरांनी आणलेले अडथळे पार करणारी
चढ असो उतार असो
सतत वाहणारी नदी.
आज एक महिन्यानी शुटींग करतेय.
आई गेली माझी.तृष्णा रडत रडत बोलत होती. माझे माहेर संपले.माझ्या बाळाची केवढी हौस होती तिला.डोहाळजेवण माहेरी करायचे म्हणून मला घरी घेऊन गेली.सखालाही आग्रह केला पण तो नाही आला.डोहाळजेवण संपले.दोघीही गप्पा करत झोपलो. आई माझा हात पकडून झोपली.
पहाटे उठणारी आई मी उठली तरी झोपून होती,माझा हात तिच्या हाती होता.मी आवाज दिला,तिला हलवून बघितले पण ती गेली होती दूर दूर.
सखा आला.आईच्या इच्छेनुसार तिचा देह दान केला.जीव लावणारे तिथे आता कोणी नव्हते.आम्ही परतलो.
कविता घर सोडून दुसरीकडे राहायला गेल्याचे सखाने सांगितले.आता मी खूप एकटी झाले.सखाच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही.आता मीही त्याला बदलवण्याचा अट्टाहास सोडला. पण मन? ते मध्ये मध्ये बंड करते.
मध्ये काही वेळ कॕसेट रिकामी होती.
क्रमशः
Next Part
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
खुप छान कथा मालिका