८-तिची आजी
मनोहर आणि श्रीधर घरापासून लांब होते.कधी सुट्ट्या असल्या कि दोघे यायचे.आता मात्र सीताईला प्रभाकरचा एकटेपणा बघवत नव्हता. एकटेपणामुळे मध्येमध्ये तो दारुही प्यायला लागला होता.
तिने प्रभाकरसाठी मुली बघणे सुरु केले.कोणीतरी एक नात्यातीलच मुलगी सुचवली.सीताईच्या मावसभावाची मुलगी इंदुमती. इंदुमतीचे बालपण सीताईसारखेच होते.दोन बहिणी,लहानपणीच आई गेलेली. सीताईने प्रभाकरला लग्नासाठी तयार केले. इंदुमतीही दिसायला सुस्वरुप होती. सीताईची सून बनून इंदुमती घरात आली.
यावेळी दयाला लग्नाला येणे जमले नाही. तिचे तिसरे बाळंतपण होते.दयाला मुलगा झाला. नरेश.
मनोहर आणि श्रीधर लग्नाला आले आणि लगेच वापस गेले. मनोहरने प्रभाकरला सांगितले,
दादा श्रीधरचे अभ्यासात मन नाही आहे.तो दिवसभर भटकत असतो.शाळा बुडवतो.
प्रभाकरने श्रीधरला समजवून सांगितले .श्रीधरही हो दादा हो दादा बोलला.
प्रभाकर-इंदुमतीचा संसार सुरु झाला.
इंदुमती सुगंधापेक्षा स्वभावाने वेगळी होती. पहिल्यादिवसापासूनच तिचे सीताईसोबत खटके उडू लागले. सीताईची काटकसर,कामसू वृत्ती तिला जाचक वाटू लागली. सीताईच्या विरोधात ती प्रभाकरचे कानं भरु लागली. नातलगांमुळे प्रभाकरचा आईबद्दल गैरसमज झाला होताच आता महानंदामुळे तो वाढायला लागला.
गीताशीही इंदुमती तुटकपणे वागत होती.
गीता सहावीत गेली,मनोहर मॕट्रीक झाला आणि श्रीधर दहावीत गेला.
प्रभाकरने विचार केला तिघा बहिणभावांना वसतिगृहात ठेवण्यापेक्षा एखादे घर घेऊन आईला त्यांच्यासोबत ठेवावे.
आईसोबत इंदुमतीचे उडणारे खटकेही त्याला कारणीभूत होतेच.
एका संध्याकाळी सीताईला प्रभाकर म्हणाला,
आई,मी काय म्हणतो, गीता आता आठवीत जाईल तिला वसतिगृहात नाही ठेऊ शकणार.त्यापेक्षा तूच तिघांसोबत तिथे गेली तर. एक घर घेऊ तिथे.
सीताईला प्रभाकरचे बोलणे ऐकून धस्स झाले. हे घर सोडून
राहण्याचा विचार ती कधी करुच शकत नव्हती. हे घर म्हणजे तिचे विश्व होते.तिच्या आठवणींच्या गाठोड्यात या घराशिवाय काहीही नव्हते. मुख्य म्हणजे या घरात तिला रामचे अस्तित्व जाणवायचे,राम सोबत आहे ,मी एकटी नाही अशी भावना राहायची.
आणि तिच्या मुलांच्या आठवणी,सुगंधा,राजश्री….या सगळ्यांना सोडून दुसरीकडे मी कशी जावू? असे कैक
विचार तिच्या डोक्यात आले पण नेहमीप्रमाणे ते विचार आतच राहिले मनाच्या आतल्या कुपीत.
ती प्रभाकरला म्हणाली,
मी या घराशिवाय नाही राहू शकणार रे.
आई,तुला कायमचे नाही राहावे लागणार.एकदा शिक्षण संपले कि वापस पुन्हा इथेच यायचे आहे.आणि मध्येमध्ये तू शकतेस कि.
पण तू गेली नाही तर गीताचे काय? तुझ्यामुळे तिथे श्रीधरवरही वचक राहील. सीताईला कळून चुकले गेल्याशिवाय पर्याय नाही.
प्रभाकरला वडील गेल्यामुळे त्याच्यावर पडलेल्या जबाबदारीने व्यवहारात हुशार बनवले होते.त्याचे म्हणणे तो सहजतेने समोरच्याला पटवून देत असे.
सीताईचे बरेचसे म्हणणे मनातल्या मनात चालायचे. किंवा राघूमैनाशी बोलत बसायची.
मनोहर सीताईसारखा होता स्वभावाने. त्यालाही आपला मुद्दा समोरच्याला पटवून देता येत नसे.
प्रभाकरने आईला पाठवणे नक्की केले.
गीतालाही इथल्या मैत्रिणींना सोडून जायची इच्छा नव्हती.पण मोठ्या शहरात राहायला मिळणार म्हणून ती तयार झाली. सुट्ट्यांमध्ये मनोहर,श्रीधर,घरी आले.घरातील बदललेले वातावरण त्यांच्याही लक्षात आले.पण दादापुढे कोणी काही बोलू शकत नव्हते. दादाचा घरात दरारा होता.घरातला कर्ता पुरुष आता तोच होता. तो जे ठरवेल ती पूर्वदिशा.
दोन महिने आता सुट्ट्याच होत्या. मनोहर,श्रीधरचा वेळ मित्रांसोबत भटकण्यातच जायचा.
इथले वातावरण त्यांना यवतमाळला अनुभवायला यायचे नाही.इथे नदीवर,विहिरीवर रोज पोहायला मिळायचे.
नदीवरुन सरळ शेतात जायचे. आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या खाली पडून असल्या कि दोघे भाऊ त्या जमा करायचे आणि घरी घेऊन यायचे. मग महानंदा भाभी त्याचा मेथांबा किंवा आमरस बनवायची. ती सुगरण होती.चवदार स्वयंपाक बनवायची.
इंदुमतीला आता दिवस गेले होते.
पुन्हा एकदा घर आनंद झेलायला तयार झाले……
क्रमशः
Privious link
Next Part
उन्ह आणि पाऊस यांचा सतत लपंडाव सुरु असलेले सीताईचे आयुष्य पुढे काय काय सोसत रहाते….वाचत रहा तिची आजी कथामालिका
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
छान कथा
सुरेख लेख!
कथामालिका आवडली.👌👌