body
मन-मराठी कविताआणि लेख
मन-मराठी कविताआणि लेख

मन-मराठी कविताआणि लेख

मनाच्या खिडकीतून

मन-मराठी कविताआणि लेख

मी कवी नाही
मी कवयित्री नाही
मी शब्दप्रभूही नाही
नाही माहीत मला
काव्याचे अनेक प्रकार
नाही माहित मला
छंदा वृत्ताचे प्रकार
मी एक गृहिणी
घराच्या खिडकीतुनच
आकाश पाहणारी
आधीच स्त्रीचं जग असतं
आक्रसलेलं
त्यात मनाची खिडकी
ती केवढी,
पण भावभावना असतात
काठोकाठ भरलेल्या,
संवेदना असतात ओतप्रोत
टिपुन घेत असते
रोजचे अनुभव,
माणसांचे स्वभाव
निसर्गाचे बदलते मौसम
तिच्याही नकळत
कधी एखादं बीज पडतं
मनात,
आणि होतो शब्दांचा कल्लोळ
अस्वस्थ होते पुनः पुनः
कागदावर उतरवण्यासाठी
होते कधी कविता
होते कधी आत्मकथन
नसते दुर्बोध,
नसते परिपुर्ण
कधी शब्द पडतात तोकडे
तर कधी होतात अपुरे
पण असते सहज सोपी
प्रत्येकाचे अनुभव
जसे मनातले

सौ वीणा विश्वास चव्हाण

चंचल मन

 

मन पाखरू वेल्हाळ
भिरभिरे गगनात
उडे वाऱ्यासवे स्वैर
कल्पनेच्या दुनियात

मन वेडं भक्तीमय
वारीमध्ये हरपते
विठ्ठलनामात दंग
विठूभेटी उल्हसते

करी होत्याचे नव्हते
असे ताकद अफाट
अडचण येता लढे
देई उकल क्षणांत

मन अवखळ वारू
कधी क्रोधे धुसफुसे
दावी चंचल भावना
कधी हर्षभरे हसे

मन हे फुलपाखरू
बागडते स्वछंदाने
मधुकण वेचियते
जीवनात आनंदाने

कप्पा मनाचा गहन
खोल असतो गाभारा
नच उमजे सहज
पळे देऊनी पोबारा

मायमन मायाळूच
ममतेचा वाही झरा
निरागस निरपेक्ष
मुलांसाठी जन्म खरा

 सौ. मालती धामणे

चंचल मन

चंचल चपळ
अदृश्य मन
सारखं असतं अस्वस्थ
कधी असतं फुलपाखरू
हसरं नाचरं
आनंदानं भिरभिरणारं
कधी रडतं आतुन
राहून नुसतं अव्यक्त
तर
कधी व्यक्त होतं अश्रुंचा
बांध फुटुन
मेणासारखं जातं वितळून
कधी चिडचिडतं
रागावून तर
कधी लाव्ह्यासारखे येतं
उसळुन
कधी होतं असुरक्षित
हरवुन जातं अनाम जागेत
शोधुन शोधुन होण्यास
मार्गस्थ
आणावं लागतं हातास धरून
कधी रात्री उशिरा पर्यंत
सोडवत असता
प्रश्नांचा गुंता
थकुन होतं
निद्रेच्या अधीन
उजाडता परत ताजं होऊन
प्रश्नांना मग जातं भिडून
कधी वाटतं ते शांत झोपलं
जणु बाळ दुलईवर
मध्येच हसतं मध्येच रडतं
वाटलं जरी ते
गाढ झोपेत

सौ वीणा विश्वास चव्हाण

चंचल मना

 

मन उडते उडते
भिरभिर दाही दिशा
उनाड कसं थांबवू
चंचल मनाले अश्या….

मन वढाय वढाय
जसं सैराट पाखरू
तुझ्याच रे अठोणीत
याला कसं मी आवरू….

मन पाखरू पाखरू
उडे धुंद वाऱ्यावर
दिसभर सैराचार
धावे फुला पानावर….

मन हळवं हळवं
कसं जोपासावं याला
आपलंच जीवापाड
कसं सावरू मी त्याला…

मन लबाड लबाड
पळते जोमानं भारी
कसा लावावा लगाम
मनाची तऱ्हाच न्यारी….

मना तूच आता सांग
कसं ठेवू जागेवर
मनमुराद वागणं
कवा येई ताळ्यावर….

सौ.पद्मजा जोशी

पुसद

कोलाहल मनातला

उधळपट्टी
असलेल्या मनाने
स्वतःबद्दल अस्वस्थ
असलेल्या मनाने
समजुन घ्यावे स्वतःला
जे असाध्य, अप्राप्य
जे आहे कुवतीबाहेर
सीमारेषा ओळखुन त्याची
शांत व्हावं, राहावं समाधानी
आणि
कोलाहल मनातला शांत व्हावा
आत्मप्रौढीने दुसऱ्याना
दुखावणारे
आपणच पुढे राहावयास हवे
म्हणुन
भल्या बुऱ्या मार्गाने पुढे येणारे
आणि बुद्धी कौशल्य
असुनही मागे पडणारे
हे सगळं चुकीचं आहे हे जाणवताना
कोलाहल मनातला शांत व्हावा
संपत्तीचं प्रदर्शन करत
उधळपट्टी करताना
ज्यांच्याकडे काहीच नाही
त्यांच्याबद्दल असंवेदशील असणाऱ्यांचे वर्तन
मनाला दुखावत असताना
होणारा
कोलाहल मनातला शांत व्हावा
हातांना यथायोग्य
काम मिळावे
विचारांचे दान मिळावे
बाहेर चाललेली
रस्सीखेच
दुर्लक्षित व्हावी
मनाला भावेल असं
स्वतःच्याच मनात स्थान मिळावं
आणि
कोलाहल मनातला शांत व्हावा

सौ वीणा विश्वास चव्हाण

 

मनाचे पहलू

 

मना तुझ्या छटा ……….
कधी
नव तरुणी च्या
पाठीवर रुळणार्‍या
सोनेरी बटा
तर कधी
वण वण फिरणाऱ्या
भणंग योग्याच्या जटा
मना तुझ्या व्यथा ………..
कधी सागर तटीची
मोहक चांदणरात
तर कधी
त्सुनामी कहरी लाट
मना तुझा निवारा……
कधी
थंडीत बिलगणारा
गुलाबी वारा
तर कधी
अवकाली पडणाऱ्या
टपोर गारा
मना तुझा थाट
कधी
दाट जंगलातून जाणारी
रमणीय पाऊलवाट
तर कधी
रणरणत्या उन्हात
आलेल वादळ सुसाट
मना तुझ स्तवन…………
कधी
पारिजातका च्या फूलांनी
आच्छादिलेल अंगण
तर कधी
काटेरी कुंपणांनी वेढलेलं
केवड्या च बन
मना तुझ स्वरुप………
कधी
देवा वरच
काढलेल निर्माल्य
तर कधी
देव्हाऱ्यात घमघमणार
सुगंधी धूप
मना तुझ चिंतन………
कधी
कोवळ्या ,,हळव्या
मनी ची संवेदना
तर कधी
प्रौढ मनाच
विचार मंथन..

.@$

हि कविता ऐकण्यासाठी खालील लिंक बघा

https://youtu.be/ht72HNv-cJw

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!