राजश्री हिमगिरे
राजश्री हिमगिरे

राजश्री हिमगिरे

कृष्णभेट

सावळा गं कृष्ण माझा
सावळाच डोह यमुनेचा
हरवला सावळा कृष्ण
सावळ्या रंगात कधीचा…

उमटली गाली दुधाच्या
एक खळी ती लाजरी
आनंदात नाहली नगरी
जादू पसरली हासरी….

जादू तुझ्या हसण्याची
गोपगोपी वेडावल्या
बासरीच्या सुरावर
ब्रजसुंदरी भुलवल्या….

फेर धरुनी नाचती
काम सारे विसरली
वेणूच्या सप्तसुरांनी
राधा देहभान हरपली …

कृष्णरंगी सावळले
अंबरीचे नभ कोवळे
वृंदावनी रंगी रंगले
कृष्णभेटीचे सोहळे….

 

लक्तर

लक्तर जेव्हा अंग झाकू लागली
बेभाव तेव्हा इज्जत विकू लागली…

टोपलीत जेव्हा भाकरी वाळू लागली
पाणाळलेली जीभ आवंढा गिळू लागली…

ऊन सावली जेव्हा लपंडाव खेळू लागली
अनवाणी पावलं तेव्हा उन्हानं होरपळू लागली…

शाळेत अक्षरांची जेव्हा गर्दी होऊ लागली
वाळूत अक्षरे तेव्हा वर्दी देऊ लागली…

अंतर-मराठी कविता

 

लिहिताना कितीही जपलीअक्षर,

तरी खाडाखोड होतेच कुठेतरी कागदावर

आणि वाढत जातं अंतर ओळीओळीतलं…

बोलताना कितीही जपलीत शब्द

, तरीओरखडा पडतोच कुणाच्यातरी मनावर

आणि दुरावत जातं अंतर मनामनातलं…

तोडताना फुलांना अलगद जपल्या पाकळ्या

तरी,कोमेजतातच त्या आपल्या हळुवार वाटणाऱ्या स्पर्शाने

आणि खुडत जाते एकेक पाकळी त्या फुलांची…

रंग भरता भरता चित्रात,

ओघळतात कुठेतरी एखाद्या रंगाचे ओघळ कॅनव्हासवर

आणि चित्रकार निर्विकार होऊन जातो त्या ओघळाला पाहून…

एखाद्या रम्य सायंकाळी

आठवणींची पाखरं परततांना हलकासा स्मृतीचा दरवळ सोडून जातात मनभर

आणि कडूगोड अनुभवाने धूसर होत जाते सायंकाळ…

शांतपणे आईच्या कुशीत लुप्त होतानाही

र्याने दिवसभर घातलेला धुडगूस, पसरून राहतो आकाशात लालसर

आणि मग हरवून बसतं निजरूप आकाश…

प्रत्येकचजण आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा सोडून जातो,

कधी अनिच्छेने तर कधी जाणीवपूर्वक दूरवर

आणि हरवून जातो अंनत यात्रेच्या प्रवासात…

सौ. राजश्री म. हिमगिरे(विभुते)

 

माझा खून- मराठी कविता

शोधता शोधता आपली माणसं,जगणं विसरून गेलो…
जग हे कुणाचे भल्या माणसा मी मलाच गाडून आलो…

का ही धडपड मनात घर करून राहण्याची वेड्या
माझेच मी पिंडदान राबत्या घरात करून आलो…

कोण कुणाचे बाईल भाचे,नुसतीच खणखण पैशाची…
बाप उपसतो सूरी मुलावर,माझाच खून मी करून आलो…

व्यर्थ शिणली माता,उगाच जन्मा आलो मी
जमिनीच्या तुकड्यापायी माझेच तुकडे करून आलो…

विसरली सारीच नाती,वृथा गेला माझा जन्म सारा
मातीत मिळाले आयुष्य माझे,माझीच माती करून आलो…

सौ. राजश्री म. हिमगिरे(विभुते)

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!