शिल्प
Marathi sad poem
तुला ती जशी हवी
तसे शिल्प बनवत गेला
कुठे छन्नी हातोडा वापरला
तर क्वचित मुलायम कुंचला
नष्ट करत गेला
तिची अवखळता,
चंचलता, खळाळते हास्य,माधूर्य.
तीही बनत गेली
तुझ्या मनातील शिल्प
कोरलेले,भावनाहीन,
तुला आवडेल तसेच
शिल्प आता तयार झाले
तू आता आनंदात भिजतोस
मनःपूत शिल्प बनले या बेहोषीत
पण तुझ्या स्पर्शाने ते मोहरत नाही
कधी खळखळून हसत नाही
कि मनसोक्त रडत नाही
तू शिल्पावर ओढलेली स्मितरेषा
तेवढेच असणार आता स्मित तिचे
तू डोळ्यात दुःख दाखवलेले
तेवढेच दुःख असणार तिचे.
शिल्पच ती, तू कोरलेले
तुझ्या इच्छेवरच आता
तिचे हास्य,दुःख आणि जिवंतपणाही……
प्रिती
तू मालक
आणि डोळे कोरडेच राहतात
जगण्याच्या
टोकदार लढाईत
झालेल्या जखमा भरून निघताना
अश्रुंचं पाणी कधी रिकामं होत जातं
कळत नाही आपल्याला
जीवन संघर्षात
अनिच्छेनेच
भावना गोठत जातात
कधी भावना गारठतात
मनाचा दगड होऊन कधी
त्या ताठरतात
अश्रुंचा बांध फुटून
रडणं कधी अनावर होत नाही
मनाचा आकांत हमसुन हमसुन कधी
बाहेर फुटत नाही
मन आक्रंदत राहतं
पण ओठ मिटून आणि
डोळे सुके ठेवून
सोपस्कार महत्वाचे ठरतात
प्रथेपणे रीती होतात
आपल्या बरोबर असणारं आपलं माणूस,
आपल्याला हवंहवंसं
असणारं आपलं प्रिय माणूस
निघुन जातं आपल्यातुन
त्याचं असणं कायमचं
मिटुन जातं आपल्यातुन
तरीही कोरडे राहून विधी पार पाडत जातो आपण
मनातुन स्विकारत वास्तवाला
पुढे कराव्या लागणाऱ्या तडजोडींची जुळवाजुळव करत
आठवणींवर जगणं जगत जातो आपण,
हळु हळु
जगण्याच्या रस्सीखेचीत
आठवणीही कधी गहाळ करतो आपण
मात्र
मनातुन मनाने हरुनही मनाचे
हरवलेपण इतरांना
कधी जाणवू देत नाही
म्हणुनच
मनातुन फक्त लढणंच
जागं राहतं
जे डोळयांना सुकं करून सोडतं
सौ वीणा विश्वास चव्हाण
स्वप्ने
रात्रीला आग लागली
स्वप्ने सगळी भाजली
जीवाची झाली काहीली
चंद्राची साथ ना लाभली
चंद्र आता दुरावला
गगनही अंधारला.
आठवतो ताऱ्यांचा फुलवा
डाचतो किती ह्दयाला
ह्दय आता भंगले.
प्रेमही नासले.
भावनांचे तरंग आता
एकएक विरले.
विरल्या एकएक भावना
जीर्ण झाले धागे
नाही विझवता आले
भाजलेल्या स्वप्नांना
भाजलेली स्वप्ने
आता सगळी संपले
आग लागली रात्रीला
तम जीवनी दाटले
प्रिती’
झपाटलेला
मी बघितले,
आणि अनुभवलेही
सतत झपाटलेल्या तुला
झपाटलेपण तुझे जगणे
एखाद्या गोष्टीचा मनाने ठाव घेतला कि
रात्रंदिवस ती एकच गोष्ट करायचा
पूर्णत्वास नेईपर्यंत
भूक तहान विसरुन.
तडीस नेल्यावर कोण आनंद
व्हायचा तुला.
आम्ही कंटाळायचो तुझे झपाटलेपण बघून
पूर्ण घरच वेठीस धरायचा तू.
तुझ्या झपाटलेपणाच्या भीतीपायी खूप
काही सांगतही नव्हतो आम्ही तुला.
कारण आम्हाला आवडणाऱ्या
गोष्टीही तू तेवढ्याच झपाटलेपणाने करायचास.
तूझी धावपळ कधी कधी बघवत नव्हती…
हे सगळे आठवत आहे रे तुला व्हिलचेअरवर बघून
प्रिती
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा