अस्मिताच्या आयुष्यात पुढे काय होते….वाचा पुढील भागात
अक्षम्य
काही गुन्हे अक्षम्य असतात
भाग -९
तुम्ही त्यांना घटस्फोट घेणार हे सांगितले का?
हो.सांगितले.पण त्यांना फरक नाही पडत.
मला वाटते अस्मिता थोडा वेळ जाऊ द्यावा.
माझ्या आयुष्यातील पाच वर्ष गेली.अजून किती वर्ष वाट बघायला हवी.
तुम्हाला माझी केस नसेल घ्यायची तर नका घेऊ. काही हरकत नाही.
अहो तसे नाही.पण कोर्टात जाण्याआधी काही अभ्यास तर करावाच लागेल मला.त्याआधी आपल्याला दोन तीनदा तरी भेटावे लागेल.
चालेल मला.
तुमच्या मुलीचाही विचार करावा लागेल.
उर्मी,माझी मुलगी तिला होस्टेलमध्ये ठेवले आम्ही.
पण एकच तर मुलगी आहे.तिला ही होस्टेलमध्ये ठेवले.
आमची भांडणे एवढ्यात वाढली होती. श्रीकांतने तिच्या
मनावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून तिला होस्टेलमध्ये ठेवले.
आणि तुम्ही तयार झाल्या?
मी चांगली आई नाही असे श्रीकांतचे मत आहे.हळूहळू उर्मीलाही तसेच वाटत आहे.
बरं आपण एकदोनदा सविस्तर बोलू आणि ठरवू या काय करायचे ते.
ठीक आहे.येते मी.
आनंदसर बाहेर सोडायला गेले.
आनंद घरी आल्यावर शलाकाने अस्मिताबद्दल विचारले.
आनंद अस्मिता काॕलेजमध्ये व्यवस्थित असते का?
हो ग.
नाही मला जरा ती डिप्रेशनकडे झुकलेली वाटली.
काॕलेजमध्येही जरा टेंस वाटते कधी कधी.
पण ती कंट्रोल करते बरेचदा.
हावी होऊ देत नाही टेंशनला.
पण मि.पवार का वेळ देत नसतील? अग त्यांची नौकरीच तशी आहे. सतत बिझी.
हो रे.पण कुटुंबासाठी सगळ्यांना वेळ द्यावाच लागतो.खूप नाही पण थोडा तरी वेळ काढता यायला हवा.
शलाका, अग मी बाबांना बघितले ना लहानपणापासून.तेही आम्हाला फार कमी वेळ द्यायचे.नौकरीमुळे देऊ शकत नव्हते.पण आईने कधी तक्रार केली नाही.
अरे बाबांची नौकरी वेगळी होती.आणि संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते यायचेच घरी.
आणि आईचे म्हणशील तर आईने तुम्हा दोघांमध्ये स्वतःला व्यस्त केले होते.
आणि अजून एक आईच्या बाबांकडून कदाचित् माफक अपेक्षा असतील.
सगळ्या व्यक्ती, त्यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात.अस्मिताला एकच मुलगी.तीही होस्टेलमध्ये.साहजिकच नवऱ्याने वेळ द्यावा अशी अपेक्षा असणार.
पण म्हणून चक्क घटस्फोट?
पाच वर्षात दुरावा खूप वाढला असेल.
अजून एकदोनदा भेटल्याशिवाय नक्की काय हे सांगता येणार नाही आपल्याला.
नंतरच्या आठवड्यात अस्मिता पवार आल्याच नाहीत काॕलेजमध्ये.
आनंदने फोन करुन बघितला.तब्येत ठीक नाही असे कारण सांगितले.
नंतर एका रविवारी दुपारीच आनंदच्या घरी आल्या.
अरे वा!
अचानक
हो शलाका.काॕलेजमधून आले कि संध्याकाळ होते मग बोलायला मिळत नाही. म्हणून म्हंटले आज रविवार आहे तर दुपारीच जावे.मी डिस्टर्ब तर नाही ना केला.
नाही नाही.या.बसा
शलाका म्हणाली.
खरे म्हणजे आज आई-बाबांबरोबर नाटकाला जायचा बेत होता.
पण अस्मितामुळे शलाकाने लगेच बेत रद्द केला आणि नक्षत्राला फोन करुन आईला घेऊन आई-बाबांसोबत जायला सांगितले.
आई-बाबांसोबत मुक्ताही गेली.त्यामुळे शलाकाजवळ निवांत वेळ होता आता.
आनंदनेही शलाकामुळे नाटकाला जाण्याचे टाळले.शलाकाला खूप दिवसांपासून ते नाटक बघायचे होते. पण नाटकापेक्षा अस्मिताला भेटणे तिला महत्वाचे वाटले.
बोला तुम्ही दोघी.मी माझी एक अपूर्ण कथा आहे ती पूर्ण करतो. असे म्हणत आनंद तिथून उठला.
शलाकाने विचारले,
अस्मिता मध्ये तुम्ही सुट्टीवर होत्या नं.
आनंदने सांगितले तब्येत ठीक नव्हती असे.
हो. मी आनंद सरांना खोटेच सांगितले.
माझे मनच लागत नाही शलाका कुठे.
मी आठ दिवस माझ्या मित्र मैत्रिणींना श्रीकांतवर पाळत ठेवायला सांगितली.
काssssय?
शलाकाने जरा जोरातच विचारले.
हो. मला एक निनावी फोन आला होता.श्रीकांतचे अफेयर आहे असा.
अहो मग सरळ त्यांनाच विचारायचे.
ते सांगणार नाहीत हे मला माहिती होते.अतिशय चाणाक्ष मनुष्य आहे.
मग काय शोधून काढले तुमच्या मित्र मैत्रिणींनी?
आहे खरेच एक स्त्री आहे त्यांच्या आयुष्यात.
मला कामे खूप आहेत,मी बिझी आहो असे सांगत ते तिच्यासोबत राहतात.
तुम्ही बोललात या विषयावर त्यांच्याशी?
अहो भेटले तर बोलणार. फोनही उचलत नाही आहेत माझा.
शलाका मला नाही राहायचे त्या माणसाबरोबर.
अस्मिताची व्यथा शलाकाला समजत होती.
मी माझ्या एकटेपणासाठी क्षमा केलेही असती त्याला पण ही फसवणूक नाही सहन करु शकणार मी.
मला वेगळे व्हायचे त्याच्यापासून.असे म्हणत असतांना अस्मिताच्या दुःखाचा बांध फुटला.ती ओक्सीबोक्सी रडू लागली.त्या आवाजाने आनंदही त्याच्या खोलीतून बाहेर आला.
बरं. एकदा आपण बोलू त्यांच्याशी.
दोघांनाही एकमेकांबरोबर नसेल राहायचे तर सोपे जाईल सगळे.
नंतर काही दिवस अस्मिता शांत होती.काॕलेजमध्ये यायची.
बुद्धीने कुशाग्र असलेली अस्मिता गोल्ड मेडलिस्ट होती.
तिलाही युपीएससी द्यायची होती.पण श्रीकांतसारखा जोडीदार मिळणार नाही म्हणून आईवडिलांनी तिचे लग्न लावले.
लग्नानंतर घर सांभाळायची जबाबदारी एकटीवरच पडली.
तरीही घर सांभाळत तिने पी.एच.डी केली.
दिसायला देखणी,प्रगल्भ व्यक्तीमत्व असलेली अस्मिता श्रीकांतला का आवडत नसेल?
शलाकाला प्रश्न पडायचा.
शलाकाने अस्मिताला फोन करुन श्रीकांतशी बोलणे झाले का विचारले. अस्मिताने तो घटस्फोटासाठी तयार नाही असे सांगितले.
शलाकाला आश्चर्य वाटले.
का?
उर्मीला दोघांची गरज आहे असे म्हणतोय.
मग तुम्ही काय ठरवले?
मला वेगळे व्हायचे आहे.
मग उर्मीचे काय?
अहो,जगात मी काय पहिली स्त्री असणार का घटस्फोट घेणारी.
उर्मी तशीही होस्टेलमध्येच राहते.
सुट्टयांमध्ये तिला ज्याच्यासोबत राहायचे तिथे राहील.
मी आई आणि श्रीकांत बाबा असणारच ना तिला.
आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे होणार तिच्यापासून नाही.
पण श्रीकांत तयार नसेल तर वेळ लागेल अस्मिता.
बघ ना शलाका तो आरामात एका बाईसोबत राहतोय.वेळ लागला तरी काही फरक नाही पडणार त्याला.मी एवढे दिवस एकटीच होते.आणि आता घटस्फोट घेतांना वेळ लागेल तेव्हाही मीच एकटी. सगळेच विचित्र आहे ना.
अस्मिता विषन्नपणे बोलली.
शलाका काही बोलली नाही त्यावर.
क्रमशः
पुढील भागाची लिंक
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.









छान कथा मालिका.
खरंच स्त्री मन कळणे, सोपे नाही.
प्रत्येकीची वेगळी समस्या
छान कथा