भेळ, बो आणि ती
मनोज एक साधासुधा मुलगा नुकतीच 11 वी करून 12वी सुरू केलेला.
त्याची एक गोष्ट. मनोज की कहानी मनोज की जुबानी.
माझी बारावी सुरू झाली होती. दहावी ला मेरीट लिस्ट थोडक्यात हुकली होती. हो…मी आज पन्नाशी ओलांडली आहे, त्यावेळेस मेरीट लिस्ट होती. अकरावी तशी बरी गेली ,आणि महत्वाचे वर्ष सुरू झाले.
त्यावेळेस C division मधे एक अंजली नावाची मुलगी होती. त्यावेळेस च्या division ह्या मार्कानुसार नव्हत्या तर विषया नुसार होत्या, maths साठी A, आणि Bio साठी C. अशी विभागणी होती. तर ती अंजली माझा क्रश होती. बऱ्यापैकी उजळ, नाक डोळे जिथल्या तिथे, आणि खुप छान असे केस. काळेभोर, दाट, आणि कंबरेपर्यंत रूळणारे, त्यामुळेच माझा क्रश होती. मी अगदी मुद्दाम तिच्याशी बोलण्याचा, लगट करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. पण मनाच्या एका कोपर्यात ती होती नक्कीच. विशेषतः तिचे केस खुपच आवडायचे. सतत त्यांना बो लावणे, आणि लावलेला काढणे हा तिचा चाळाच होता.
मी मैदानी व्यायाम त्या वेळेस करायचो. व्यायाम म्हणून च हातोडा फेक करायचो. म्हणजे फेकण्यापूर्वी तो जो वेगात गोल फिरवावा लागतो तो माझा व्यायाम होता. आणि आता फिरवलाच आहे तर फेकावा लागायचा.अशी माझी हातोडा फेकीची प्रॅक्टिस होती. शेजारच्या गावात ही एक college होते,त्यांचे आणि आमच्या college चे मैत्रीपूर्ण संबंध होते. आणि हो आमचे college हे करण जौहर च्या सिनेमात दाखवतात तसे hifi नव्हते. नागनाथ मंजूळे दाखवतो तसे साधेच होते. मी हाॅस्टेल ला रहायचो. तर ती गावात च रहाणारी होती.
शेजारच्या गावातील college ने एक track and field स्पर्धा ठेवली होती. आमच्याही college ला बोलावले होते. P.T. च्या सरांनी माझी निवड केली हातोडा फेकि मध्ये मी काही जाणार नव्हतो. पण अंजली ची ही निवड झाली आहे हे समजल्यावर मी जायचे ठरवलेच.
दोन दिवसांचा Event होता. पण आम्ही संध्याकाळी परत येऊन दुसर्या दिवशी परत जाणार होतो. सरांनी 4,5 जणात मिळून लागणारे टमटम चे भाडे दिले होते. सकाळीच स्टँडवर जमा झालो. एका टमटम मधे बसलो आणि तिथे गेलो.अर्थात माझा बराचसा वेळ तिच्याकडे चोरून पहाण्यात जात होता. तिची केस सावरायची अदा मला घायाळ करत होती. बहुतेक तिच्या लक्षात आले नव्हते. आणि मी नेहमीप्रमाणेच जवळीक साधण्याचा, उगाच त्रासदायक स्पर्श करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. माझ्या लिमीट मध्येच होतो. फक्त एकदा वार्याने केस उडत होते, म्हणून तिने मानेला एक छान झटका देऊन ते समोर घेतले, त्यावेळेस ते माझ्या हाताला स्पर्शून गेले. आजही तो स्पर्श आठवतोय. तर पहिला दिवस गेला. दुसर्या दिवशी सरांनी संध्याकाळी पार्टी करा असे म्हणून 9 रूपये दिले होते. तो दिवस संपल्यावर आम्ही पार्टी सुरू केली.म्हणजे काय तर 9 रूपयांची भेळ घेतली एका झाडाखाली बसलो, मधे भेळेचा ढिग ठेवला आणि खात होतो. मी तिच्याकडे पहातच होतो. केस मोकळेच सोडले होते. अचानक तिने बो लावायला घेतला. ते मान किंचीत मागे करून हलवणे, दोन्ही हाताने एकत्र करणे चालू होते, मी थोडा खट्टू झालो, किंचीत डोळे बारीक करून मनातच एक उसासा टाकला मात्र तिची नजर माझ्याकडे गेली. मी तसे पाहिल्यास पकडलोच गेलो होतो. तिला क्षणातच सगळा अंदाज आला. मी जरा मनातून टरकलो. तिने डोळे मोठे केले, पण बो लावणे कॅन्सल केले.बो परत मनगटात सरकवला आणी माझ्याकडे पाहीले, …झाले का तुझ्या मनासारखे…या आविर्भावात. नंतर आम्ही परत आलो. ही घटना तिथेच संपली.
नेहमीप्रमाणेच college सुरू होते. मी आधी प्रमाणेच माझे वागणे ठेवले होते. जाणून बुजून तिच्या वाटेत उभे रहाणे,मागे मागे करणे असे काहीच नव्हते. थोडेफार hi hello व्हायचे. फक्त एकदा मी चहा साठी टपरीवर जाताना ती वाटेत दिसली…कुठे चालला आहेस?
चहा घ्यायला
चल मी पण येते…तशीच घरी जाईन
आम्ही चहा घेतला, अभ्यास कसा चालू आहे वगैरे बोललो. तिने मुद्दाम काही केसांशी चाळा केला नाही. बो लावलेलाच होता. तो तसाच ठेवला. नंतर ती निघून गेली, मी हाॅस्टेल ला आलो.
पुढचे काही महीने अभ्यास एके अभ्यास…नाही म्हणायला सकाळी मैदानावर जात होतो.
परीक्षेच्या आधी काही दिवस ती परत एकदा भेटली,म्हणजे म्हणाली की तुलाच शोधत होते. आता उद्यापासून मी येणार नाही घरीच अभ्यास करणार आहे.थेट परीक्षेलाच येईन. तू ही मन लावुन अभ्यास कर.
परीक्षेला आमचे नंबर वेगवेगळ्या college मधे होते. त्यामुळे ती भेट तशी शेवटचीच ठरली.
रिझल्ट लागला त्यादिवशी मला तापाने नको जीव केला होता. म्हणून वडील च निकाल घेऊन आले.मी मेरीट मधे आलो होतो, चार जण मेरीट मधे होतो,त्यात ती ही होती. वडिलांनीच सांगीतले.
नंतर बरीच जवळपास 30 वर्ष काहीच खबर बात नाही.
मी इंजिनिअरिंग नंतर service सुरू केली, यथावकाश लग्न ही झाले. प्रमोशन, नौकरी बदलणे हे चालूच होते. बोलता बोलता एकदा बायकोला…म्हणजे नेहा ला मी ही गोष्ट सांगीतली होती. तिने ही ती positively घेतली होती. उलट कधी कधी strighning ची हेअरस्टाईल केली की….मुद्दाम चिडवायची….तीच्या सारखी आहे का? वगैरे.
आणि एकदा TV वर बातम्या चालू होत्या. एका जिल्ह्य़ात अतिवृष्टी झाली होती. त्याबाबत काय उपाययोजना आहेत या बाबत जिल्ह्य़ातील एक मोठी महिला अधिकारी माहिती देत होती. मी थक्कच झालो. ती अंजली होती. तशीच छान दिसत होती. फक्त केस कंबरेपासून खांद्यापर्यंत आले होते. लगेच नेहा ला बोलावून दाखवले की हीच ती अंजली…मग आम्हीच तिच्याशी संपर्क साधला. तर तिने लगेच ओळखले.
ते दुसर्याच दिवशी पुण्यात येणार होते, नेहा ने घरी यायचे आमंत्रण दिले….म्हणाली….उगीचच..तुम्ही काय आमच्या ह्यांच्या बालमैत्रीणी…ती सध्या काय करते….हे जाणून घ्यायचेच आहे….तिने ही तसेच काही तरी गमतीदार उत्तर दिले.
त्यांची कामे झाल्यावर ते दोघे घरी आले. तिने मिस्टरांशी ओळख करून देतानाच मी सांगीतले होते ना…..अशी करून दिली.
गप्पाटप्पा सुरू होत्या. मिस्टर खाजगी कंपनीत च होते त्यामुळे सुत जमायला वेळ लागला नाही. अशातच तो भेळे चा विषय निघाला, तर एकदम वातावरणच बदलून गेले. ती आणि ते गंभीर झाले, तिच्या डोळ्यात तर पाणीच आले. चेहरा हातात लपवून ती थोडावेळा बसून राहीली. निशब्द शांतता. मी आणि नेहा गडबडलोच.
मग तिच्या मिस्टरांनी सुरूवात केली, म्हणाले तो किस्सा आम्हाला माहीत आहे. तिने त्याचसाठी कधीच केस कापले नाही. पण पहिल्या बाळंतपणात बरीच Complication झाली. तब्येत खुप खालावली आणि सगळे केस गळून गेले. अगदीच विरळ आणि खुप आखूड असे राहीले.
मला धक्काच बसला. म्हणालो पण हे तर आहे की, लांबी थोडी कमी झाली तरी अजून ही तसेच दिमाखादार आहेत. तिच्या तोंडातून हुंदकाच बाहेर आला. मान सरळ करून म्हणाली अरे हा विग आहे, त्याच वेळेस तिने विग काढून ठेवला. आणि हमसून हमसून रडू लागली. तीच्या मिस्टरांनी हातानेच थांबा अशी खूण केली. नेहा चहाच्या निमित्ताने आत गेली. वातावरण खूपच गंभीर झाले होते. ती सावरली.तोंडावर पाणी मारून आली. चेहरा पुसत समोर बसली. मिस्टरांना खांद्यांवर डोके ठेवून शांत झाली.
चहा ही आला. चहा घेताना म्हणाली, की खर सांगू तुला कळल्यावर तूझी reaction काय असेल, याचे मला नेहमीच टेन्शन यायचे. पण आता खरच खुप हलके वाटत आहे. मिस्टरांनी आणि नेहा तू खूप positively घेतले, मला डाऊन फील होऊ दिले नाही. खरच त्याबाबत आभार. नेहा ने तिला जवळ घेतले. तिने विग बाजूलाच ठेवून दिला होता. तशीच ती गाडीत बसून निघून ही गेली.
नंतर काही दिवसांनी तिच्या मिस्टरांचा फोन आला म्हणाले ती आता विग शिवाय ही खूप confident feel करते. खुप आनंदात असते.
अशा त्यावयातल्या आठवणी असतातच. नेहा ने ही नंतर मला कधी हेअरस्टाईल वरून तीच्या सारखी दिसते का विचारले नाही.
अतूल भालेराव










