विधिलिखित -भाग ४
इकडे उर्वशीकडे खूप वर्षानंतर घरात बाळ येणार म्हणून सगळे घर आनंदात न्हाऊन निघाले होते.
मिहिरचे आईबाबा आजीआजोबा होणार होते.
सगळे उर्वशी आनंदी राहावी म्हणून सगळेच प्रयत्न करत होते.
उर्वशीचे कोडाकौतुक करण्यात ,तिचे डोहाळे पुरवण्यात सात महिने कसे संपले कळलेही नाही. मिहिर आॕफिसमधून उर्वशीला वेळ देता यावा म्हणून लवकर घरी यायचा. तिला चेकअपला नेणे, फिरायला नेणे आवडीने करायचा.
उर्वशी आधीपेक्षा आता बरीच रुळली होती. सगळ्यांना जीव लावला होता तिने.मिहिरची तिला आनंदी ठेवण्यासाठी चाललेली धडपडा दिसायची तिला.त्याचे तिच्यावर असलेले प्रेमही तिला जाणवायचे.
जावेदचे तिच्या आयुष्यात आता आठवणीपुरतेच स्थान राहिले होते.
वंदनाताईंचा मिहिरच्या आईला फोन आला.
उर्वशीचे बाळंतपण माहेरी करावे असे त्यांना खूप वाटत होते.
आईबाबांना ते दोघेही डाॕक्टर असल्यामूळे त्यांना बाळंतपण सासरी व्हावे असे वाटत होते.
मिहिरला पण उर्वशीला नजरेआड करण्याची इच्छा नव्हती.
मुख्य म्हणजे उर्वशीला माहेरी जायची इच्छा नव्हती.ती जरी इथे रुळली होती तरी आईच्या विचित्र वागण्याची अढी मनात होतीच.
पण मिहिरच्या बाबांनी उर्वशीच्या आईच्या भावनांचा मान राखत तिला माहेरी पाठवायचे ठरविले.
सातवा महिना संपायला आला होता. डोहाळजेवणाचा कार्यक्रम करुन उर्वशीने माहेरी जायचे ठरले.
वंदनाताईंना कार्यक्रमासाठी बोलवले होते.
कार्यक्रम थाटात पार पडला. उर्वशीच्या चेहऱ्यावर काही वेगळेच तेज दिसत होते.
उर्वशी जाणार म्हणून घरातील सगळेच उदास झाले होते. मिहिर वंदनाताई आणि उर्वशीला सोडायला गेला. रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी परतला.
लग्नानंतर पहिल्यांदाच उर्वशी माहेरी थांबली होती.वंदनाताईंना घर भरल्यासारखे वाटत होते. उर्वशी आई सोबत आधीसारखी वागत नव्हती.
एका नकाराने दोघीत खूप अंतर आले होते.
पण आता वंदनाताई मनावर घेत नव्हत्या.
बाळ झाले कि सर्व ठिक होईल हा आशावाद होता.
उर्वशीचे सगळे व्यवस्थित व्हावे म्हणून त्यांनी चार महिन्याच्या सुट्या घेतल्या.
मिहिर अधूनमधून उर्वशीला भेटायला येत होता.
उर्वशीचे दिवस भरत आले होते.डाॕक्टरने पाचएक दिवसानंतर तारीख दिली होती पण प्रसवकळा आधीच सुरु झाल्या.
वंदनाताईंनी मिहिरला फोन केला.
आईबाबांकडे एक इमर्जन्सी केस होती त्यामूळे आज ते येऊ शकत नव्हते. मिहिरने आज जायचे आणि आईबाबा आणि सावीने उद्या यायचे ठरले.
मिहिर निघाला. उर्वशीला दवाखान्यात ॲडमीट केले.
complications वाढली होती.डाॕक्टरने सिझरियन करायचा निर्णय घेतला. वंदनाताईंनी फाॕर्म वर सही केली.उर्वशीला सिझेरियन करायला नेले.
मिहिर संपर्कात होताच. त्याला आता लवकर पोहचायचे होते. त्याने गाडीचा वेग वाढवला.
‘उर्वशीताईला मुलगा झाला’.
बाहेर काळजीत बसलेल्या वंदनाताईंना नर्सने ही गोड बातमी दिली.
वंदनाताई धावतच आत गेल्या.
त्यांच्या मुलीचा मुलगा. त्यांना किती आनंद झाला हे त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत होते. डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते. बाळ मिहिरचे रुप घेऊन जन्माला आला होता.
उर्वशीला अजून शुद्ध यायची होती.
वंदनाताईंनी उर्वशीच्या सासरी,मिहिरला ही बातमी दिली.
फोन ठेऊन मिहिरने गाडीचा वेग अजून वाढवला.
आपल्या बाळाला कधी बघतो नि कधी नाही असे झाले.
कसे दिसत असेल? माझ्यासारखे? उर्वशीसारखे?
गाडीचा वेग आणि विचारांची श्रृंखला यात गाडीवरचा ताबा कधी सुटला हे कळण्याआधीच गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळली.
मिहिरला ओळखता?
हो माझे जावई आहेत ते.
मी पोलीसस्टेशनमधून बोलतोय.त्यांच्या गाडीचा अपघात झाला. शेवटी ते तुमच्या सोबतच बोलले म्हणून तुम्हाला फोन केला. हाॕस्पिटलचे नाव लिहून घ्या.
वंदनाताईंना काहीच सुचत नव्हते.
त्यांनी हाॕस्पिटलचे नाव लिहून घेतले.
किती लागले असेल मिहिरला? तो ठीक असेल ना?
त्यांच्या मनात आले.
त्यांनी लगेच मिहिरच्या आईला फोन केला आणि हाॕस्पिटलचा पत्ता दिला.
मिहिरचे आईबाबा हाॕस्पिटलकडे निघाले.
वंदनाताई ऊर्वशीजवळ थांबल्या.
उर्वशी आता शुद्धीवर आली.
आई मिहिर पोहचले नाही अजून?
तिने आईला विचारले.
अग पोहचतच होते.छोटासा अपघात झाला त्यांचा.
जास्त लागले नाही.
एवढे तिला सांगून त्या रुमच्या बाहेर पडल्या. मोबाइल रुममध्येच राहला. उर्वशीच्या बाजूलाच. दवाखान्यात एक मंदिर होते.वंदनाताईंना माहित होते.त्या मंदिरात येऊन हात जोडून उभ्या राहिल्या.मिहिरसाठी प्रार्थना करून रुममध्ये परतत होत्या.
वंदनाताईंचा फोन वाजला. फोन उर्वशीच्या बाजूला होता.तिने उचलला.पलिकडून मिहिरच्या आईचा आवाज आला.
वंदनाताई मिहिर गेला.
त्या रडत रडत बोलल्या.
उर्वशीसाठी हा धक्का होता.ती जोरात ओरडली, नाही.
तेवढ्यात वंदनाताई रुममध्ये पोहचल्या.
काय झाले उर्वशी?
ती काहीच बोलू शकली नाही.
वंदनाताईंचे फोनकडे लक्ष गेले.
त्यांना मिहिरच्या आईचा नंबर दिसला.
त्यांनी परत फोन केला.फोन सावीने उचलला.
सावीने ती दुःखद बातमी वंदनाताईंना दिली.
वंदनाताई मटकन बाजूला असलेल्या खुर्चीवर बसल्या.
त्यांच्या मुलीचेही नशीब त्यांच्यासारखेच होते तर.
मिहिरला शेवटचे बघायलाही वंदनाताई,उर्वशी जाऊ शकल्या नाही. बाळाला न बघताच मिहिर लांबच्या प्रवासाला निघून गेला होता.
आई-बाबा,सावी हाॕस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच मिहिर गेला होता.
क्रमशः
विधिलिखित भाग-५ वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण marathi.shabdaparna.in वर पाठवू शकता.
आमचे साहित्य आवडत असल्यास नक्की
like,comment,share करा.
आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी शब्दपर्ण पेज जरुर follow करा.
प्रिती
छान
Khup chan
अप्रतिम
Chan
Khup chan