आज उशीरच झाला जरा सावीला आॕफिसमधून निघायला.
काही पेंडिंग कामे होती आॕफिसमध्ये.
आज ती निपटायलाच हवी होती.
घरी दारी कामच काम.
स्वयंपाक करणाऱ्या मावशी आठ दिवस सुट्टीवर गेल्या.
घरी येतायेताच काय स्वयंपाक करायचा याचा विचार सुरु झाला होता डोक्यात.
कारले निशांतला आवडतात.
कारल्याची भाजी करु का?
पण मग मुलांना वेगळी भाजी करावी लागेल.
आता तेवढी शक्ती नाही उरली.
पनीर आहे फ्रीजमध्ये.
पनीरभूर्जी?
पण
निशांत नाराज होईल.
मग आता?
स्टेशनवर उतरुन भाजी घ्यावी का?
पण वेळ खूप जाईल.
त्या वेळेत या दोन्ही भाज्या बनतील.
चला तर ठरले मग.
दोन्ही भाज्या बनवायच्या.
थकवा येईल जरा
पण मुले नाराज होणार नाहीत.
निशांतची चिडचिड सहन करावी लागणार नाही.
भाज्यांचे टेंशन गेले म्हणून जरा हायसे वाटले तिला.
थोडावेळ शांत बसली ती.
परत विचारांचा भुंगा सुरू.
पण मला तर दोन्ही भाज्या नाही आवडायच्या आधी.
आई माझ्यासाठी वेगळी भाजी बनवायची.
आईची आठवण मनाला स्पर्शून गेली.आणि डोळ्यांच्या कडा आपसूक ओल्या झाल्या.
भाज्या आणणारी मी.
स्वयंपाक बनवणारी मी.
तरीही कित्येक दिवसात मी माझ्या आवडीच्या भाज्या खाल्ल्याच नाहीत.
तिचा विश्वासच नाही बसला या गोष्टीवर.
किती बदलले मी लग्न झाल्यावर.
आणि मुले झाल्यावर तर माझी मी राहलेच नाही.
नव्याने जन्मल्या सारखे झाले माझे.
हट्टी,अवखळ,बालिश मुलगी परिपक्व स्त्री बनली.
कायम माझ्याच मनाप्रमाणे व्हावे या प्रयत्नात असलेली मी मन मारायला शिकली.
निशांत, तो मात्र काही बदलला नाही.
विचाराविचारात सावी स्टेशनवर पोहचली.तिथून जवळच होते घर.
घरी यायला नऊ वाजलेच.
घरी रोजच्यासारखाच कलकलाट सुरु होता.
निशांत हाॕलमध्ये टीव्ही बघत बसला होता रोजच्यासारखा गुंग होऊन.
मुले नेहमीसारखीच एकमेकांशी भांडत होती.
वैताग आणलाय मला नुसता….काहीशा अशाच नजरेने तिने घरभर नजर फिरवली.
थकलेली सावी पाच मिनीटे सोफ्यावर बसली. जास्त वेळ बसून जमणार नव्हते. स्वयंपाक बनवायला किचनमध्ये पळाली.
हे काय!
नेहमी पसारा असलेले किचन एवढे चकाचक.
स्वयंपाकवाल्या मावशी येऊन गेल्या कि काय?
झाकून ठेवलेली भांडी तिने उघडून बघायला सुरुवात केली.
अजून एक आश्चर्य.
तिची आवडती मसाल्याची वांगी तयार होती.
दुसऱ्या भांड्यात कुरकुरीत भेंडी.
पोळ्या,वरण ,भात सगळे तयार.
मावशी तर फक्त एक भाजी आणि पोळ्या एवढेच बनवतात. मग?
आश्चर्याने थक्क झालेली ती ओट्याला टेकून विचार करत उभी राहिली.
छोटी दिशा आणि वेद हसत हसत किचनमध्ये आले.
एरवी तिच्या गडबडीत ते हसले असते तर तिला राग आला असता.पण आता तिनेही त्यांच्या हसण्यात सूर मिळवला.
अरे कोण आले होते घरी आज?
नवीन स्वयंपाकवाली मावशी?
मुलांनी बाबाकडे बोट दाखवत सांगितले,
हीच नवी मावशी.
काय?
सावीने आश्चर्याने विचारले.
निशांतने हसत हसत विचारले,
काय मॕडम कशी वाटली सरप्राइज?
आज काय आहे रे?
मदर्स डे?वुमन्स डे? व्हॕलेंटाईन डे?
काही नाही ग.
आपल्या प्रेमाला कशाला ग हवेत डे.
हमारा प्यार डेज का मोहताज नही है मोहतरमा….
सावी हसून त्याच्याकडे बघत बोलली,
स्वारी आज खूप खूष दिसत आहे.
अग,रोजची तुझी गडबड बघून सुट्टी टाकली आॕफिसमध्ये. संध्याकाळचे जेवण आता मीच बनवत जाईन.
आणि आज हे मी एकट्याने नाही बनवले ग.
आपल्या पिलांनी मदत केली मला.
सावीने दिशा आणि वेदला मिठी मारली.
निशांतने तिच्याकडे बघितले.
सावीच्या डोळ्यात पाणी तरळले.
रात्री मुले झोपल्यावर बेडरुममध्ये येऊन सावीने निशांतला मिठी मारली.
निशांत रस्ताभर काय काय विचार करत आले मी. तुला,मुलांना माझ्या श्रमाची जाणीव नाही असेच वाटत होते मला. किती चुकीचा विचार करत होते मी.
बोलता बोलता सावीचे मन भरुन आले.
ए वेडाबाई, खूष व्हायचे सोडून डोळ्यातून आसवे का गाळतेस?
मी बोललो नाही कि तुला तसेच वाटते.हे तुझे नेहमीचेच आहे. तुला ना अबोल शब्द माहितीच नाहीत.
असे बोलून निशांत हसायला लागला. त्याच्या हसण्यात सावीच्या हसण्याचेही सूर मिळाले.
सावी निशांतचा हात हातात पकडला आणि म्हणाली,
हो रे, तू बोलत नसला तरी तुला जाणवतं रे सगळं.
जोडीदाराला एकमेकांच्या थकव्याची जाणीव झाली कि जाणिवांचे सोहळे बनायला वेळ नाही लागत निशांत.







Khup chan
Superb👌🏻👌🏻
Mast