प्रिय पिहू
कशी सुरूवात करु? तुझे पत्र मिळाले. तुला वाटले तसे अश्रुंनी भिजले ते.आनंदाने वाहलेल्या अश्रुंनी.
जिचा सतत शोध घेतोय ती अचानक समोर आली पत्रातून.
मला माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी तुझ्या पत्रामुळे मला कळल्या.
पिहू खूप सोसलेस तू माझ्यामुळे,माझ्यासाठी.
पण मला वेळ कमी दिला जे झाले ते समजायला,जे झाले ते स्वीकारायला. हेही तेवढेच खरे.
तू मला सोडून गेली आणि मी तुझ्यावर किती अवलंबून होतो ते कळले मला. मी जो आहे तो तुझ्यामुळे हे समजले पण उशिरा.मी शोधले तुला भानावर आल्यावर पण तू दूर निघून गेली होती.
तुला शोधणार पण कुठे,?
तू माझ्याबरोबरच बाकीच्यांशीही संबंध तोडले होते.
मी प्रयत्न करुनही तुला नाही शोधू शकलो.
तू गेली आणि मी एकटा पडलो.काही दिवस सुट्ट्या घेऊन गावी जाऊन राहिलो. तुझ्यामुळे दारु सुटली होती माझी.पण तू जाण्याचे दुःख सहन करणे खूप कठीण होते.
तू गेल्यामुळे खूप एकटा पडलो होतो पिहू.
घरचे माझ्या लग्नाच्या मागे लागले. तशीही तू आता त्यांना माझ्या आयुष्यात नको होती. पण मी तयार नव्हतो लग्नाला.
तुझ्यावर माझे किती प्रेम होते हे मी तुला सांगायची गरज नाही. मधल्या काळात मी वाहवत गेलो हे खरे. खूप चुकलो मी. तुला खूप त्रास सहन करावा लागला. केवळ मी सुधरावा म्हणून तू स्वतःला जाळूनही घेतले. सर्व चुका मान्य आहेत मला.
पण मला संधी न देता तू निघून गेली ही एक चूक तू पण केली.
जो चेहरा तू स्वतःही आरशात बघू शकत नव्हती त्या चेहऱ्याला ओळखायला मला जरा तर वेळ लागणारच.
हे कसे कळले नाही तुला. पिहू कित्येक दिवस मी दारुत बेहोश होतो.तू शुद्धीवर आणले तू पण मला माझी पिहू वाटायचीच नाही तू. चेहराच नाही तरअंतर्बाह्य बदलल्यासारखी वाटायचीस.मोकळेपणा राहिला नव्हताच आपल्या नात्यात.
तुला सिनेमाच्या रीलसारख्या जशा आपल्या दोघांच्या आठवणी आठवत आहेत तशाच मलाही नेहमी आठवतात.
तुझी माझी पहिली भेट,
मी प्रपोज केल्यावर लाजेने चूर झालेली तू.
नंतर सतत मला भेटण्याचे बहाणे शोधणारी तू.
नेहमी ccd त जाऊन आपले गप्पा मारणे.
मला काॕफी आवडत नाही
चहाचा गोडवा नसतो तिच्यात पण केवळ तुझ्यासाठी काॕफी पिणे.
माझ्या समवेत संसाराची स्वप्ने पाहणारी तू,
घरचा विरोध पत्करुन माझ्याशी लग्न करणारी तू,
माझा अभ्यास व्हावा म्हणून नौकरी करणारी,
माझी काळजी घेणारी,
आपला संसार सांभाळणारी,
मी दारुचा नाद सोडावा म्हणून खूप प्रयत्न करणारी तू……….
सगळे सगळे आठवणीत आहे.
अजून तू लावलेली रातराणी.
तुला आवडते म्हणून कुंडीत लावलेली रातराणी.
किती फुलायची ती.
आपली पूर्ण रात्र सुगंधीत व्हायची.
पण यंदा फुलेल का ती?
बस्स दारुच्या आहारी गेल्यानंतर आपल्या आयुष्याची झालेली परवड …ते नाही आठवत.खूप प्रयत्न करतो मी आठवण्याचा.पण नाही…नाहीच आठवत काही.
नंतरच्या आठवणीत फक्त तुझा चेहराच आठवतो माझ्यासाठी जळलेला,मला अनोळखी वाटणारा.
पिहू घरचे खूप मागे लागले होते माझ्या लग्नाच्या.एका मोहाच्या क्षणी मी हो ही म्हणालो. ती उर्मीची मैत्रीण होती. एकमेकांना बघितले होतेच आम्ही. तिला भेटायला गेलो एकदा. पण त्यापुढे नाही जाऊ शकलो.
पिहू तू, तुझ्यात गुंतलेला जीव आणि तुझ्या आठवणी यांनी अडवले मला. नाही विसरु शकलो तुला.
माझे लग्न आहे असे उर्मीने तुला खोटेच सांगितले. आणि तू विश्वासही ठेवला. तू विश्वास ठेवणारच. कारण माझ्याबाबतीत एकांगी विचार केला तू.
परस्परच माझे तुझ्यावर प्रेम नाही,
आणि मला एकटीलाच शिक्षा झाली असे ठरवून मोकळी झाली. तुझ्याशिवाय मी एकटा राहतोय ही मलाही शिक्षाच आहे पिहू.
तुम्ही बायका पण ना पुरुषांना तुमच्यापेक्षा खूप वेगळे समजता.अग, मी पुरुष असलो तरी तू माझ्यावर करायचीस तेवढेच प्रेम मीही तुझ्यावर करायचो. मी तुला सोडायचा विचार कधीच केला नाही.तूच मला एकट्याला सोडून निघून गेली.माझ्यापेक्षा चेहऱ्याच्या सौंदर्याला तर तू महत्व दिले पिहू. आणि मी ही तेच करणार असे गृहीतच धरले.
आता तू जे मला पत्रातून सांगितले तेच तेव्हा सांगितले असते तर……
मी तर चुकलोच.खूप चुका माझ्या आहेत पण थोडे तुझेही चुकलेच.
मी उर्मीकडून तुझा पत्ता घेतो.
आपल्या घरची रातराणी फुलायला हवी……..
तुझाच
वरुण.
(याआधी पिहूने वरुणला पाठवलेल्या पत्राचे हे वरुणने दिलेले उत्तर)
पिहूचे पत्र वाचण्यासाठी खालील लिंक बघा.
|
ReplyForward
|










