विनोदी कथा-माझ्या नवऱ्याची आयडिया
बघता बघता कोरोना कृपेने लॉक डाऊनला तीन महिने उलटले होते. या काळात खुप जणांच्या लपलेल्या प्रतिभा भराभर बाहेर आल्या. कोरोनाने त्यांना कला हुनर दाखवायची संधी दिली असेही म्हणायला हरकत नाही.
साहजिकच आहे ना !
चोवीस तास माणूस घरात बसून करेल तरी काय ?
घरातील आबालवृद्धांनी त्यांचे राहून गेलेले छंद जोपासले. घरातील सर्व सदस्य घरकाम विभागून करू लागले.
एक तर मोलकरीण कामावर येणे बंद होते आणि सवडही भरपूर होती म्हणून दोन्ही उद्देश साध्य झाले .
याच काळात नवरे लोकांनी खाद्यपदार्थाच्या निरनिराळ्या डिशेश करून बघायचे धाडस दाखवले. घरातील इतर सदस्यांनी त्या पदार्थांना भीत भीतच पोटात जागा दिली असेल ,
काय करणार ?
काही झालं तर दवाखाने पण बंद होते. पण तशी वेळ आलीच नाही.
घरातील सौभाग्यवतींना नवऱ्याचा हा छुपा टॅलेंट कळला.
आता अडीअडचणीला घरातले ‘हे’ही काम नवरे करतील म्हणून त्या खुश आणि वेळप्रसंगी आपल्याला ‘ हे ‘ ही काम करायची गरज पडू नये अशी नवरे लोकांनी देवाजवळ प्रार्थना केली असेल.
हळूहळू लॉक डाऊन शिथिल करण्यात आले.
काही तासांचे बंधन ठेवून रोजचे व्यवहार सुरू झाले.
तसे चवताळल्यासारखे सगळेच बाहेर पडले .
इतके दिवसांची खोळंबलेली कामे पूर्ववत सुरू झाली. मुलांचे ऑनलाईन शाळा क्लासेस सुरू झाले. इतके दिवस सौ,ना घर कामात मिळालेला हातभार अचानक कमी झाला.
या कालावधीत आई किंवा बायको घरात काय काय कामे करतात? कसा वेळ सरतो ? याची जाणीव नक्कीच झाली. नाही तर मुले किंवा नवरा म्हणतातच
मी शाळेत गेल्यावर किंवा ऑफिसला गेल्यावर तुला घरात काय काम असते?
त्यांना करायला लागलेल्या कामामुळे ते आता असं काही परत म्हणणार नाहीत. अशी सौंनी आशा बाळगली .
कोरोना असो किंवा अजून काही येवो , सणवार यायचे थोडी थांबेल.
श्रावण महिना तोंडावर आला तसाच माझाही कामाचा ताण वाढला. त्यामुळे आधीच असलेला स्पॉंडिलायसिस चा त्रास बळावला. श्रावण, सण , गौरी गणपती लागोपाठ होते.
ते सगळे व्यवस्थित पार पडावे म्हणून नवऱ्याने कामाच्या मावशींना परत बोलवायची परवानगी दिली.
बाहेरून एखादी व्यक्ती काही कामानिमित्त घरात घ्यायची म्हणजे ते बरेच सोपस्कार करूनच घरात घ्यायचे.
अंगणात बाहेरच हात पाय धुवायला पाणी व hand wash ची व्यवस्था केली होतीच. पण घरात आल्यावर त्यांच्यावर सॅनिटायझर ची फवारणी केली जायची.
आता प्रश्न होता कामवाल्या मावशी ला एकदम घरात घेण्याचा.
ती बाहेरून एकदम घरात येणार, घरात तिचा वावर होणार.
काय करता येईल ???
नवऱ्याचे विचार चक्र सुरु झालं,
आणि आणि……
एकदम ओरडले…… आयडिया
आर्किमिडीजने युरेका युरेका केल्यासारखं वाटलं.
त्यांनी त्यांची आयडिया सांगितली.
धत तेरी.., मी तर कपाळावर हात मारून घेतला.
मावशी याला ‘हो ‘ म्हणतील याची खात्री नव्हती.
आयडीयाच तशी होती .
तर आयडिया अशी……. मावशींनी बाहेरून आल्यावर अंगणातच हात-पाय धुऊन घरात यायचे हे तर आहेच. शिवाय बाहेरच्या खोलीत त्यांच्यासाठी एक गाऊन ठेवायचा, ( माझाच जुना ) तो त्यांनी परिधान करूनच (आहे त्या कपड्यावरच ) घरात यायचं. काम झाल्यावर गाऊन धुवून वाळत टाकून निघून जायचं.
असं एकंदरीत ठरलं . (मला गाऊन घातलेला पाहून नक्कीच सुचली असणार बहुधा ही आयडिया )
दुसऱ्या दिवशी मावशी आल्यावर नवऱ्यानेच मावशींना सांगायचं असं ठरलं.
मावशींना काय करायचं ते सांगितलं . तशा मावशी
फसदिशी हसल्या .
मावशी : काय साहेब काय करायला लावतसा .
मी नाही लेवायची गाऊन अन् फिऊन .
पण यांचा हट्ट होता . कामाला यायचे असल्यास गाऊन चढवावाच लागेल .
मावशींना पण तीन महिने झाले काम नव्हते.
पैशाची चणचण होती . नाही हो करता करता कशाबशा तयार झाल्या.
साठीच्या मावशींनी आजपर्यंत नऊवारी शिवाय दुसरं काहीच नेसलं नव्हतं.
घरी गेल्यावर त्यांना नक्की चैन पडली नसणार उद्या आपलं काय होणार? या चिंतेने.
मावशी आल्या, त्यांना नऊवारी वर गाऊन मी चढवून दिला . त्यांनी तो घातला. हळूहळू दमदार पावलं टाकत त्या एखाद्या महाराणी सारख्या काम फत्ते करायला निघाल्या. मी आणि मुले त्यांचे रूप बघून दुसरीकडे तोंड करून हसू लागलो . फक्त नवऱ्याचा चेहरा गंभीर होता.
कदाचित त्यांना वाटलं असेल आपणही फसदिशी हसलो, तर मावशी विचार बदलतील म्हणून त्यांनी ताबा ठेवला.
कधीकधी मावशी उलटाच गाऊन घालीत .
म्हणजे समोरचा गळा मागे .
घोळाच्या नऊवारी वर पायघोळ गाऊनमध्ये पाय अडकून पडू नये यासाठी चालतानाची त्यांची कसरत मजेशीर असायची. कामे करताना शेजारीपाजारी खिडक्यांमधून डोकावून आपला अवतार बघू नये याची आधी खात्री करून मगच कामाला सुरुवात करायच्या.
रोज आल्या की त्यांचे वाक्य ठरलेलं,
काय साहेब काहीबी करायला लावतासां.
आणि हसत हसत गाऊन चिलखती सारखा चढवून कामगिरीवर निघायच्या.
आता त्यांना सवय झाली गाऊनची. सुरुवातीला नाही नाही म्हणणाऱ्या आता खुशाल हौशीने गाऊन घालायच्या. कदाचित त्यांची ही नऊवारी व्यतिरिक्त दुसरे काही कपडे घालण्याची अधुरी इच्छा पूर्ण होत असेल.
नंतर त्यांनी माझ्याकडे दुसरे जुने गाऊन घरी घेऊन जायला मागितले. म्हणाल्या,
” सुनेसाठी हो. ती बी बाहिर कामाला जातीया. कामाहून आली की आधी आंघोळ करते. धुवायचे कपडे खूप पडतात. समद्यांच काम करून थकून जातीया. पावसाळा, कपडे वाळत बी बी नाहीता. तिच्यासाठी
पायजेल “.
मी पण खुशीने दोन गाऊन तिच्या हातात देऊन म्हटलं, दिवाळीत नवाकोरा देईन बरं मावशी.
मोहिनी राजे पाटनुरकर











वा खूप छान
अतिशय सुंदर…