हिवाळ्याचे दिवस होते. दिवाळी तोंडावर आली होती. विलास रात्रीची गाडी पकडून पहाटे-पहाटे त्याच्या बहिणीच्या सीताक्काच्या गावाकडे जायला निघाला. मेन रोडवर उतरल्यावर गावात येण्यासाठी एक_दोन किलोमीटर चालावं लागतं , तसं वर्षातून एक दोन वेळेस तो या गावी येतो. गेल्या सोळा सतरा वर्षांपासून त्याला ही वाट माहिती . प्रत्येक चकरेगणिक गावात काहीतरी बदल झालेला त्याला दिसायचा.
“सीताक्का दिसेना , कुठे गेली?”
“गोठ्यात गेली शेन काढाया“. विलासचा भाचा गणेश म्हणाला.
“पाहुण्यांनी तर लयच पहाटचा रस्ता धरला बाबा“. विलासचे दाजी म्हणाले.
तितक्यात सीता काम उरकून चहा घेऊन आली.
“तुला न्याया आलोय, कालच येणार होतो मुक्कामाला. कापसाच्या गाड्या भरून ठेवून निघायला उशीर झाला. हनुमानाच्या शेपटी सारखं काम लांबतच गेलीत.
आज तरी उशीर नाही व्हायला पाहिजे, नसता दादा नाही ते बोलेल”.
दादा, सीता , विलास तीन भावंडं.
“बाबा लय आजारी हाय, सारखी तुझी आठवण काढतुया. अंथरुणाला खिळलाय . यंदाची दिवाळी बघतो की नाही अशी गत झाली. तुला भेटाया लय आतुर झालाय. म्हणून तर सगळी काम सोडून तुला न्यायला आलो“.
“माझी बी थोडी काम हाईत . दिवाळीच्या आधी उरकायची. आता आमच्याकडे कापसाच्या भावासाठी मोठं आंदोलन उभं राहतं”.
विलास: “ही काय भानगड ?”
“ही भानगड व्हय रे? इथ मरुसतोवर काम करायचं अन् आपला माल दलालाने मातीमोल भावाने घ्यायचा हे
कव्हरेक चालू द्यायचं , बाबा “.
सगळीकडे कापसाच्या भावाचं आंदोलन पेटलं होतं.
दाजी : “ही झाली सगळ्यांची मालकीण. अख्या गावाचा पुढारपण हिच्याकडे. तीन चार दिवसापासून आसपासची गावं या चारचौघी बायांनी पिंजून काढली” .
डोंगरी शेत माझं गं …..
मी बेनू किती…..
दाजी चेष्टा करू लागले.
तसं त्यांनी सीताबाईला या कामात कधीच आडकाठी घातली नाही.
लोकगीत , भजनांच्या माध्यमाने बाया घेऊन गावोगाव जायची. आता सीता शेतकरी संघटनेत काम करू लागली होती . इथं मरेस्तोवर काम करून पदरात काही पडत नाही हे तिच्या लक्षात आलं होतं .
“आक्का , पण तुला माझ्यासोबत यावच लागणार. म्हातार्यांन टुमणं लावलं . वयच थकत चाललंय. कुटवर दम धरेन . घरात आता वाटण्याबद्दल धुसफूस चालू झाली. म्हातारा म्हणातोय तुझ्या नावाने दहा एकर रान करायचे. माझ्या माघारी कोणी पाहिलं म्हणतो”.
“जमिनीचे काय रे, मला देवाने तरी कुठे कमी केलं”?
“आता हे आंदोलन तोंडावर आले, कसे येता येईल”?
सीताबाई नी सांगितलं.
“तशी मी गडबड केली नसती . पण म्हातार्यांन अंथरूण धरले. हे आंदोलन नेहमीच चालू असतं”.
“आता असं नसतं रे , भांडल्या बिगर काही मिळत नाही. आम्ही सात दिवसापासून हिंडतोय. उद्या फाट्यावर लई मोठा रस्ता रोको करणार आहेत. हे सगळं निपटले कि मी येते. तोवर तु बी इथंच राहा दोन दिवस”.
गप्पा मारता मारता सीताबाईने स्वयंपाक आटपला. भाऊ आला म्हणून गोडाचा स्वयंपाक केला होता. पटापट आवरून जवळपासची गावं करायची होती . काल लांबची गावं बैलगाडीने केली. आताही जेवण झाली की निघायचं होतं . उद्याचा रस्ता रोको ला हजार पाचशे बायका दिसल्या पाहिजेत, आपल्या गावच्या.
चुलीतले लाकुड कव्हरक चुलीत घालायचं आता ते सरकारच्या पाठी बसायला पाहिजे.
घरचे आवरून दोघी-तिघी सीताबाईकडे आल्या. मावळ्याला बघून जना म्हणाली
“जातीस का काय? लुगड्या साठी निघून माहेराला , आम्हाला कर पुढे तु जा माहेराला”.
“मी सगळ्या बायकांना तयार केले अन मलाच कसं जायला जमेल”.
सीताबाई म्हणाल्या .
“विलास यांच्यासमवेत रानात चक्कर मार . तेवढेच दिवस कटेल”.
गणेशला घराकडे लक्ष द्यायला सांगितलं.
“ तू घरीच थांब. मी झाकड पडायच्या आत येते”.
जना : “काय निव्वळ येड्यावानी गाव गाव फिरतो. सणावाराचे घरात थांबायचे तर . लोक हसत असतील माघारी”.
कईक दिवसापासुन गडी माणसं कापसाच्या भावासाठी भांडलेत . आपण पुढे यायला पाहिजे. नुसतेच मालकीण होऊन किती दिवस मिरवायचं ?
सीताबाई चे बोलणे सगळ्यांना पटायला लागले . सीताबाई चे भाषण ऐकून नवा हुरूप येई. कधीमधी बाया मन खचल्यासारखं बोलल्या कि सीताबाई धीर द्यायच्या.
या आंदोलनासाठी अशा त्यांनी खूप बायका तयार केल्या होत्या. कधी नव्हे ते गडी मालकांनी आपल्या बायकांना मोकळीक दिली होती.
“उद्या सगळ्या राज्यात रस्ता अडवणारेत. आपल्यासनी हे आंदोलन सगळ्यांपेक्षा मोठं करायचं. आतापावेर सगळ्यांनी भाव वाढून देता म्हणून सरकार चालवले. आपण ढोरावानी राबराब राबायचे. हाती काहीच लागेना. आता गप्प बसून जमायचं नाही. आपलं म्हणणं सरकारला कळालं पाहिजे. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे”. “उद्याला गावातुन जास्तीत जास्त बाया आल्या पाहिजे. सकाळी नऊ दहा वाजता फाट्यावर जायचे. नाकेबंदी करायची “.
सीताबाई पुन्हा पुन्हा सांगत होत्या. गावातल्या बायांनी विश्वास दिला.
सीताबाईच्या बोलण्यानं सगळ्यांच्या डोक्यात नांगर फिरवल्यासारखा झाला होता. जोवर शेतीमालाला भाव नाही तोवर जमिनीला कवडीची किंमत मिळणार नाही.
जवळपासचे गावं आटोपली तेव्हा दिवस मावळला होता. दिवेलागणीची वेळ झाली होती . बैलगाडीने या सगळ्या जणी गावात आल्या . रात्रीचे जेवण उरकून सीताबाईनी सतरंजीवर अंग टाकलं पण तिचा डोळा लागत नव्हता. उद्याचा दिवस ती डोळ्यासमोर उभा करू लागली.
फाट्यावर गर्दी किती होईल? कोणाकोणाचे भाषण ?अटक होईल का ? कधी सोडतील ?
अशा प्रश्नांचा धिंगाणा डोक्यात चालू होता .
पाच सहा तासांची रात्र ही खूप मोठी वाटू लागली.
हापशाच्या आवाजने सीताबाईला जाग आली .गाय वाड्यातलं शेण काढलं , घरची झाडझुड केली, चुलीवर पाणी ठेवलं, चहा उरकला.
मंदिरातल्या काकड आरती चा आवाज येत होता सगळ्यांसाठी पोहे केले. सोबत नेण्यासाठीही भाकरी करून घेतली. दिवस निघु लागला.
गाड्या फाट्याकडे निघाल्या . गावातली काही माणसे नऊ दहा पर्यंत मिळेल त्या वाहनाने पोचणार होते. बायांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता.
बैलगाडीत बाया भजन गवळणी म्हणू लागल्या.
रस्त्याने बाया माणसांचे घोळके फाट्याकडे जाताना दिसु लागले . सीताबाईच्या लक्षात आले आजचा हा कार्यक्रम मोठा होणार .
फाट्यावर पोलीस उभे होते बंदोबस्तासाठी . अटक केलेल्यांना घेऊन जायला दोन एसट्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या . फाट्यावर भयंकर गर्दी दिसु लागली . सगळीकडे गर्दीच गर्दी .
पोलिसांनी गर्दीलाच कडे केलं होतं. दोन्ही बाजूंची वाहतूक आता आपोआप बंद झाली होती . रस्त्यावरचं नाहीतर लगतच्या रानातही कार्यकर्ते दिसु लागली. पोलिसांच्या हातात दंडुके जाळ्या होत्या. मध्यभागी बैलगाडी ठेवण्यात आली, छोटसं लाऊडस्पीकर होतं.
शेतकऱ्या गड्या र
हिंमत ठेव जरा
बदलेल तुझे दिस रे
नको आवळू गळा
एक जण खड्या आवाजात गाणं म्हणू लागलं.
सगळे चिडीचूप. अंगात संचारल्या सारखं , भिनलेले झालं होतं. डोकं भणाणून गेलं होतं. खरंच ! गप्प किती बसणार ?
सीताबाईने गाणं म्हटलं ..
बाई मी धरण धरण धरण बांधते ..
बाई माझं मरण मरण मरण कांडते..
तेव्हा अर्ध्या अधिक बाया हेलाऊन गेल्या. काहींनी डोळ्याला पदर लावला.
किती राबावं ? कुणासाठी?
बाया स्वतःलाच विचारू लागल्या .
कार्यकर्त्यांची भाषणे सुरू झाली .पोलिसांनी माईक ओढुन घेतला. काय होतंय हे कळायच्या आत पोलिसांनी बखोटीला धरून माणसांना गाडीत टाकायला सुरुवात केली. बाया तर भांबाऊन गेल्या . मुरमुऱ्याचे पोते फुटावं तसं माणसं इकडे तिकडे पळू लागले . पोलिसांनी काठ्यांनी मारायला सुरुवात केली . बर्याचजणांना चांगलाच मार बसला . बायांना महिला पोलीस गाडी धरून बसवु लागल्या. झटापट होत होती कार्यकर्ते पोलिसांना हिसडा मारून पळू लागले. बायांना जबरदस्तीनं गाडीत ढकलल्या जाऊ लागलं . जमाव बेभान झाला .
एका पोलिसांने रस्त्याच्या कडेची कडव्याची गाडी पेटवून दिली. आता लोक खवळले. बायांवरही काठ्या मारल्या. एक दोघींचे डोके फुटले.
आणखी दोन गाड्या कार्यकर्त्यांना न्यायला आल्या. एकात माणसे एकात बाया , सीताबाईसह सोबतच्या सगळ्याच बायकांनाही धक्के मारीत गाडीत बसवलं .आता रस्त्यावरची गर्दी तुरळक झाली . रस्त्यावर चपला बुटांचा सडा दिसुलागला. बायांच्या फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे भाकरीचे गाठुडे पडले होते.
माणसे बाया भरलेल्या गाड्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणल्या. पोलिस ठाण्याचे मैदान गर्दीने फुलून गेले होते. अटक झालेल्या कार्यकर्त्यांची नावे पत्ते लिहुन घेतले. जमलेल्या सगळ्यांनाच मुरमुऱ्याचा चिवडा केळी दिली. पोलीस स्टेशन मधुन सेंट्रल जेलमध्ये नेण्याचं ठरवलं.
बाया हबकून गेल्या. किती दिवस थांबावे लागेल म्हणून. पोटात भीतीचा गोळा उठला.
आपण गुन्हाच कोणता केलाय ?
हे बायांना कळेनाच .
सीताबाई तर डोक्याला हात लाऊन बसली . सगळ्या जणींना आपली घरे डोळ्यासमोर दिसु लागली . कित्येकांच्या घरी स्वयंपाक करणारेही कोणी नव्हते.
दोन-तीन मोठमोठाल्या लांब गाड्यांमध्ये बसवून सेंट्रल जेलमध्ये सगळ्यांना आणले . बायका माणसांची जेलमध्ये वेगळी व्यवस्था केली होती बाहेर तंबुमध्ये पण कार्यकर्ते ठेवली होती. सगळीकडेच हे आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं होतं. बाया आल्या आल्या घाबरून गेल्या होत्या पण आता एकमेकींना बोलु लागल्या, मन मोकळं करू लागल्या . मार लागलेल्यांनी जमिनीवर अंग टाकलं होतं. काही बायकांच्या कपाळावर लुगड्याच्या चिंध्या बांधल्या होत्या. पोलीस स्टेशन वर दिलेल्या चिवडा केळी वरच दिवस गेला होता. एकीकडे पोटातली भूक आणि दुसरीकडे मुक्कामाराची ठणक . आतापर्यंत एवढी आंदोलन झाली पण असा अनुभव नव्हता.
संध्याकाळ झाल्यावर जेलमध्ये कार्यकर्त्यांच्या जेवणाची तयारी होऊ लागली . फाट्यावरच्या कार्यकर्त्यांची काही चुक नव्हती. पोलिसांनीच कडव्याच्या गाड्या जाळल्या होत्या. कार्यकर्त्यांवर जाळपोळीच्या गुन्हा नोंदवण्यात आला . या गोष्टींचा राग मनात कार्यकर्त्यांच्या होता. ‘आज कोणी जेवणार नाही’
असं सांगण्यात आलं. समोरचे कळकट्ट ताटा मधलं जेवण बायांनी दूर ढकलले.
हे आपले कष्ट कधीच वाया जाणार नाही. सरकारला आज न उद्या आपल्या मागण्यांचा विचार करावाच लागेल.
‘घरात चुलीजवळ मरण्यापेक्षा इथे बरे की’
असं बायकांना वाटु लागलं. जेलमध्ये एकमेकींना बोलत रात्र काढणाऱ्या बायांच्या गावात मात्र काळजीचे वातावरण होतं. सीताबाईच्या गावातल्या तीसेक बायका जेलात गेल्या होत्या . माणसेही होते. ज्यांच्या घरच्या बायका जेलमध्ये गेल्या , त्यांना शेजाऱ्यांनी स्वयंपाक करून दिला, लेकरांना खाऊ घातलं. सगळ्या गावाचा जीव टांगणीला लागला होता. गावात कुणी काही कुणी काही बोलत होते.
‘पंधरा दिवस सोडणार नाही’ , ‘गड्यांना खडी फोडायला लावणार’.
अटकेची छाया सगळ्या गावावर पडली होती. रेडिओवर बातम्यात आंदोलन सगळ्या राज्यात पेटल्याचं सांगितलं जात होतं. दुसर्या दिवशी पेपरमध्ये बातम्या छापून आल्या. फोटो आले.
तिकडे जेलमध्ये दुसऱ्या दिवशीही जेवणावर बहिष्कार टाकला. उपोषण करायचं ठरलं. मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत काळ्याआईची लेकरे अन्नाचा कणही पोटात घेणार नाही . बायांना हेसुद्धा विशेष वाटत नव्हतं, वेगवेगळ्या देवाच्या नावाने उपवास करायची त्यांना सवय होती .
कार्यकर्ते गटागटाने बोलत बसु लागले. बाया भजन गाणी म्हणु लागल्या.
दुपारी एक संदेश आला . जेल मधलं वातावरण एकदम बदलून गेलं. सरकारने मागण्या मान्य केल्या होत्या. कापसाचे भाव क्विंटल मागे अठराशे रुपये वाढले. पैसे चोवीस तासाच्या आत देण्याची घोषणा सरकारने केली. सगळ्या कार्यकर्त्यांना सोडण्यात येणार होते . बातमी जेलमध्ये पसरली . कार्यकर्ते बेभान झाले .बायामाणसे आनंदाने नाचू लागले. जिंदाबाद च्या घोषणा देऊ लागले. ठणकत असलेलं अंग आता खुशीनं मोहरून उठलं होतं. केलेल्या मेहनतीला फळ आलं होतं. जेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं,
‘तुमच्या मागण्या मान्य झाल्या, आता तरी जेवा’,
पण कोणीच ऐकलं नाही. कधी घरी जाईल असं झालं होतं. जेलमधली कारवाई आटपून अवघ्या दोन तासात सगळे गावात पोचणार होते. गावात अक्षरशः दिवाळीचा आनंद होता. पोरं खुशीत होते. म्हाताऱ्या कोताऱ्यांचा जीव बायांमध्ये अडकला होता.
दिवस मावळतीला आला, गावात एसटी आली. गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आवाजात त्यांचे स्वागत केले. बँड ताशा लावले , वेशीजवळ अख्खा गाव लोटला जेल मध्ये गेलेल्या बायांना गहिवरून आलं. लेकरं बाळे आपापली आई शोधु लागले. समोर गडीमाणसं मागे बाया अशी मिरवणूक निघाली.
सीताबाईच्या नवऱ्यानं घरात आल्यावर तुकडा पाणी ओवाळले, तश्या त्या लाजल्या.
विलास सकाळीच निघुन गेला होता. सीताबाई ला खंत वाटली.बापाचा तिच्यात आधीपासूनच जीव होता, आता आंथरूणाला खिळला. तिला आता डबडबलेल्या डोळ्यासमोर तिचा बा दिसु लागला….
मोहिनी पाटनुरकर राजे







दमदार लिखाण
धन्यवाद
खूप छान लिहिले
थॅन्क्स दर्शना
जबरदस्त लिहिले आहे मामी..👌🏻👌🏻💐
खूप मस्त …
मस्त लिहिलंय
लयच मस्त..👌👌
खुपच छान. प्रेरणादायी.
..सुंदर ….लिहिले ग प्रत्येक … प्रसंग … डोळ्यापुढे .. आला
Superb