मस्त घमघमाट सुटला फराळाचा… यंदाची दिवाळी धूमधडाक्यात आशूकाकीची ..
हो..ग श्यामला एवढे लाडू वळून झाले की झालेच बघ.. झेंडूच्या फुलांचे हार तयार आहेत ना?
हो काकी ..
बर झाले बाई तू मदतीला आहे. नाही तर माझे काही खरे नव्हतं..
सर्व फराळाचे डबे फळीवर ठेवताना एकदा नीट पुसून घे …चिवडा एकदा चाखून बघ.. चटणी मीठ वगैरे..
आशूकाकी. .तुमच्या हातची चव कधी बिघडली होय आजवर..
श्यामलाने लगेच उत्तर दिले.
काहीतरीच आपल..अग मनापासून कोणतेही काम केले की नीटच जमते.. माझी आई नेहमी म्हणायची की.
आशू आपल्या माणसांच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो बघ.. त्याला फक्त प्रेमाची फोडणी द्यावी लागते..
हे सर्व मी माझ्या आईकडून शिकले . आशाकाकी अगदी भरभरून बोलत होत्या.
माझा अजय, अतुल अगदी लहान होते.तेव्हाच त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. माझे वय तरी काय ? नकळत्या वयात लग्न झालेले. पोरांची जबाबदारी पेलण्याइतकी परिपक्व नव्हते.. पण निभावून नेले.
नवऱ्याची मिळणारी पेंशन, आणि वडिलोपार्जित शेती सांभाळीत..
पोर शिकवली..ती शिकली-सवरली आपल्या पायावर उभी राहिली. दोघेही मोठ्या शहरांमध्ये गेली आणि तिकडचीच झाली.. मला मेलीला एकच आस यंदाच्या दिवाळीला तरी पोरं यावे…नातवांच्या किलबिलाटाने घर भरून जावे… माझ्या हाताने त्यांना चिऊकाऊ चा घास भरवावा.. तुला माहीत आहे माझ्या अजयला माझ्या हातची खोबरे घालून केलेली गुळाची खुसखुशीत करंजी.. आणि माझ्या अतुलला माझ्या हातचा बेसनलाडू खूप आवडतो. म्हणून तर प्रत्येक दिवाळीला सर्व पदार्थ आवर्जून करून ठेवते पण..
मुलांच्या आठवणीने काकीचे बोलताना डोळे पाणावले..
येतील.. येतील आशूकाकी या दिवाळीला अजय, अतुल दादा नक्की येतील बघा..
हो ..ग माझी माय खरे होवू दे तुझे बोलणे..
अग..हो मी माझेच गाऱ्हाणे काय मांडून बसले.. काकी काहीतरी आठवत लगेच..
डोक्यावर हात मारत म्हणाल्या.. थांब आलेच..
असे म्हणत त्यांनी आतल्या खोलीतून एक पिशवी आणून श्यामलाला दिली.
काय आहे यात काकी.?
अग.. साडी आहे नवीन आईला दे, आणि हा ड्रेस तुला दिवाळीत घाल .. काकी..माझ्या शिक्षणासाठी लागणारा खर्च शिवाय दर दिवाळीत नवे कापडं किती करता आमच्या साठी? शेवटी नौकर माणूस आम्ही..
पुन्हा..असे बोलायचे नाही. अग..तुझ्या आईला आम्ही घरचा सदस्य मानत होतो. आई आजारी त्यामुळे आता तू यायला लागली.. आणि तू मला मुलीसारखी माया लावली..
थोडा फराळ ने आईसाठी ..
बरं..काकू येवू आता.. आई वाट पाहत असेल ..
हो.. उद्या ये जरा लवकरच आईला पण आण सोबत लक्ष्मीपूजनाला..
हो.. म्हणून श्यामला घराकडे निघाली.. दुसऱ्या दिवशी श्यामला पहाटे लवकर घरची कामे आटोपून आईला सोबत घेऊन आली .दोघी मायलेकीनी येता बरोबर आशूकाकीला वाकून नमस्कार केला. नंतर सर्वांनी एकत्रित फराळ करून संध्याकाळच्या लक्ष्मी पूजनाच्या तयारीला सुरूवात केली. श्यामलाने दारात छान रंगीबेरंगी रांगोळी काढून . झेंडूच्या फुलांची तोरणे बांधायला घेतली तर..तिची आई काकीला पूजेसाठी लागणाऱ्या तयारीला हातभार लावत होती. काकीची नजर सारखी दरवाज्याकडे होती. दुपार टळून गेली पण पोरं काही आली नाही. त्यांचा हिरमोड होत होता. श्यामलाच्या नजरेतून हे सुटले नाही. तिची नजर त्यांच्यावरच होती. त्यांची उदासीनता तिला जाणवत होती. पण अजय, अतुल दादा नक्की येणार तिला हे माहीत होते. तेवढ्यात दारातून आजी… म्हणत नातवांनी काकीला गराडा घातला.
आला बाळांनो.. आशूकाकी त्यांना पाहताच भारावून गेली. ..
देवा या दिवाळीला माझं गोकुळ भरले . त्यांनी देवाचे मनोमन आभार मानत हात जोडले. नातवांना बऱ्याच वर्षांनी त्या डोळे भरून पाहत होत्या. एरवी फोन वर काय ते बोलणे होत होते. आज किती तरी वर्षानंतर घरचा सर्व परिवार दिवाळसणाला एका छताखाली जमला.. आशूकाकीचा उत्साह ओसंडून वाहत होता. दिव्यांचा रोषणाईने घर नेहमी पेक्षा जास्त उजळून निघाले.. नातवंडे फटाके उडवण्याची मजा घेत होती. विधीवत लक्ष्मी पूजन पार पडले. पुढील दोन दिवस कसे संपले कळलेच नाही. मुले आईचा निरोप घेण्यासाठी आली.
बरेच वर्षांनी आला..परत नंतर केव्हा भेट होईल काय माहित ? थांबा दोन दिवस..
नाही आई आता शक्य नाही .. पुन्हा कधी थांबू दिवाळीला येणारच नव्हतो..
म्हणजे..
अग पुन्हा कधी येणार होतो. पण..श्यामलाचा फोन आला आशूकाकी आजारी आहे. म्हणून गडबडीत आलो.. पण इथे आल्यावर तसे काही आढळले नाही. आता आम्ही निघतो.. तुझी काळजी घे.
म्हणजे तुम्ही स्वतः हून नाही आलात… काकी त्यांना नाराजीने म्हणाली..
तसे ..नाही आई..
हो ..काकी माझे काही चुकले का? मला तुम्हाला प्रत्येक दिवाळीला असे नाराज अवस्थेत पाहवत नव्हते म्हणून मी तुमच्या आजारपणाचे खोटे कारण सांगून दोघांना बोलावून घेतले..
नाही ग ..बाई तुझे काहीही चुकले नाही.. मीच मृगजळामागे धावत होती.माझी पोर..माझी पोर..पण पोरांना कुठे माझी आठवण ..रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकीचे नाते मोठे असते आज तू मला दाखवून दिले. खरी लेक शोभतेस तू माझी.,
माझी श्यामला.माझी.मानस कन्या
..सौ. दर्शना ओम भुरे हिंगोली..
सुरेख लिखाण
मस्त
छान लिहिली कथा
अप्रतिम
जिव्हाळ्ययाचे नाते