अक्षम्य भाग-७

काही गुन्हे अक्षम्य असतात
अक्षम्य
भाग-७
शलाकाच्या आईने नक्षत्राला घरी राहण्याची परवानगी दिली. त्यांनाही कुणाचीतरी सोबत हवी होतीच.
नक्षत्राला शलाकाने आईकडे आणून दिले.सोबत आनंद आणि नक्षत्राचे वडीलही होते.
आनंदने त्यांना यापुढे नक्षत्राचा सर्व खर्च तो करणार असे सांगितले.
नक्षत्राची काळजी मिटली.तुमचे खूप उपकार झाले असे म्हणत तिच्या वडिलांनी आनंद आणि शलाकाचा निरोप घेतला.
आनंद सर काॕलेजमध्ये गेले.शलाका दिवसभर थांबून संध्याकाळी परत जाणार होती.
आईने नक्षत्राला शलाकाची  बेडरुम दिली.
खूप दिवसानंतर ती  खोली उघडण्यात आली होती.गरीब घरची नक्षत्रा,छोटया  घरात राहणारी,तिची स्वतंत्र खोली बघून आनंद,शलाकाच्या उपकाराखाली दबल्यासारखे झाले तिला.
नक्षत्राने खोली स्वच्छ केली.
 शलाकाला तिने खोली बघायला बोलवले.
 ताई बघा नं. 
 शलाका अर्थातच त्या खोलीत पाऊलही ठेवू शकणार नव्हती.
 मी बघेल आरामात.आता निवांत बसते जरावेळ बागेत.असे म्हणून ती बागेत तिच्या आवडत्या झुल्यावर जाऊन बसली. 
 तिच्या बाबांनी लावलेली बाग बहरली होती.
एकदा इथेच झुल्यावर बसून बाबांनी तिला समजवले होते,
 झाडांना जीव असतो शलाका .जपून स्पर्श करायचा त्यांना. कळ्यांना तर हातही लावायचा नाही.तुझ्या  आईला फुलांपेक्षा कळ्यांचा गजरा माळण्याचा खूप  सोस होता.
 पण आमचे लग्न झाले आणि माझ्यामुळे  कळ्यांचा गजरा माळणे सोडले तिने. फुलांना आणि फुलांपेक्षा कळ्यांना जपायला लागली ती.कळ्या तोडणे म्हणजे पूर्ण वाढ होण्याआधीच खुरडून टाकणे. 
 बाबांना शेवटपर्यंत त्यांनी जपलेल्या कळीचे काय झाले कळलेच नाही.
ताई,छान बाग आहे तुमची.
नक्षत्राच्या आवाजाने शलाकाची तंद्री भंगली. ये नक्षत्रा.बस इथे.
नाही ताई.
नक्षत्राच्या वागण्यात अजून मोकळेपणा आला नव्हता.
शिवाय ती स्वतःला आश्रित समजत होती.
नक्षत्रा जरा मोकळेपणाने वाग,बोल.इथे तुला चांगलीच माणसे भेटतील.
हो ना ताई.तुमचे खूप उपकार झाले ताई माझ्यावर.
असे पुन्हा बोलू नको नक्षत्रा.
संध्याकाळी आनंद आला.दोघेही घराकडे परतले.
नक्षत्राचे काॕलेज सुरु झाले.तिने बी.ए.ला मराठी साहित्य घेतले.
मराठी साहित्य आनंद सर शिकवायचे.
ते शिकवत असतांना संपूर्ण वर्ग मंत्रमुग्ध व्हायचा.
कवितेतील गोडवा,कारुण्य ,प्रेम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.
नक्षत्राला नवीन वातावरण आवडले होते. इथे तिच्यासोबत काय झाले कुणालाही माहीत  नव्हते. त्यामुळे तिच्याकडे बघण्याची सगळ्यांची नजर स्वच्छ होती.
नवीन लोकं नवीन आयुष्य  असा तिचा प्रवास सुरु झाला होता.
इथे येण्याआधी आयुष्यात आलेला तो जीवघेणा टप्पा खरे तर तिला काढून टाकायचा होता.पण ते शक्य नव्हते.
भूतकाळ पुसणे शक्य नव्हते. पण त्याला विसरण्याचा प्रयत्न  करुन तिला पुढे  जायचे होते.
दिवस जात होते.आता नक्षत्रा  शलाकाच्या माहेरच्या घरी रमली होती.लिलावतीबाईंनाही तिचा आधार वाटत होता.शलाकामुळे तीही त्यांना आई म्हणायला लागली.
मुक्ताशीही तिची मस्तच गट्टी जमली.
तिच्या गावी ती आता कमीच जात होती.लोकांच्या तिच्याकडे वेधलेल्या नजरा बघून तिला शहारे यायचे.
मध्ये मध्ये ती मुक्ताला भेटायला शलाकाकडे यायची.
ताई मुक्ताचे नाव सुंदर आहे.
मुक्त.सगळ्या बंधनातून मुक्त. मुक्तपणे जगणारी.
हो ग. आनंदसरांनी ठेवले. मुक्ता व्हायची होती तेव्हा त्याला मुलगा व्हावा असे वाटत होते.मुलगी नको.तिला कोणी त्रास दिला तर आपण सहन नाही करु शकणार.असे म्हणायचा.ती झाल्यावर त्याची जीव कि प्राण बनली.
पण ताई सर तर आधुनिक विचाराचे आहेत.त्यांना मुलगाच का हवा होता?
तसे नाही ग.ह्या घरात मुलामुलीत भेदभाव नाहीच आहे.पण आनंद आपल्या मुलीला कोणी त्रास दिला तर या कल्पनेनेच घाबरायचा.
 आणि ताई तुम्हाला मुलगा हवा होता कि मुलगी?
 मलाही…शलाका काहीतरी आठवल्यासारखे बोलली.
 अग नक्षत्रा तुझे बाबा सांगत होते तू भाकरी छान बनवतेस म्हणून.
 आज बनव बर.
 आई-बाबांना फार आवडतात.
 बरं ताई बनवते.
 नक्षत्राने सगळ्यांसाठी भाकरी आणि  वांग्याचे भरीत बनवले.
 नक्षत्रा इकडेच जेवून जा आज.
 नाही बाबा, आई जेवणासाठी वाट बघतील असे म्हणून नक्षत्रा निघून गेली.
 बिचारी पोर.
 आनंदची आई म्हणाली.
 बिचारी कोण ग आई?
 काॕलेजमधून नुकताच घरी आलेल्या आनंदने विचारले.
 नक्षत्रा रे.कमी वयात किती अन्याय झाला तिच्यावर.
आनंदचे बाबाही तिथेच होते.
मी जेव्हा नवीन नौकरीवर लागलो तेव्हा फार कमी तक्रारी यायच्या या विषयावर.नीतीमत्तेची चाड होती तेव्हा लोकांना.
नाती जपायचे माणसे.
हळूहळू पार बदलत गेले सगळे. 
नंतर नंतर याच तक्रारी वाढायला लागल्या.
आईवडिलाचे संस्कारच कमी पडत असावेत.
नाही हो.आईवडील आपल्यापरीने संस्कार करतातच मुलांवर. पण मुलांमधलाच संयम हरवत चालला.
आनंदची आई बोलली
खूप बदललयं जग सुमती.
मुलींना सांभाळणे खरेच खूप कठीण झालयं आता.
हो ना. आमच्यावेळेस अशा गोष्टी कधीच कानावर आल्या नाहीत.आमचे बालपण बालपणासारखेच गेले.निरागस,निष्काळजी.कुठेही खेळायला जा.दिवसभर मैत्रीणीकडे राहा.आईवडीलांना काळजी नसायची.आता  मुलींना आईवडील एकटे सोडायला तयारच नसतात.सगळ्या नात्यांवरचा विश्वासच उडाला.
 या आईबाबा जेवायला.
 शलाकाने आवाज दिला. 
 आज खूप दिवसांनी मी पूर्ण स्वयंपाक केला बाबा.
 अरे वा! तुझ्या सासुबाईंनी बरा करु दिला.
 अहो करु द्यावा लागला.तिने अक्षरशः मला किचनबाहेर काढले आज.सुमतीताईंनी हसत सांगितले.
 पूर्ण स्वंयपाक शलाकाने म्हणजे देवा,उपाशी तर नाही राहावे लागणार आज?
 असे गमतीत बोलत आनंदने जेवायला सुरुवात केली.
 क्रमशः
कथेची मुळ कल्पना-विशाल भोवते
पुढील भागाची लिंक

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!