मोरपंखी हूरहूर-मनातील मोरपीस
मोरपंखी हूरहूर-मनातील मोरपीस

मोरपंखी हूरहूर-मनातील मोरपीस

मोरपंखी हूरहूर-मनातील मोरपीस
आज   स्वप्निलचा शोध पूर्ण झाला.
कित्येक वर्षापासून फेसबुकवर शोधत होता. पण लग्नानंतर नाव बदललेली ती सापडणे शक्य नव्हतेच. आज अचानक मनात न मावणारा आनंद मिळाला.
पाण्यात दिसणारे चांदणे प्रत्यक्षात अवतरल्याचा भास झाला.
आभा- त्याचे  कळत्या वयात विसरु न शकलेले
नकळत्या वयातले प्रेम.
 
 एक तालूकावजा गाव तिथली एक छोटीशी शाळा.चवथ्या वर्गापासून ती त्याच्या वर्गात आली. चवथीत सगळेच एकमेकांचे मित्र मैत्रिणी.चवथीतत आलेली छोटीशी,गोरीपान,लांबसडक केस असलेली ,गोड दिसणारी आभा अभ्यासातही तेवढीच हुशार होती. कुणालाही आवडेल अशीच.
तिच्या आसपास नेहमी मित्र मैत्रिणींचा घोळका असायचा. त्यात अर्थातच स्वप्निलही असायचा.
स्वप्निलशी तिची दाट मैत्री झाली.
चवथी संपली.पाचवीत आभाला दुसऱ्या शाळेत टाकले आणि तिच्या वडिलांनी घरही बदलले.पाचवीत शाळेत पहिल्याच दिवशी स्वप्निलला आभा दिसली नाही.
बाईंनी आभा शाळा सोडून गेल्याचे सांगितले,सगळेच तिला मिस् करायला लागले. पण स्वप्निल जास्त.
ती जिथे राहायची तिथेही तो जाऊन आला पण ते तिचे ते घर सुटले होते.
वर्ष उलटले.सहावीत स्वप्निलही योगायोगाने आभाच्याच शाळेत आणि वर्गात गेला.
जुना वर्गमित्र आल्याचे बघून आभाला आनंद झाला.
स्वप्निलला आता आभा आवडायला लागली होती.
वेळ मिळेल तेव्हा तिच्याकडे एकटक बघत राहायचा. आभाच्या ते ध्यानीमनी नव्हते. नंतर जरा मोठे  झाल्यावर मुली आणि मुलांचे वेगवेगळे गृप बनले.
कधीतरी एकमेकांशी बोलायचे ते.
स्वप्निल तिला म्हणायचा,
आपल्या शाळेतील एक मुलगी मला खूप आवडते.
 
आभाने नाव विचारले कि गप्प बसायचा.त्याला शाळेतली कोणीतरी खूप आवडते एवढेच तिला कळले होते.
सहावी,सातवी,आठवी ,नववी पर्यंत ते सोबत होते.नंतर आभा च्या वडिलांची बदली झाली, ती निघून गेली. त्याच्या भिडस्त स्वभावामुळे त्याच्या  मनातले तिला उमजलेच नाही कधी.
स्वप्निल आता मात्र सैरभैर झाला.
 तिची आठवण त्याचे अभ्यासातले लक्ष उडवायची.
 हुशार असूनही दहावीत त्याला कमी मार्कस् मिळाले.
त्याची घरची परिस्थिती बघता त्याला अभ्यास करणे गरजेचे होते. अकरावीत त्याने जोमाने अभ्यास सुरु केला.
 
कुठे असेल आभा?  मला विसरली तर नसेल…
 
असे प्रश्न छळायचे त्याला मध्येमध्ये. मी शोधेनच तिला असा विश्वास वाटायचा त्याला.
बारावी झाला आणि  मेडिकलला त्याचा नंबर लागला.
आता मात्र ती खूप आठवत राहायची..काॕलेजमध्ये खूप मुली होत्या पण त्याच्या लेखी आभाची सर कुणालाच नव्हती. एकाही मुलीकडे त्याचे मन आकर्षित होत नव्हते.
त्याचा अभ्यास आणि मनी वसलेल्या आभाच्या आठवणी यातच तो रमायचा.
शिक्षण संपले आणि घरचे त्याच्या लग्नाच्या मागे लागले.
सुरवातीला त्याने टाळाटाळ केली.घरच्यांनी कारण विचारले  पण जिच्याबद्दल काही माहितीच नव्हते तिच्यासाठी थांबतो हेही तो सांगू शकत नव्हता.
घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी पसंत केली आणि  स्वप्निलचे लग्न झाले.
तनु त्याच्या आयुष्यात आली.स्वप्निलचा संसार सुरु झाला.संसार सुखाचा होता पण
 मनातली ती…तिची जागा कायम होती.
लग्न झाले आणि तेवढ्यातच फेसबुक सुरु झाले,
फेसबुक आधी आले असते तर……
तेव्हापासून त्याने तिचा सुरु केलेला शोध आज संपला.
आज धडधडत्या अंतःकरणाने त्याने तिला friend request पाठवली. तिने लगेच accept केली.
नंतर स्वप्निलने फोन नंबर मागितला. तोही त्याला मिळाला. लगेच त्याने ती दिसेल म्हणून तिचा DP बघितला. पण DP चा चौकोन रिकामाच होता.
फक्त तिचे status तेवढे दिसले.
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा……
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा……..
 
आभाचे आवडते गाणे.किती गोड, सुरेल आणि तल्लीनतेने  गायची ती हे गाणे. माझ्या कानावर शब्दांपेक्षा तिचे सुरेल स्वरच पिंगा घालायचे.
उद्या तिला फोन करायचा  होता.
सगळे त्याला स्वप्नवत् वाटत होते.
आभासी दुनियेत असल्याचा भास होत होता.
आजचा दिवस संपता संपेना.
तनूने विचारलेही,
 काय झाले तुम्हाला?अस्वस्थ वाटताय.
 
स्वप्निल काही बोलला नाही. बस् उद्याची वाट बघत राहिला.
काय म्हणेल आभा?कशी असेल?ती कशी दिसत असेल?
आभा,तिचा नवरा,मुले….असे काहीसे चित्र रंगवत राहिला.
रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर वळत राहीला.
का असे व्हावे?
एवढ्या वर्षांनीही आभा जशीच्या तशीच मनात आहे. अपूर्ण राहिलेल्या स्वप्नात आहे.
तनुशी चांगला संसार सुरु आहे,एक मुलगीही आहे.मग?
या भावना इतक्या घट्ट जाळं का विणत असाव्यात?
सगळे धागे एकमेकांत गुंतलेले.
जाळं नाजूक असले तरीही किती घट्ट. त्याची विण जराही उसवत नाही.
खूप  आधी आभाची बघितलेली आणि आता अर्थहीन झालेली स्वप्ने पुन्हा एकवार ताजी झाली होती.
रात्रभर  न झोपलेला स्वप्निल पहाटेच उठला .फिरायला गेला.सारखा हात फोनकडे जात होता पण आता
 ती कामात असेल,नवरा घरी असेल….
 असा विचार करत बारा वाजले.
 आता मात्र मनाला थोपवणे अशक्य झाले.त्याने फोन लावलाच.
पलिकडून तोच मंजूळ आवाज आला.
हॕलो…कोण….
मी…मी स्वप्निल…आभा,..
ह्दय धडधडत होते त्याचे.
 स्वप्निल…कसा आहेस?….अरे किती दिवसांनी? तू कसे शोधले मला?
आभाने प्रश्नांची सरबत्ती केली त्याच्यावर. खूप दिवसांनी बालमित्र  मिळाल्याचा आनंद तिच्या शब्दांशब्दामध्ये ओसंडत होता.
आभा तू कशी आहेस?
 
मजेत रे.नवरा आताच आॕफिसमध्ये आणि मुले शाळेत गेली बघ.
बराच वेळ दोघे बोलत राहिले.
स्वप्निल–  मला तुला काही सांगायचे होते. मी म्हणायचो ना मला एक मुलगी आवडते…
 
  आभा– हो रे कोण होती ती?
तिच्याशीच लग्न केले असशील ना तू…
किती वर्ष तुझ्या मनात मोरपीस बनून होती…
 
स्वप्निल–  नाही ग. तिला कधी उमजलेच नाही माझे मन.
आभा–  तू सांगितलेच नसणार तिला.
बरे मला तरी सांग. कोण होती ती?
 
ती ना …
उद्या सांगतो तुला.
 
बरं असे म्हणून आभा दुसऱ्या विषयावर बोलत राहली.
आभा तुझा फोटो ठेव ना एखादा फेसबुकवर
असे म्हणत स्वप्निलने फोन ठेवला.
फोन ठेवता ठेवता आभा बोलली
स्वप्निल उद्या सांग हं तुझ्या  स्वप्नपरीचे नाव.
स्वप्निलच्या मनात चलबिचल सुरु झाली
सांगू कि नको. सांगूनच टाकावे.
नाहीतर माझे हे मोरपीस नेहमी अपूर्णच राहील.
आभाच्या गाण्यासारखी अपूर्णतेची गोडी नाही मला.
स्वप्नातल्या साऱ्या कळ्यांनी
उमलून यावे वाटते.
नकळे मला का मोरपंखी
हूरहूर जीवाला लागते……..
पण तिलाही असेच वाटेल का?
नाही.तिला कधी मी  माझ्या  भावना उमजूच दिल्या नाही.
.नको… तिला सांगितले आणि नंतर ती माझ्याशी बोललीच नाही तर…नाही.. माझ्या स्वप्नातल्या कळ्या आता तशाच राहणार मिटलेल्या,अपूर्ण.
माझ्या    मनातले  मोरपंखी मोरपीस राहू देत तसेच…..माझ्या ह्दयात….माझ्या  स्वप्नात. त्यावर फक्त माझाच हक्क राहणार…कायमचा,
ते मोरपिस फक्त मलाच माहिती राहू देत….
प्रिती

https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील कविता

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

5 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!