मोरपिस- चांदण्यांची शेती
चांदण्यांची शेती ....नक्षत्राचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.अन् तिचे आजवर मनात जपलेले मुलायम मोरपीस जणू तरंगायला लागले. मध्ये कित्येक वर्ष जावी लागली मोरपिस फुलण्यासाठी.
लहानपणासून अमृताच्या कविता,गुलजारची गाणी ऐकत आणि साहिरची शायरी वाचत मोठी झालेली नक्षत्रा शब्द मनात गुंजी घालायला लागले कि कागदावर मांडायची कला शिकली.
पण तिचे जादूई शब्द तिच्यापर्यंतच सीमीत राहायचे. लिहिते काहीतरी…असे समजून घरचे तिच्या मनापर्यंत अन् शब्दांपर्यतही पोहचूच शकले नाहीत.
तिला खंत वाटत राहायची.
रात्री चांदण्यांनी भिजलेले आभाळ बघून ह्दयात उमटलेले शब्द पहाटे सूर्याच्या किरणात विरायला लागले.
शब्द आणि तिच्यातले अंतर वाढायला लागले.
शब्द दुरावलेच मग तिला.
हळूहळू अमृता,गुलजार,साहीरही गेले आयुष्यातून.
लग्नानंतर शब्दांना पुन्हा आणायचे असे ठरवून जोडीदाराशी संसार मांडला.
अमृता लिहायची तेव्हा इमरोज तिच्या टेबलवर चहा आणून ठेवायचा हे तिने एकले होते.आपल्याही आयुष्यात असेच काहीतरी स्वप्नवत् घडेल असे स्वप्न रंगवत तिचा संसार सुरु झाला.
सागरसोबत लग्न झाले.ती सासरी आली.लग्नानंतर सासरी काही दिवसांनी सगळ्यांनी एक दिवस गाणी गायची असे ठरले.नक्षत्रा म्हणाली मी कविता म्हणणार मी रचलेली.
असे म्हणत तिने तिची चारदोन कविता असलेली वही उघडली.आणि कविता म्हणायला लागली.
आली इथे सवे तुझ्या
चित्तवृत्ती फुलल्या माझ्या
सख्या मी प्रेमात तुझ्या …
नक्षत्रा,अग सगळे गाणी गात आहेत.तू पण गा एखादे…
सागरने सुचना केली.
नक्षत्राने पटकन ओठांवर आलेले शब्द आत ढकलले आणि गाणे गायला लागली.
सुरुवातीच्या मोरपंखी दिवसात मनात जपून ठेवलेले शब्दांचे मोरपीस कागदावर उतरायला सुरूवात झालीही होती.पण तिचे मोरपंखी शब्द,काव्य जोडीदारापर्यंत पोहचतच नव्हते.
तिच्या शब्दाला पंखच फुटत नव्हते तर ते उडणार कसे? शब्दांना पुन्हा लगाम घालावा लागला. कागदावर उतरण्याआधीच तिने त्यांना मनाच्या कुपीत बंद करुन टाकले.
जोडीदाराला भीती शब्दात ती जास्त गुंतत गेली तर घरच्या जबाबदाऱ्या …त्या कोण सांभाळणार?
शब्द आणि ती कायमचे अंतरले एकमेकांना.
आता शब्दही फिरकेनासे झाले तिच्याजवळ.
आता फक्त ती,घर आणि जबाबदाऱ्या.
नक्षत्रा एकेक जबाबदाऱ्या पार पाडू लागली.
कधी कुठे एखादी काव्य मैफिल असली कि तिचेही शब्द जरा भटकायचे तिच्याजवळ.पण तेवढ्यापुरतेच.
ती मुलगी ,बायको,आई बनली पण याबरोबरच तिला कवयित्री बनायचे स्वप्न मात्र तहानलेलेच राहिले.
मुलीचे नाव काव्या आणि मुलाचे नाव साहिर ठेवले.
दिवस सरत होते.काव्या,साहिर मोठे होत होते.
मुले,त्यांची शाळा,करियर…यात मुलांइतकीच ती गुंतत गेली. त्यांची,सागरची स्वप्ने फुलवित गेली.
तिच्या शब्दांच्या मदतीने मुले दरवर्षी निबंधस्पर्धा जिंकायचे. तिचे शब्द आता मुलांच्या निबंधापुरतेच मर्यादित झाले.
तिचे दिवस सरत होते शब्दाविणाच.
मुले मोठी झाली. सागर वरच्या पदावर पोहचला.जास्त बिझी झाला.
एकमेकात गुंतलेले धागे जरा सैल झाले.
गुंता सुटायला लागला.
शब्द रुंजी घालायला लागले परत मनात.
अंतरंगी शब्द उसळी घेऊ लागले पुन्हा पुन्हा.
त्यांना थोपवण्याचे सायास अपूरे पडू लागले.
आता नाही थोपवू शकली ती शब्दांना आतल्या आत.
शब्द मोरपिसा सारखे हलके होत तरंगायले लागले.
ती भराभर पण सगळ्यांच्या नकळत अंतरीच्या गुढगर्भी जाऊन दडलेल्या शब्दांना कागदावर उतरवायला लागली.
काव्या नक्षत्राच्या कपाटात काहीतरी शोधायला गेली.
तिच्या हाती एक जीर्ण झालेली वही लागली.
ती इतकी जुनाट वही इथे कशी…असे म्हणून जीर्ण वही चाळू लागली.
पहिल्याच पानावर लिहिले होते
शब्द माझा श्वास
शब्द माझा ध्यास
पानं पलटवतांना जीर्ण झालेल्या वहीत अफाट ताकदीचे शब्द तिला भेटले.
त्या जुनाट वहीचे एकेक पान ,एकेक शब्द मोत्यासारखे चमकत होते.काव्याच्या डोळ्यातून अश्रु पाझरु लागले.
शब्दसामर्थ्य असलेल्या आईने एवढे दिवस शब्द असे का लपवले?
ती धावत ते शब्द घेऊन नक्षत्रा जवळ आली.
आई हे काय आहे?
काही नाही ग.असेच काहीतरी.
आई हे असेच काहीतरी नाही ग.
तू आहेस. तुझ्यातली खरी तू आहेस यात दडलेली.
तुजजवळ काय आहे तुला माहित नाही.
तुझ्या शब्दात जादू आहे.रंग आहेत,स्वप्न आहेत.
कस्तुरीमृगी आहेत ते.आणि तू एकटीच काय सुगंध घेत बसलीस त्याचा.
नक्षत्राला काय बोलावे सुचत नव्हते.
पहिल्यांदाच तिच्या जादूई शब्दांची जादू कोणी तरी समजून घेतली होती.
काव्याने नक्षत्राच्या शब्दांना जीर्ण वहीतून बाहेर काढले.त्यांना नवे रुप दिले.
आणि आज शब्द पेरलेले ‘चांदण्यांची शेती’ प्रकाशित झाले.
खूप आधी जपून ठेवलेले मोरपीस आज पूर्ण झाले……
प्रिती
https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील कविता
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
वाह
वाह.. अप्रतिम 👌
धन्यवाद मॅडम.
खूप खूप छान
Khupach chan