सुखाची चाहूल लागता लागता-marathi sad story
सुखाची चाहूल लागता लागता-marathi sad story

सुखाची चाहूल लागता लागता-marathi sad story

आस्था मूळ दिल्लीची. पंजाबी कुटूंब.
दोन बहिणी आणि एक भाऊ.
वडिलांचा हाॕटेलचा व्यवसाय उत्तम चालायचा.घरात पैशाला कमी नाही.सुखवस्तु सामानांची रेलचल.
व्यवसायालाच महत्त्व दिल्यामूळे शिक्षण त्यांच्यासाठी लिहिता वाचण्यापूरते,हिशोब ठेवण्यापूरते यावे असे संपूर्ण घराचेच मत.
आस्थाची थोरली बहीण सुनिताचे लग्न झाले आणि मग लगेच आस्थासाठी स्थळ बघणे सुरु झाले.
मुंबईचा निषाद सर्वांना पसंत पडला.
मस्कतला नौकरी करायचा तो आणि त्याचे वडील दोघेही तिथेही राहायचे.
तिथे कमावलेला पैसा मुंबईत व्यवसायनिर्मितीत टाकायचा असे निषादने ठरवले होते. निषादचे स्थळ आस्थाच्या वडिलांना कुणीतरी सुचवले.
निषाद आणि आस्था दोघांनीही एकमेकांना पसंत केले.
आस्था लग्न करुन मुंबईत आली. निषाद, घरचे सगळेच आस्थाला खूप आवडले होते . दिवस आनंदात जात होते.
सुखाचे दिवस भराभरा जात होते.
तीनएक महिने इकडे थांबून निषाद मस्कतला शेवटचे म्हणून गेला.आस्था आणि सासु इकडेच मुंबईत .
निषाद आणि वडील मस्कतला दोन तीन महिने थांबून सगळी आवराआवर करुन मुंबईला परत आले.
इकडे व्यवसायात भागिदार म्हणून निषादचा मित्र देव सहाय तयार होताच. दोघांची मैत्री अलिकडील काळातील.दोनएक वर्षापूर्वीची.निषाद दोन महिने सुट्या घेऊन आला तेव्हाची.
त्याचा टायर बनवण्याचा व्यवसाय होता. जाण्यापुर्वी ठरल्याप्रमाणे सगळे पैसे निषादने तिथेच गुंतवले.

आस्थाने थोडे पैसे बाजूला ठेवायला सांगितले पण निषादचा देववर  विश्वासहोता.देवला दिलेला एक एक पैसा परत मिळणार याची निषादला खात्री होती.देववरचा विश्वासच नडला. देववर विश्वास ठेवण्याची चूक आयुष्यभर निषादला भोगावी लागली.  
निषादने खोलात जाऊन चौकशी केलीच नाही.
एकदा पैसे दिल्यावर निषाद बिनधास्त राहिला.
देवने निषादचे भांडवल वापरुन व्यवसाय सुरु केला.
जम बसला होता व्यवसायात पण निषाद पैशांचे बोलला कि  देव टाळाटाळ करत होता.
व्यवसाय नवीन आहे.
बस्तान बसायला वेळ लागतो वगैरे कारणे देत निषादला पैसे देणे टाळत राहिला.
अशातच आस्था निषादला मुलगी झाली. पिहू नाव ठेवले.
निषादची मुलगी झाल्यापासून जबाबदारीची जाणीव वाढली. आता तो देवकडे पैशांचा तगादा लावायला लागला. पैसे मागायला दुकानात जायला लागला.
पण देव काही ना काही बहाणे सांगून निषादला टाळायचा.
असाच एक दिवस निषाद दुकानात गेला तर दुकानाला कुलूप होते. त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
पूर्ण आयुष्याची कमाई त्याने देवजवळ दिली होती
घाबरुन त्याने आजूबाजूच्या दुकानदारांकडे चौकशी केली.
त्याने दोन तीन दिवसांपूर्वीच सामानासकट दुकान विकल्याचे त्यांनी सांगितले.
निषादचे सर्व अवसानच गळाले. तसाच तो घरी आला.
आस्था,आईवडील  यांना सांगितले.
या अनपेक्षित धक्क्याने सगळेच हादरले.
कोण कोणत्या शब्दात निषादला धीर देणार?
आस्था तर पार कोलमडूनच गेली.
चार जणांचे कुटुंब एक वर्षाची मुलगी.कसे व्हायचे आता?
देव सर्वस्वच घेऊन गेला.
आता पुढे काय?
निषादने पोलिस स्टेशनमध्ये देवच्या विरोधात तक्रार नोंदवली. पण पोलिसांना त्याने निषादला फसविले असा पुरावा मिळाला नाही.
म्हणजे निषादचे पैसे मिळण्याची शक्यता नव्हतीच.
सगळे व्यवस्थित सुरु असतांना अचानक नियतीने दगा द्यावा,नशिबाने पाठ फिरवावी असेच काहीसे झाले.
निषादला देवचे वागणे जिव्हारी लागले.
आस्था नाही म्हणत असतांना देववर अंधविश्वास ठेवला होता त्याने. आता तो काहीही करु शकत नव्हता.असहाय्य  झाला होता.
वडिलांजवळ काही जमा होती त्यातूनच आता घर चालत होते.निषादने काम शोधण्याचा प्रयत्न केला पण  शिक्षण कमी असल्यामूळे मनाजोगे काम मिळत नव्हते
निषाद हतबल झाला.आता त्याने काम शोधणे ही बंद केले.दिवसरात्र घरीच राहायचा.
दिवसभर देवने आपली फसवणूक केली हेच दुःख कुरवाळत राहायचा.
आस्था,आईवडीलांना त्याचा तणाव बघवत नव्हता.
आस्थानेही  कुठे नौकरी मिळते का यासाठी प्रयत्न केले पण कमी शिक्षणामूळे तिलाही नौकरी नाही मिळाली.
दिवस जसजसे पुढे जात होते तसतसे घरातला तणाव वाढायला लागला.घरातले पैसे संपले होते.
आस्थाला वडिलांनी मदत करण्याचे ठरवले पण स्वाभिमानी निषादने नकार दिला.
आस्थाच्या बहिणीने तिला ब्युटिशियनचा  कोर्स करण्याचा सल्ला दिला.
पिहूला घरी ठेवून ती class ला जायची. ती क्लासला गेल्यावर निषादला अगदी एकटे पडल्यासारखे वाटायचे. एखाद्या व्यसनात स्वतःला गुंतवावे असेही त्याच्या मनात कैकदा आले.पण घरी सगळ्यांची धडपड बघून मनावर संयम ठेवायचा.
सहा महिन्याचा कोर्स संपला.
आस्थाला कोर्स आवडला.आता ब्युटीपार्लर सुरु करावे तरच घराला आधार मिळेल  हा विचार तिच्या मनात आला. पण पार्लर सुरु करायला पैसे कुठून आणणार?
शेवटी प्रयत्न करुन एका बँकेकडून कर्ज घेऊन घराच्या बाजूलाच एक जागा भाड्याने घेऊन पार्लर सुरु केले.
सुरुवातीलाच पार्लरमध्ये कुणी येणार नव्हते. तिला धीर ठेवावा लागला.हळूहळू  .स्त्रियांची गर्दी वाढू लागली.पैशांची आवक सुरु झाली.बँकेचे कर्ज जाऊन घरखर्च भागल्या जाऊ लागला.
पिहू मोठी होत होती.
शाळेत जायला लागली.
निषादला आता जास्त एकटेपणा जाणवायला लागला. मी घरी आणि बायको काम करते याची खंत पोखरत होती त्याला.
आर्थिक परिस्थिती सुधरत होती पण निषादची मनःस्थिती  बिघडत चालली होती.
त्याचा मानसिक तोलही ढासळत चालला.
स्वतःला  स्वतःच्या  विश्वात कोंडून घेतले त्याने.आस्था दिवसभर पार्लर मध्ये बिझी.रात्री थकून घरी परतायची.
निषादचा आजार तिला बरेच दिवस जाणवला नाही.
पिहू, तिची  शाळा,अभ्यास यात गुंतून राहायची.
आस्थाच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याला डाॕ.कडे दाखवले.ट्रीटमेंट सुरु केली, काऊन्सलिंग सुरु झाले.पण तो डाॕक्टरला काहीच प्रतिसाद देत नव्हता.
डाॕक्टरने कितीही प्रयत्न केले तरी निषाद जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत  यातून बाहेर पडणे अशक्य  होते.
औषध सुरु होते पण काऊन्सलिंगला येणे बंद केले होते त्याने. औषधही त्याला वाटले तर घ्यायचा.आस्था पार्लर  सोडून घरी राहू शकत नव्हती.पिहू आता काॕलेजमध्ये जायला लागली.
मध्ये बरीच वर्ष गेली. आस्थाने लहानपणापासून पिहूला कशाचीही कमतरता भासू दिली नाही. निषाद आणि पिहू दोघांचीही जबाबदारी समर्थपणे पेलत होती.निषादची ट्रीटमेंट सुरुच होती.
आस्थाने पिहूला घरच्या परिस्थितीची जाणीव कधी झालीच नाही.
काॕलेजमध्ये शेवटच्या वर्षाला असतांना पिहू तिच्याच वर्गात असणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली.
पिहूचे चे उशिरा घरी येणे,रात्र रात्र मोबाइलवर राहणे यामूळे आस्थाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
तिने खोदून विचारल्यावर पिहूने कबुली दिली.
आस्थाने त्याचे नाव,कुटुंब याबद्दल विचारले.पिहूने सांगितले खूप श्रीमंत कुटुंब आहे मुलाचे नाव
अमन देव सहाय आहे.
आस्था  हादरली पुन्हा एकदा……

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!