सारीपाट संसाराचा-मराठी लघुकथा
अरे आयुष्य म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो कि काय तुम्हाला? कधीही मांडायचा कधीही मोडायचा.
अनंतराव चडफडत म्हणाले आनंदीला.
आनंदी जेमतेम बावीशीची. काॕलेजमध्ये रिषभच्या प्रेमात पडली. परंपरावादी असलेल्या घरात दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्नासाठी परवानगी शक्यच नव्हते.आनंदीला हे माहीती होते.ती परवानगी न घेताच रिषभशी लग्न करुन मोकळी झाली.
आनंदी आणि रिषभ दोघांच्या घरात,त्यांच्या विचारात दोन धृवाएवढे अंतर.
आनंदीचे घर दैववादी तर रिषभचे विज्ञानवादी. एक आस्तिक तर दुसरे नास्तिक.लग्नाची गाठ पडेस्तोवर दोघांमधील हे अंतर दोघांच्याही लक्षात आले नाही. दोघे भेटायचे तेव्हा ह्या विषयावर बोलणे व्हायचेच नाही कधी.
प्रेम आंधळ असतं हे सिद्ध झालं . दोघांच्याही स्वभावात, संस्कारात तफावत असूनही ते एकमेकांचे झाले.
प्रेमात, हौसेमौजेत, फिरण्यात एक वर्ष भुरकन उडून गेले कळलेच नाही . तसेही लग्नानंतर ‘दिवस ‘ कसे जातात कळतच नाही . रिषभच्या आईवडिलांनी लग्नानंतर त्या दोघांना निवांत मोकळं जगता यावं , संसार करता यावा यासाठी आधीच वेगळं घर घेऊन ठेवलं होतं .
राजा-राणीचा संसार सुरू होता.
जेमतेम वर्षानंतर दोघांनाही एकमेकांची उणीदुणी खुपायला लागले. पण रिषभ कामात व्यस्त राहत असल्याने घरच्या गोष्टी इतक्या मनावर घेत नव्हता. पण आनंदी घरी एकटीच राहत असल्याने तिच्या डोक्यात हे विचार घोळत राहायचे. लग्नाआधी दोघे सोबत असतांना हवेत सोडलेल्या सिगारेटच्या झुरक्यांचे तिला काही वाटायचं नाही. हँडसम वाटायचा तो तिला. पण आता त्याच झुरक्यांनी तिचा श्वास कोंडायला लागला.
आनंदीला काही धार्मिक पूजा किंवा मंदिरात जायला त्याची ‘ ना’ नसायची पण त्याला याची जबरदस्ती नको होती. यावरून त्यांची बरेचदा धुसफूस चालायची अन् परत एकत्र यायचे.
दोघांनी आपल्या मर्जीने लग्न केले असल्याने घरी मोठ्या कडे तक्रारी मांडण्यास काही वाव नव्हता किंवा घरच्या मोठ्यांना यात सामील करायचं नाही असेही त्यांनी ठरवलं असेल .
तो म्हणायचा,
” माझा देव म्हणजे माझे काम, माझा लॅपटॉप, ज्यातून मला पैसे मिळतात , ज्यातून मी तुला सुखी ठेवतो , तुझ्या इच्छा पूर्ण करतो ,तो माझा देव .
तिला हे अमान्य नाही पण त्याहीपुढे एक शक्ती असते , हे आपल्याला मानायलाच पाहिजे , असं तिचं म्हणणं.
त्यांच्यातले अंतर जाणवायला लागले, शिवाय वाढायलाही लागले.
अशक्य वाटायला लागले सोबत राहणे.
आनंदीचे उपास तापास,मंदिरात जाणे
याला रिषभचा आक्षेप नव्हता .
तिची श्रद्धा आहे तिने ते करावे इति रिषभ
आनंदीला वाटायचे कधीतरी याने माझ्यासोबत
मंदिरात यावे. देवापुढे भक्तीभावाने हात जोडावे.
माझ्यासाठी हा एवढेसुद्धा नाही करु शकत…
या छोट्या गोष्टींवर वाद घालता घालता कधी त्याचे रुपांतर मोठ्या भांडणात व्हायचे कळायचेही नाही.
आज तर कहरच झाला.
रिषभ ला लाईटर सापडलं नाही सिगारेट पेटवायला. ऑफिससाठी निघाला होता, घाईत होता, तर…. देव्हाऱ्यातल्या दिव्याने त्यांने सिगारेट पेटवली .
झालं आनंदीचा संताप अनावर झाला
बस् यावरुनच शब्दाने शब्द वाढत गेला आणि मोठे भांडण झाले. आनंदीने बॕग भरली आणि माहेरी निघून आली.
अनंतराव आनंदीचे वडील.त्यांचा आधीपासूनच लग्नाला विरोध होता पण आता आनंदीने लग्न केलेच आहे तर ते टिकवावे असेच त्यांना वाटत होते.
आनंदी माहेरी तर आली पण रिषभची आठवण तिला स्वस्थ बसू देत नव्हती.
मी उगाच हट्ट धरला असे तिला वाटत होते.
नाही आला तर नाही आला मंदिरात.
काय बिघडणार होते तो न आल्याने.
आता मी असला बालिश हट्ट कधीही करणार नाही.
तिने मनोमन ठरवले.
रिषभही आनंदी माहेरी आल्यापासून एकटा कंटाळला होता. लग्नानंतर आनंदीला सोडून तो एकही दिवस एकटा राहला नव्हता . आनंदीची सवय झाली होती त्याला. आता जेवण बनविणे, घर साफ करणे…सगळी कामे त्याच्यावर आली होती.
मुख्य म्हणजे आनंदीची आठवण त्याला अस्वस्थ करत होती.
गेलो असतो मंदिरात तर काय बिघडले असते? असेच त्यालाही वाटत होते.
करु का आनंदीला फोन?
कि घ्यायलाच जाऊ सरळ आॕफिसमधून येतांना?
आॕफिस सुटले अन् रिषभ सरळ आनंदीच्या माहेरी पोहचला. आनंदीला अर्थातच आनंद झाला. तिलाही वाटत होते रिषभ ने तिला घ्यायला यावे.
ती बॕग भरुन तयारच होती. ती काही न बोलता गाडीत जाऊन बसली. येतांना रिषभने एका मंदिराजवळ गाडी थांबवली. आनंदी अवाक् झाली.
तिने उतरून बोले पर्यंत रिषभ मंदिराच्या पायऱ्या चढायला लागला.
आनंदी अचंबित होऊन बघत राहिली……
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
समायोजन हेच जीवन.👌