१६-Marathi suspense storyseries-उलटे पडले फासे
तुम्ही डायरीत रमाबद्दल आलेला उल्लेख वाचलाच आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे रमा मला लहानपणापासूनच आवडायची.
तुलाही आवडायचो का ग मी? विनयने गमतीने तिला विचारले.
रमा लाजेने काहीच बोलली नाही. विनय पुढे बोलू लागला.माझ्या मामाची मुलगी. मामा सधन शेतकरी.
त्याला तीन मुली. रमा धाकटी मुलगी.
मी लहान असतांना मामा नेहमी मला माझ्या हुशारीमुळे तू माझा जावई बनशील का असे विचारायचा.आईलाही त्याने विचारले होते.रमा देखणी तर आहेच पण अभ्यासातही हुशार होती. आईबाबांना आवडायची ती आधीपासून.आम्ही दोघेही एकमेकांना आवडायचो.आणि तेव्हा घरच्यांचीही तीच इच्छा होती.
पण बाबांवर खोटा आळ घेण्यात आला आणि सगळेच बदलले. आम्ही तो गावच सोडला.
ज्या गावात एवढी वर्ष अभिमानाने घालवली तिथे अपमानित जीवन जगणे आईला सहन होणे शक्यच नव्हते.
आम्ही दुसरीकडे राहायला गेलो.आयुष्य नव्याने सुरु करायचा प्रयत्न केला.पण फार अवघड होऊन बसले होते सगळे. मी दहावीही नव्हतो.विणा माझ्याहीपेक्षा लहान, आई बाहेरच्या जगाचा शुन्य अनुभव असलेली.
आजोळी आजीआजोबा नव्हतेच.आईच्या लहानपणीच ते गेले.
मामा मदत करत होता. पण आता परिस्थिती फार बिघडली होती. मामा मदत तर करत होते पण एखाद्या गरीबाला श्रीमंत व्यक्तीने करावी तसे.
आईचा स्वाभिमान खूप दुखावत होता. त्यामुळे आमचे मामाशी असलेले नाते जवळजवळ संपुष्टात आले.आई खूप आधी कपडे शिवायचे शिकली होती.
आईजवळ थोडेफार सोने होते ते आईने मोडले आणि शिलाईमशीन घेतली. बाबांनी आमच्या शिक्षणासाठी केलेली बचतही गाव सोडण्याआधी काढून घेतली.त्याच पैशात भाड्याने एक खोली घेतली.जवळ असलेल्या पैशात सहा महिने निघून गेले.तोवर आईचा शिलाईकामात थोडा जम बसला.म्हणजे घरभाडे आणि महिन्याचा खर्च कसाबसा निघत होता.
इतक्या कठीण परिस्थितीत आमच्या शिक्षणाचा विचार होणे केवळ अशक्य होते. आणि आमची टी.सी. मार्कलीस्ट सगळे आणायचे म्हणजे गावी येणे.आईला ते नकोच होते.
बाबांना गमावल्याच्या धक्क्यातून ती बाहेर येतच नव्हती.
मुलांना जगवायचे यासाठी ती जगत होती पण मुलांना जगवण्याबरोबर शिकवायला हवे हा विचार तिच्या मनाला शिवत नव्हता.
आमचे शिक्षण मागे पडले ते पडले. असेच दिवस जात होते.मी एका गॕरेजमध्ये काम करायला लागलो.दिवस असेच जात होते. आमच्या प्रत्येक दिवसावर निराशेचे सावट असायचे.
माझी शाळा सुटलेली, घरची बिकट परिस्थिती.अशात मामा रमाशी माझे लग्न लावून देणे शक्य नव्हतेच.
मामाशी आमचे संबंध बिघडले होते.तुटले नव्हते. विणा रमाला एखादे खुशालीचे पत्र पाठवित असे.पत्रावर अर्थातच आमचा पत्ता राहायचा.
एकदिवस घरी कुणाला काहीही न सांगता रमा घरी येऊन धडकली.मी गॕरेजमधून घरी आलो तर रमा दारात उभी होती.आम्ही पाचेक वर्षांनी एकमेकांना बघत होतो.मी तिला घरात घेऊन गेलो. तिने आईला, मला विनयशी लग्न करायचे असे सांगितले.
आईने तिची समजूत काढली.पण ती ऐकायला तयार नव्हती.
मीही रमाला,माझा नाद सोड,तुला चांगला जोडीदार मिळेल असे समजवले. पण ती तयार झाली नाही.तिचे एकच होते,मी कधीपासून तुझ्यातच माझा जोडीदार शोधला आहे.आता त्यात काही बदल होणार नाही.माझे शिक्षण ,गरिबी काहीही तिने प्रेमाआड येऊ दिले नाही.
रमा तेव्हा बीए फायनलला होती आणि मी नववी पास.खूप विरोधाभास होता आमच्यात.पण रमा तिच्या प्रेमाने हे अंतर मिटवू बघत होती.
मामाला मी पत्र लिहून रमा इथे आल्याचे सांगितले. मामामामी लगेच तिला घ्यायला आले.पण रमा गेली नाही. मामामामी नाराज होऊन,रमाशी,आमच्याशी संबंध तोडून निघून गेले.
रमा माझी सर्वार्थाने अर्धांगिनी बनली.
माझी,माझ्या गरिबीची साथीदार बनली. असे म्हणत विनयने रमाचा हात पकडला. तो पुढे बोलू लागला,
माझ्या परिस्थितीमुळे तिला जे सुख मिळायला पाहिजे होते ते नाही मिळू शकले.
माझे लग्न झाले.मग विणासाठीही एक साधासा मुलगा बघितला.तिचेही लग्न झाले. तीही शिवणकाम करुन घर चालवायला मदत करते.
घरात संस्कारचा प्रवेश झाला. एक आर्थिक परिस्थिती सोडली तर बाकी आम्ही आनंदात होतो.
जुने बघितलेली सगळी स्वप्ने खूप मागे पडली होती. ती स्वप्ने आम्हाला सोडून दूर गेली होती. त्याचा कितीही पाठलाग केला तरी ती आता हाती येणार नव्हती.
जे आहे त्यात समाधान मानून पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
परिस्थितीशी तडजोड करुन आयुष्य पुढे चालले होते.
आणि अशात आईला कॕन्सरचे निदान झाले.
आई-जिला आयुष्याने पदोपदी निराश केले आता कुठे जरा हसायला लागली होती.
डाॕक्टरने तिला ठीक होण्यासाठी सातआठ लाख लागतील असे सांगितले.आणि पायाखालची जमीन सरकली.
एवढे पैसे आणणार कुठून?
पैसे जमविण्याचे खूप प्रयत्न केले मी,रमा आणि विणाने.
पण शक्य झाले नाही.
आता एवढ्यात जरा आयुष्य स्थिरस्थावर झाले होते.
विणाचे लग्न झाले.मग मीही लग्न केले.रमासारखी गुणी आणि मानी मुलगी आयुष्यात आली. घरात गरीबी होती पण संस्कारांची श्रीमंतीही होती. रमामुळे घराला घरपण आले. घरात बाळाचे आगमन झाले.
आता आता कुठे जरा जगण्याचा आभास निर्माण होत होता.एकंदरीत सुखातच चालले होते सगळे पण……
काय झाले पुढे विनयच्या आयुष्यात …..वाचा पुढील भागात
Previous Link
https://marathi.shabdaparna.in/१५-उलटे-पडले-फासे
shabdaparnamarathi@gmail.com
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
https://marathi.shabdaparna.in/बोलके
https://marathi.shabdaparna.in/गाणं
https://marathi.shabdaparna.in/लघूकथा
https://marathi.shabdaparna.in/Bollywood





खुप छान लिहिले