१७-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-चंदनाने पियूषला ओळखले?
Written by-ज्योती रामटेके
दिवस उजाडला. चंदना काळजीपोटी रात्रभर जागीच होती.
आई, बाबाला सांगितले तर ते काळजी करतील म्हणून त्यांना फोन केला नाही. रडूनरडून डोळे सुजले होते. बाबा जागे होते रात्रभर. बरेचदा गेटजवळ येत होते. चंदनाला समजावत होते. दिवस निघाला कि पोलीस स्टेशनमध्ये जाऊ असे सांगत होते. बाबांनी रीनाला बोलवून घेतले. सुमनताई निर्धास्त नेहमीप्रमाणे होत्या. नमु गेट कडे सारखी बघायची. मुले झोपून होती. सकाळचे सहा वाजले. गेटच्या आवाज आला. पियूष आला होता.
बाबा चिडले. अरे रात्रभर कुठे होता तू? कुठे गेला होता न सांगता. चंदनाची अवस्था कशी वेड्यासारखी झाली आहे.
फोन तरी करायचा. पियूषचा चेहरा निर्विकार दिसत होता.
माझ्याकडून काही गुन्हा घडला असे त्याच्याकडे बघून वाटतच नव्हते. किंबहुना तो सर्वांना सांगत होता, आता या गोष्टीची सवय करा. चंदना काहीच बोलली नाही.शांत होती.
आल्यावर पियूष झोपून गेला. नमु आश्चर्याने त्याच्या झोपलेल्या चेहऱ्यावर बघत होती. निष्पाप, निरागस दादा कोणत्या चक्रव्यूहात फसत आहे कळत नाही आहे. रात्री गाडीवर दिसलेला दादाच असेल तर ती स्त्री कोण असेल?
म्हणजे रात्री दादा त्या बाईसोबत होता.कोण असेल ती .
सुखाचा संसार सोडून दादा हे काय करत आहे. देवा, त्याचा सुखाला दृष्ट नको लागू देवू. वहिनी त्याच्या शिवाय नाही जगू शकणार.
चंदनाची पुन्हा रोजचीच गडबड सुरू झाली. मुले शाळेत गेली. आज पोळ्या बनवून द्यायच्या होत्या. तिने कणीक मळली. पियूषच्या आवडीची भाजी बनवली. सर्व करून आंघोळीसाठी गेली. बाहेर आल्यावर निवांत बोलते पियूषसोबत. घरी सुखरूप आला हेच माझ्यासाठी खूप आहे. अंगावर पाणी घेऊन झटपट बाहेर आली. रात्रीचा थकवा कमी झाला होता.छान साडी घालून ती बाहेर आली. बाहेर सामसूम होते. पियूष..पियूष तिने आवाज दिला. पियूष गायब झाला होता. पुन्हा न सांगता कुठे गेला असेल? मनात पुन्हा कालवाकालव झाली.
बाबा, पियूष कुठे गेले? काही सांगून गेले का? बाबा बाहेर आले. बाबांनी फोन केला. मी शेतावर चाललो महत्वाचे काम आठवले म्हणून सांगत होता. चंदना पियूष असा का वागतो आहे कळत नाही. तू लक्ष दे जरा त्याच्याकडे. दिवसभर तुझ्या नावाचा जप करणारा पियूष कसा काय बदलत आहे कळत नाही. चंदनाच्या डोळ्यातून अश्रू आले.
पियूष एकदातरी तुझ्या मनातले मला कळू दे. तिचे मन आक्रोश करत होते. सर्व बारीकसारीक गोष्टी तू मला सांगायचा.एका चाॅकलेटचे दोन भाग करणारा तू,असा कसा
निष्ठुर झाला आहेस. तुला मुले पण दिसत नाही का?
नेहमीप्रमाणे बाजारात जायला आई आली. आठवडा निघेल असे सर्व सामान, भाजीपाला चंदनाला घेऊन देत होती. चंदनाचा चेहरा तिला खूप काही सांगून गेला. आरामात विचारते म्हणून दोघी बाजारात गेल्या.
अरे चंदना, तिने मागे वळून बघितले तर तिची मैत्रीण रेखा उभी होती. खूप वेळ बोलत होत्या दोघी.निघतानिघता तिने विचारले, चंदना माझ्या घराकडे भाऊजी रोज दिसतात ग. काही काम असते का त्यांना तिकडे.
तुझ्या घराकडे म्हणजे तो भाग तर शहराच्या शेवटी आहे नं. आईने विचारले.
हो काकू माझ्या घरापलीकडे आता पाच,सहा नवीन घरे झाली आहेत. चंदना राधाचे घर तिकडेच आहे नं आईने विचारले.
आई शेतावर जाण्याचा रस्ता तोच आहे म्हणून रेखाला दिसत असतील पियूष. ते रोज शेतावर जातात.
चंदना तू खूप भोळी आहेस ग. त्या राधाला कुणीही चांगले म्हणत नाहीत.राधाला ओळखते मी रेखा सांगत होती.
तिचे वागणे बघितले का? तू सावध राहा चंदना पियूष नक्कीच तिथे जातो. तू स्वभावाने साधी आहेस ग, म्हणून मला भीती वाटत आहे. घर उध्वस्त करायला एक ठिणगी पुरेशी असते.
काही स्रिया खूप स्वार्थी असतात.त्यांना कुणाच्या भावना नाही कळत. तू आधी त्यांचे इकडे येणे बंद कर.
रेखा,चंदना जोरात ओरडली. काय बोलावे कळते का तुला.
मी स्वभावाने साधी जरी असली तरी माणसे ओळखू येतात मला. जो व्यक्ती माझ्याविना, एक दिवस राहत नाही तो व्यक्ती मला धोका कसा देणार. मी आणि माझी मुले त्याचे सर्वस्व आहोत. माणुसकीच्या नात्याने राधाला मदत करतो तो.
हा विषय पुन्हा काढू नकोस रेखा.
दोघी घरी आल्या. मुले वाट बघत होती. चंदनाच्या आईला काळजी वाटायला लागली. असे काही असेल तर? त्यांना दरदरून घाम सुटला. चंदना मात्र भाजी निवडण्यात गुंग होती. आई आता फुलकोबी बनवते पियूषला खूप आवडते. आईचे मन आतून भरुन आले. चंदनाला काही सांगण्यात अर्थ नाही हे त्यांना कळले होते. उद्या आरामात सांगण्याचा प्रयत्न करते.
आई घरी निघून गेली.
आईला रात्री झोप आली नाही. सारखे रेखाचे बोलणे आठवत होते. आज सकाळी चंदनाच्या घरी गेली तेव्हा घर कसे उदास वाटत होते. घाईत विचारायचे विसरले. उद्या सकाळीच जाते चंदनाच्या घरी. पियूषची भेट नाही इतक्यात.त्यांना भेटते. दुकान घ्यायचे सुरू होते ते पण नाही घेतले.काहीच कळत नाही. रात्र निघून गेली. आई अस्वस्थ होती. बाबा बघत होते. विमल काय झाले तुला?बेचैन वाटत आहे.
काही नाही, रात्री झोप नाही आली मला. डोकं जड वाटत आहे. चंदना कडे जाते आज. काल निवांत बोलणे झाले नाही तिच्यासोबत.
क्रमशः
https://marathi.shabdaparna.in/१८-सुन्या
चंदनाने पियूषला ओळखले,…राधाची नजर चंदनाच्या सुखी संसाराला लागणार का….वाचत रहा सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…कथामालिकेचे पुढील भाग








सुरेख कथा